या लेखमालेचे भाग लिहीत असताना मला सारखे वाटत आहे की या लेखमालेचे नावच मुळी " अवधान द्यावे लवलाही" असंच ठेवावे .
गजानन महाराज पोथीच्या पहिल्या अध्यायाच्या १४५ व्या ओवीत दासगणू महाराज सांगतात ...
" अवधान द्यावे लवलाहीं
त्या श्रवण करावया ¦¦ "
पोथीत सांगितलेला कथा - सार आणि साहजिकच तत्व - चर्चा जर नीट समजून घ्यायचा असेल तर श्रोत्यांनी ते लक्षपूर्वक ऐकले ( च ) पाहिजे अशी ती विनवणी आहे .
पोथीचे तर फक्त श्रवण - वाचन करायचे आहे तरी लक्षपूर्वक करायचे असेल ; तर शेअरबाजारात , पर्यायाने गुंतवणूक - व्यावसायिक - आर्थिक क्षेत्रात तर प्रत्यक्षात कार्यरत राहायचे असते ( अगदी अपरिहार्यपणे राहवेच लागते ) तर किती एकाग्रता आणि सावधानता बाळगली पाहिजे !
ही ओळ ज्या ज्या वेळी मी वाचतो किंवा मला आठवते त्या त्या वेळी या ओळीतल्या प्रत्येक ( अगदी तिन्ही च्या तिन्ही ) शब्दांचे महत्व जाणवत राहते .
अगदी ठसते च मनात ...
उगाचच नाही आपल्या लहानपणापासून आपल्याला सांगितले जात की कोणत्याही पोथीतला कोणताही शब्द उगाचच , विचार न करता तिथे आलेला नसतो . केवळ अनुप्रास किंवा यमक जुळवण्यासाठी तर नाहीच नाही ....
आज या पोथीचा एकंदरीतच अर्थकारणाच्या संदर्भात , आणि त्यातही विशेषतः गुंतवणूक क्षेत्राच्या संदर्भात विचार करत असताना पटकन मनात आले की अर्थकारणाचे संस्कार आपल्या समाजात लहानपणापासून का होत नसावे ?
असो .
आता हेच बघा ना !
ही ओळ कशी आहे ...." अवधान द्यावे लवलाही "
अवधान हा शब्द लक्ष या शब्दापासून केवळ अक्षर - रचना म्हणून वेगळा नाही ; तर अर्थाची छटा आणि प्रव्रुत्ती म्हणूनही पूर्णपणे वेगळा आहे ..
एखादी गोष्ट आपले लक्ष नसतानाही लक्षात येते . निदान येऊ शकते .
अवधान या शब्दाचे तसे नाही . हा मुद्दा - हा विषय मला समजून घ्यायचाच आहे आणि त्यानुसार तो आचरणात आणायचा आहे या उद्देशाने केलेली एकाग्रता म्हणजे अवधान ...
आणि म्हणून याच्या उलट अर्थाचा शब्द " अनवधानाने " !!!!
म्हणजे " बचत ( savings ) आणि गुंतवणूक ( investment ) यांत जो फरक आहे ...अगदी नेमका तोच फरक " लक्ष " आणि " अवधान " यांत आहे .
आणि साहजिकच , किंवा कदाचितही , म्हणूनच या दोन शब्दांबरोबर घेतली जातात त्या क्रियापदातही फरक आहे ...
आपण " लक्षात घे " म्हणतो
आणि " अवधान द्या " म्हणतो .
याचाच अर्थ असा आहे की लक्ष हॆ आपसूक किंवा आपोआप होते . असते . होऊ शकते .
अवधान तसे नसते .
"लक्ष "दिलेल्या गोष्टी बाहेरून आत येतात ...आणि त्यासाठी आधीच मानसिक तयारी केलेली असेलच असे नाही .
" अवधान " तसे नसते . त्यात आधी आतून बाहेर येते आणि नंतर बाहेरून आत येते व ही प्रक्रिया सुरूच राहाते .
त्यामुळे एका अर्थाने लक्ष ही सतत चालणारी गोष्ट नाही .
आणि ती प्रक्रियाही नाही .
अवधान मात्र दोन्ही आहे .
असं आहे म्हणूनच तर " अर्थ " आणि " परमार्थ " दोन्हीत लक्ष पेक्षाही अवधान जास्त येणार ना .....! ! ! !
" लवलाही " हा शब्द म्हणजे अमिबा प्राण्यासारखा आहे ....कोणत्याही दिशेने , कितीही वेगाने , कशाही प्रमाणात पसरणारा ... त्यामुळे अशा गोष्टी बाबत सावध च राहिले पाहिजे .
त्यामुळे " अवधान द्यावे लवलाही " असं लिहिताना - सांगताना सावधतेचा इशारा तर देत नाहीत ना असं मला दरवेळी वाटत राहते .
ज्याचे रूप आणि स्वरूप सतत बदलते किंवा बदलू शकते अशा गोष्टी म्हणजे लवलाही.
अशा सतत बदलणाऱ्या गोष्टी काही प्रमाणात आपण रोखू शकतो ; काही प्रमाणात नाही . अशा गोष्टी म्हणजे लवलाही.
अशा बदलण्याचे आणि रोखण्याचेही स्वरूप व प्रमाण दरवेळी बदलत राहते ते लवलाही.
काहीवेळा " पुढच्यास ठेच , मागचा शहाणा " हॆ लागू पडते ; तर बहुतेकवेळा " Past performance is not the guarantee for the future " असं असते ते लवलाही...
( Future कसले घेऊन बसलात ? इथे present ची सुद्धा खात्री देत नाही - देणार नाही असं असते ते लवलाही )
एकंदरीतच अर्थ काय आणि परमार्थ काय ....
यातले काहीही , अगदी दोन्हीही , करताना जाणीवपूर्वक केले पाहिजे . आणि मानसिक - भावनिक - -बौद्धिक - शारीरिक पूर्वतयारी करून केले पाहिजे असं दासगणू महाराज सुचवत राहतात .
ही ओळ पोथीत कुठे येते पाहा ना ?
पहिल्या अध्यायाच्या शेवट शेवटच्या ओळीत ...पोथीचा चन्चुप्रवेश तर झाला आहे ..आता पुढे जायचे असेल तर आपल्या बाजूने एक गोष्ट अत्यावश्यक ...
ती म्हणजे ..." अवधान द्यावे लवलाही "
ही ओळ म्हणजे भांडवल - बाजाराची आपल्या देशाचे नियंत्रक ( रेग्युलेटर ) संस्था सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ( सेबी ) आग्रह धरते असा " डिस्क्लेमर क्लॉज " ! ! !
अवधान द्यावे लवलाहीं .....
९ एप्रिल २०२० .