Tuesday, April 21, 2020

पुस्तक अभिप्राय

सध्या करोनाच्या लॉक डाऊन मुळे तसा थोडा निवांतपणा आहे .
" Work from Home " आणि " Work for Home " असं दोन्ही जोरात सुरू असले  तरी ....
काल दुपारी झोप येत नव्हती . म्हणून सहजच चाळा म्हणून तुझे एक पुस्तक हातात घेतले ....
आणि ...
खोटे नाही सांगत ...
पण सगळ्या आघाड्यांवर झुंजत असतानाच रात्रभर जागून झपाट्याने तुझी सगळी पुस्तके एकापाठोपाठ एक वाचून काढली .....
घरातले म्हणले ही गंमतीने ...आज माझे अखंड नामस्मरण किंवा पारायण सुरू आहे ....

चक्री पारायण झाले तुझ्या पुस्तकांचे .... 
मल्हार मनाचा ,
मनातलं मनातच ,
केल्याने देशाटन ,
अर्थस्वर ,
जन्मझुला ,
मला भावलेले गुलजार ....

आधी प्रत्येक पुस्तक सलग
आणि मग यातले थोडं - त्यातलं थोडं असं ...
म्हणून चक्री पारायण म्हणल ...

हॆ करताना आणि करून झाल्यावरही मनात एकच भावना आहे ...
ती म्हणजे ....
" ही तुझी ललित स्वरूपाची पुस्तके म्हणजे तू स्वतः स्वतःवरच उगवलेला सूड आहे ....खूप वेळ घेतलास हा सूड ऊगवायला ....पण जेंव्हा सूड ऊगवलास तेंव्हां मात्र अगदी सव्याज ..."

चमकून जाऊ नकोस हॆ वाक्य - अभिप्राय वाचून .. .
आपण दोघही लहानाचे मोठे बरोबर झालो आहोत .
एकत्र शिकलो आहोत ...
त्यातली कित्येक वर्षं एका वर्गात .
त्यामुळे मला चांगले माहीती आहे की तुला मनोमन इंग्लीशचे प्रोफेसर व्हायचे होते .
पण ते होऊ शकला नाहीस .
झाला नाहीस .

त्याऐवजी  तुझी अख्खी करियर आर्थिक क्षेत्राशी निगडीत राहिली ...
तो विषय तुला कधीच आवडला नाही तरीही ...
आवडलाही नाही आणि समजलाही नाही असं तू म्हणतोसही ....
त्याकडे आम्ही सगळेच दुर्लक्ष करतो .
सरावाने ...

पण आज प्रकर्षाने जाणवत आहे की तू ही मधली वर्षं स्वतःला स्वतःशीच गुदमरवून राहात होतास .
आज या पुस्तकातून तू उफाळून आला आहेस ...

पण हॆ " तुझे " उफाळून येणे आहे .
तुझ्या सारखेच ...
तू कडवा होतास , तू कडवट नव्हतास आणि नाहीस .
तू कधीही खुनशी नव्हतास ...असूच शकतच नाहीस .
अगदी तसंच तुझे हॆ उफाळून येणे आहे ....
म्हणून स्वतः स्वतःवरच उगवलेला सूड म्हणजे ही पुस्तके ...
प्रोफेसर होऊ न शकल्याचा स्वतःच स्वतःवरच उगवलेला सूड .

हा सूड कसा आहे हॆ सांगू ?
आपण सगळे मिळून एकदा कसला तरी ड्राफ्ट बनवत होतो ...त्यातला चौकट हा शब्द तुला खटकत होता ...
तेंव्हां तू म्हणालास ...
" चौकट हॆ बंधन आहे . ती नकारात्मकता आणते . इथे फ़्रेम सारखा काहीतरी शब्द हवा ....फ़्रेम सांभाळते आणि सजवते ....तसं काहीतरी "

तुझी ही पुस्तके सूड असली तरी ती फ़्रेम आहेत .
फ़्रेम ....सांभाळणारी आणि सजवणारी ....
तुलाही आणि वाचकानाही ...
प्रत्येकाच्या भूत - वर्तमान आणि भविष्याला सांभाळणारी आणि सजवणारी .

कारण हा सूड ..
सूड .
सूड चांदण्याचा .

1 comment:

  1. पुस्तकांबद्दल आपला प्रांजळ व परखड अभिप्राय जरूर कळवा... इथेही आणि इतरत्रही....

    ReplyDelete