Thursday, May 14, 2020

आत्मनिर्भर भारत अभियान....

मंगळवार , १२ मे २0२0 रोजी रात्री ८ वाजता माननीय पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण ऐकत असताना ,आणि नंतरही , काही विचार मनात आले.
ते असे.....

१ .  या भाषणात जेंव्हा त्यांनी पहिल्यांदा " आत्मनिर्भर भारत " हा शब्द उच्चारला तेंव्हा मला एकदम अरुणा ढेरे यांच्या " मैत्रेयी " कादंबरीची आठवण आली.
त्या कादंबरीच्या शेवटी येणारया एका प्रसंगात मैत्रेयी याद्न्यवल्क्य ऋषी यांच्याकडे अशी मागणी करते की  " तुम्ही जर काही मला देणार असाल तर तुमच्यात असणारी मी  मला परत द्या. माझे आत्मभान मला परत द्या. " 
सध्याच्या परिस्थितीत आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था पंतप्रधानांच्या मुखातून कींवा द्वारे असच काहीतरी मागत होती का?

२ .  त्या संबोधनाचा पहिला भाग काहींना अनावश्यक वाटत होता. अगदी त्याच्यापेक्षाही काही पलिकडचे काहींना वाटत असल्याचे माननीय पंतप्रधानांचे भाषण पूर्ण होण्याआधीच सोशल मीडियावर झळकू लागलेल्या पोस्टवरून आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आले आहे.
मला तेंव्हा रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी एकदिवसीय क्रिकेट सामन्यात जशी फलंदाजी करतात त्याची निष्कारण आठवण येत होती. ते दोघे कसे आधी अगदी अंत बघितला जाईल इतकी धीमी फलंदाजी करतात . वेळप्रसंगी आवश्यक धावगती अशक्य वाटावी अशा पातळीवर जाऊ देतात . आणि मग अचानक ते दोघं गियर बदलतात. क्रिकेट सामना त्यातून उत्कंठावर्धक होतो. आणि मग शेवटच्या षटकात कींवा चेंडूवर षटकार...
काल थोडेफार तसे काही तरी चाललं होते का....
तो शेवटच्या चेंडूवर षटकार बसला आहे की नाही हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही.
त्यासाठी अर्थमंत्र्यांनी केलेल्या प्रत्यक्ष घोषणांसाठी थांबावे लागेल....
तसंही  राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या १0 टक्के... सुमारे 20 लाख कोटी रुपयांचा प्रश्न आहे हो !

३ .  कालच्या भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख झाला त्या महत्वाच्या आहेतच !
पण त्याहीपेक्षा महत्वाचे आहे ते ज्याचा प्रत्यक्षात भाषणात उल्लेख केला नाही पण त्याबाबत कोणतीही संदिग्धता शिल्लक ठेवली नाही अशा काही गोष्टी हे कालच्या भाषणाचे खरे वैशिष्ट्य आहे. 
यातली अशी पहिली गोष्ट म्हणजे " स्वदेशी " 
संपूर्ण भाषणात स्वदेशी या शब्दाचा एकदाही उल्लेख नाही... पण Be vocal about being local म्हणजे दुसरे काय ?
यांत राजकीय संतुलन किति आणि परीवारात्मक ताणतणाव किति हा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी हे संपूर्ण भाषण हे Strategic Drafting चे अस्स्खलीत उदाहरण आहे.

अजून एक...
कदाचित तो माझ्या आडनावाचा दोष असावा... 
पण हा मुद्दा मांडला जात असताना मला एक भाबडी आशा होती की माननीय पंतप्रधान एकदा तरी लोकमान्य टिळकांचा उल्लेख करतील... कारण भारतीय राजकारणात व राजकीय अर्थकारणात " स्वदेशी " या शब्दाचा उल्लेख सगळ्यात पहिल्यांदा लोकमान्यांनी केला. 
तोही १९०५ साली.
नुसता उल्लेख केला असं नाही तर तो सातत्याने कार्यान्वित केला आणी ठेवलाही!

लोकमान्य टिळक यांचा नावानिशीवार उल्लेख पंतप्रधान त्यांच्या या भाषणात करतील अशी भाबडी आशा वाटण्याचे अजूनही एक कारण म्हणजे आपल्या स्वदेशीला कार्यान्वित करताना आणी त्याची राष्ट्रीय उद्दिष्टांशी सांगड घालताना आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारण यांचा चपखल उपयोग करणारा पहिला भारतीय नेता म्हणजे लोकमान्य टिळक.
आज केवळ आपणच एक देश म्हणून स्वदेशीकडे वळतो आहोत असे नाही तर अमेरिका, जर्मनी , युरोपीय युनियन, ऑस्ट्रेलिया , जपान, व्हिएतनाम, कोरिया, आणि अगदी स्वतः चीन दुसरे काय करत आहेत ? 

शिवाय तसंही सध्या लोकमान्य टिळकांचे स्म्रुति शताब्दी वर्ष सुरू आहे...

पण तसा उल्लेख झाला नाही....
कदाचित सत्तारूढ पक्षाच्या सध्याच्या धोरणात ते बसत नसावे !
कोणाविषयिही जरासूद्धा दुस्वास नाही ; पण वाटलं खरं!
इथेही आणी असेही टिळक ....

४ .  ज्याचा उल्लेख नाही पण या भाषणाची संपूर्ण पार्श्वभूमी असणारा असाच दुसरा शब्द म्हणजे.... " चीन " .
केवळ चीनमधे आणि चीनमुळे कोरोना सुरू झाले आणि सुरू राहिले इतक्या पुरेसाच तो संदर्भ मर्यादीत नाही हे निश्चितच!
त्यानंतरही चीन ने आंतरराष्ट्रीय अर्थकारणात आणि राजकारणात ज्या खेळ्या सुरू ठेवल्या आहेत आणि सुरू केल्या आहेत त्याबद्दलचे धोरणात्मक असं पाऊल म्हणूनही पंतप्रधान मोदींच्या या भाषणाकडे पाहावे लागेल. 

५ .   ज्या गोष्टींचा उल्लेख माननीय पंतप्रधानांच्या भाषणात स्पष्टपणे केला गेला आहे त्याच्याकडे वळताना " खादी आणि हँडलूम " हा विषय.
गेली जवळजवळ दिड- दोन दशके माझ्या व्यावसायिक वेळापत्रकाचे स्वरूप असे आहे की महिन्यातले १७ - १८ दिवस मी फिरतिवर असतो... महाराष्ट्रातही आणि आपल्या देशातल्या इतर सगळ्या राज्यातही...
त्यामुळे स्वानुभवाने सांगू शकतो की या उद्योगांनी गेल्या ६ वर्षात कमालीची कात टाकली आहे.,.
१९८0 च्या दशकात पुपुल जयकरानी इंदिराजींच्या प्रोत्साहनामुळे याबाबत खरी कामाला सुरवात केली असली तरी त्याआधी आणि त्यानंतरच्या काळात हा विषय फक्त बोलण्यापूरेसाच मर्यादीत होता हीही तितकीच वस्तुस्थिती आहे.  
२0१४ नंतर हे चित्र बदलले हीही तितकीच वस्तुस्थिती आहे.... 
अगदी राजकीय द्रुष्त्याही आणि आर्थिक ही!!!

एक मोदी जाकिट हा प्रकार आज  वर्षाला काही हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करतो... कारण गल्ली -बोळापासून ते कॉर्पोरेट बोर्डरूम पर्यन्त वस्त्रप्रावरणाचा हा प्रकार एकाचवेळी " Casual " म्हणूनही आणि त्याचवेळी " Formal " म्हणूनही प्रचलित झाला आहे. अगदी १00 रुपयांपासून कित्येक हजार रुपयांपर्यन्त मिळणारया या प्रकाराने कोट- ब्लेझर- सूट हे प्रकार भारतीय बोर्डरूम मधून हळूहळू बरखास्त करायला सुरवात केली आहे.. 
" मोदी जाकिट " या शब्दप्रयोगातल्या पहिल्या शब्दाची काहींना कितिही अलर्जी असली तरी व्यावसायिक वस्तुस्थिती कशी नाकारता येईल ?

६ . पंतप्रधान मोदींच्या या भाषणात  20 लाख कोटी रुपये असा उल्लेख आला तेंव्हाच मनात आले की आत्ताच्या परिस्थितीत इतके पैसे आणणार कुठून ही चर्चा होणार. 
अगदी अपरिहार्यपणे होणार.
एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय ( आणि ज्येष्ठ नागरिक होऊ घातलेला) पगारदार माणूस म्हणून पोटात गोळा आला की याची धाड आपल्यावर येणार.  जेंव्हा  पंतप्रधानांनी त्यांच्या या भाषणात करदात्यांचे कौतुक सुरू केले तेंव्हा तर शंकेची पाल जोरात ओरडली ( नुसती चुकचुकत बसली नाही) की " बाबा रे तयार राहा! " 
कारण 2014 नंतरचाही आणि आधीचाही आपला राजकीय अर्थकारणाचा आणि आर्थिक राजकारणाचा इतिहास असा आहे की पंतप्रधान आणि अर्थमंत्री हे व असं कौतुक करायला लागले की ओळखायचे असते की हे आता आवळा देऊन ( कींवा न देताही ) कोहळा काढणार. ( मी कोहळा म्हणले आहे; कोथळा नाही हे आवर्जून लक्षात घ्यावे.) 
जर हे खोटे वाटत असेल तर अर्थसंकल्प सादर होताना केलेली भाषणं उदाहरण म्हणून काढून बघायला हरकत नाही... अशा भाषणाचा पार्ट A संपत असताना कौतुक- धन्यवाद आले की समजून जायचे असते की पार्ट B च्या तरतूदीत काहीही हाती लागणार नाहीये.
पण...
पण कालच्या भाषणात मध्यमवर्गीय मंडळींना दिलासा देणार असें पंतप्रधान म्हणाले आहेत. 
त्यामुळे आपण विश्वास ठेवला पाहिजे...
" पंतप्रधानांनी दिले आणि अर्थमंत्र्यांनी काढून घेतले" असं थोडेच होइल ? 
शुभ बोल रे !!!

७ .इतकी मोठी रक्कम उभी करताना जर देशांतर्गत करदात्यांवर भार टाकायचा नसेल ( तसच होऊ दे रे देवा... आले नरेन्द्रजी व निर्मलाजी यांच्या मना ) तर मग सुमारे ३५ - ३८ लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनांच्या गंगाजळीला ( आपल्या नेहमीच्या मराठीत फॉरेक्स रिझर्व्हज ) तर हात लावला जाणार नाही ना ? 
असा विचार मनात येत असतानाच असंही क्षणभर वाटले की एकीकडे परकीय चलनांच्या गंगाजळीचा असा प्रासंगिक सदुपयोग करत असताना दुसरीकडे त्या गंगाजळीत सातत्याने भर घालण्याच्या उद्देशाने  निर्यातवाढीला चालना देणारया पावलांचा अर्थमंत्र्यांच्या घोषणांमधे समावेश असेल का?
त्याचवेळी मुळात आयातीवर काही प्रमाणात बंधने घालणारया गोष्टी येणारया काळात अर्थमंत्री जाहीर करतील का?
तसेच आयातीचे पैसे परकीय चलन कींवा आपला रुपयांच्या मोबदल्यात देण्याऐवजी आपल्या देशात बनलेल्या वस्तूच्या रूपात ( मेड इन इंडिया चे अंतिम स्वरूप) देण्याला प्रोत्साहन देणारे असे काही धोरण केंद्रीय अर्थमंत्री येत्या काही दिवसांत या पकेजचा भाग म्हणून सांगणार का? 

८ .  सातव्या मुद्द्याचा विचार करत असताना असाही विचार मनात तरळून गेला की निर्यात आकर्षक करण्यासाठी आणी आयात महाग करण्यासाठी आपल्या रुपयाचे अवमूल्यन ( डिवल्युएशन., Devaluation) करण्याची घोषणा तर होणार नाही ना? 
हा विचार मनात आल्यापासून मी  संपूर्ण भाषण श्वास रोखून होतो. 
कारण माननीय पंतप्रधानांची आजपर्यंतची कार्यशैली बघता अशी आणि इतकी महत्वाची घोषणा ते स्वतः न करता केंद्रीय अर्थमंत्री करतील ही शक्यता कमी आहे.
अशी घोषणा या भाषणात तरी आलेली नाही . त्यामुळे सध्या तरी असा विचार नसावा असं मी स्वतःलाच सांगतो आहे.
पंतप्रधानांच्या पुढच्या राष्ट्रीय संबोधना पर्यन्त....
( बघा ना.... खरं म्हणजे, त्याच दिवशी सकाळी अर्थमंत्री सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांना भेटणार होत्या . पण ती मीटिंग ऐनवेळी रद्द झाली. तेंव्हाच माझ्या मनात आले की पंतप्रधान त्यांच्या या भाषणात आर्थिक पकेज घोषित करणार... तसच झाले की हो!!) 

९ . पंतप्रधान काय किंवा अर्थमंत्री काय , अशी मोठी घोषणा करताना पद म्हणा, व्यक्ती म्हणा म्हणून पुढाकार जरूर असतो ; पण ती एक प्रक्रिया असते. त्यामुळे इतकी मोठी रक्कम घोषित करताना सरकारी पातळीवर नक्कीच विचार झाला असणार.
बँकांना डिव्हिडण्ड घोषित करण्यापासून परावृत्त करणे हा त्याच प्रक्रियेचा भाग होता का ? 
याआधी जाहीर झालेल्या काही योजना या पकेज चा भाग असतील का ?
असा विचार करत असताना मग हळूहळू लक्षात येते की पुढच्या ५ वर्षात आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था अगदी ४. ५ ते ५ टक्के दरानि वाढली तरी 20 लाख कोटी रुपयांची भरपाई करणे फारसे कठीण नाही. 

10 .  पंतप्रधानांच्या या भाषणातले सगळ्यात जास्त महत्वाचे ( माझ्या मते) विधान म्हणजे  " Not the incremental ; but the quantum jump in economy " . हे विधान केवळ आकर्षक कींवा आक्रमक नाही तर आश्वासक आहे. सध्याच्या निराशाजनक परिस्थितीत तर नक्कीच ! त्यासाठी Economy , Infrastructure , System , Demography आणि Demand या पांच गोष्टींवर प्रामुख्याने आधारीत असे हे पकेज असेल असं सांगत असतानाच त्याची भिस्त Supply Chains वर असेल असं जेंव्हा माननीय पंतप्रधान म्हणतात तेंव्हा आशेची अनेक किरणं दिसू लागतात. कारण  क्रुषि उत्पादनापासून वीज व पाण्यापर्यंत  आणि शिक्षणापासून राजकारणापर्यन्त  आपल्या देशात उत्पादन ही समस्या नसून वितरण हा जटील प्रश्न आहे. ( कोरोना चा संसर्ग हा अशा वितरण व्यवस्थेतील वेगळ्याच प्रकारची समस्या अधोरेखित करते.

११. असं सगळं ऐकत असताना मनामधे एक येत राहाते की माझ्या सारख्या सामान्य माणसाला हे समजावे आणि निदान त्याबाबत तरी आत्मनिर्भर व्हावे म्हणून यापुढे वेळोवेळी सरकार नागरिकांना हे 20 लाख कोटी रुपये कसे आणि कधी दिले गेले हे वारंवार स्पष्ट करत राहील ना !!!

१२ .  एकंदरीत काय , आत्मनिर्भर भारत अभियान म्हणजे या लॉक- डाऊन च्या काळात सवय लागल्या प्रमाणे आपण आणी आपल्या राहत्या वस्तीतला वाणी, आपल्या वस्तीतला दूधवाला- भाजीवाला- इस्त्री वाला-- फळं वाला...
उल्लेख न करता मल्टी- ब्रँड  रिटेलची ऐशी- तैशी....

अशा अनेक गोष्टी स्वतःला विचारत राहावे लागेल. त्याची उत्तरे शोधावी लागतील.
मला कालच्या " आत्मनिर्भर भारत अभियान " चा अर्थ समजून घेताना श्री. म. माटे यांच्या " देश म्हणजे देशातली माणसे" याचीच सारखी आठवण होत होती..
आपण नागरिक म्हणून आत्मनिर्भर तर आपला देश ही आत्मनिर्भर !!!





१३ मे २0२0.

Friday, May 8, 2020

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र - म.टा. मध्ये प्रकाशित झालेला लेख


आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच इंटर नॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटर कींवा आयएफसी हा शब्द अलीकडे एकदम प्रकाशात आला. तो एखाद्या धूमकेतू सारखा चलनात आला आणि जर मुद्दामून लावून धरला गेला नाही तर त्या आणि तशा धूमकेतू सारखाच चर्चेच्या परीघाच्या बाहेरही जाईल.

आजमितीला या शब्दप्रयोगा बाबत तुमच्या- माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसांच्या मनात काही प्रश्न आहेत.

त्यापैकी पहिला प्रश्न असा आहे की ही एखाद्या राजकीय विषयाची चर्चा आहे की एका आर्थिक विषयाची? 
आर्थिक धोरण हा विषय तसा एरवीही राजकारण आणि अर्थकारण यांच्या सीमारेषेवर घुटमळत असतो हे जरी कितीही मान्य केले तरी या विषयाबाबत ही सीमारेषा , निदान सध्यातरी , जरा जास्तच ताणली जात आहे. 
टेनिस मधे लाईन कॉल कींवा क्रिकेट मधे क्रीज - लाईन यांचे निर्णय थर्ड अंपायर कडे कींवा रिव्ह्यू साठी तरी सोपवता येतात. इथे तशी काही सोय नाही का असाही एक अनुशांगिक ( की प्रासंगिक) प्रश्न याबाबत पडावा अशीही परिस्थिती निदान सध्यातरीआहे. 
जस २६ मे ला आपल्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका हे उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय पंतप्रधानांना केलेल्या एका फोन मधे मिळाले तसे या प्रश्नाचे उत्तर एका फोनवर कींवा पत्राने मिळाले नसते का ? 
कींवा निदान तसा प्रयत्न केला गेला का?
 की हा प्रश्न तेवढा महत्वाचा, तातडीचा व प्रतिष्ठेचा वाटला नसावा का? 
ह्या दोन्ही प्रश्नात असणारे दोन्ही ( कींवा तिन्ही) पक्ष एकच आहेत म्हणून हा मुद्दा मनात आले इतकेच!!!
बाकी काही नाही.
कोणालाही दुखावण्याचा उद्देश तर जरासूद्धा नाही.

मुळात हा मुद्दा एकदम आत्ताच का आणि कोठून आला ?
अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्याबाबत चा उच्चस्तरीय समितीचा ( पर्सी मिस्त्री समिती) अहवाल 2007 सालीच तत्कालीन केंद्र सरकारला सादर केला गेला होता. त्याच्या मागे- पुढे एका केंद्रीय अर्थसंकल्पात ( अर्थसंकल्पीय भाषणात)  मुंबईत असे केंद्र सुरू करण्याचा उल्लेख सुद्धा होता. काही रक्कम त्यासाठी तरतूद -वजा प्रस्तावितही केली होती. पण 2007 ते 2014 या काळात याबाबत फारसे काही झाले नाही.... तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकार आणि तत्कालीन केंद्र सरकार यांनी त्याबाबत काहीही हालचाल केली नाही असे राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते ( आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री) असे सध्या सोशल मीडिया मधे फिरत असलेल्या त्यांच्या वीडियो मधे सांगताना दिसतात. त्याचा इन्कार सध्याच्या राज्य सरकारनी अजूनतरी केलेला नाही. 
त्याच वीडियोत असंही सांगितले गेले आहे की हा अहवाल सादर झाल्यावर महाराष्ट्राने काहीही केले नसले तरी त्या समितीच्या त्या अहवालाचा आधार घेत गुजरातच्या तत्कालीन व त्यानंतरच्या सर्वच सरकारांनी याबाबत सातत्याने पावले उचलत असे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरात च्या गांधीनगर मधे ( गिफ्ट सिटी) सुरू सुद्धाकेले.अगदी सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून ! 
2014 नंतर महाराष्ट्र सरकार ने याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आणि आपल्या राज्याचा याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकार कडे आहे. याचाही आजपर्यंत कोणी जाहीर इन्कार केलेला नाही. 

गंमतीचा भाग म्हणजे हा विषय केंद्र सरकारकडे पुन्हां घेऊ असं ना राज्य सरकार म्हणत आहे ना राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते.... महाराष्ट्राच्या राजकारणाने " पुन्हा " या शब्दाची इतकी धास्ती घेतली  आहे की काय!!!

ज्या विषयावर इतक्या थोडक्या कालावधीत असा गदारोळ झाला, उडाला, उडवला गेला त्या विषयाचा जीव इतका खरंच मोठा आणि महत्वाचा आहे का  ?
 आणि असला तरी सध्याच्या करोना च्या काळात तो तितका आवश्यक प्राधान्याने घेण्याचा आहे का? 
जसं एखाद्या बँकेचे कामकाज करण्याचे लायसन रद्द करणें पुढे ढकलता आले असते तसे हा गदारोळ आत्ताच करणे खरंच गरजेचे आहे कींवा होते?

सध्याच्या या चर्चेचा केंद्रबिंदू आहे ती आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा संस्थेच्या नियंत्रक संस्थेचे कार्यालय गुजरात मधे सुरू करण्याची 27 एप्रिल 2020 रोजी झालेली घोषणा. मुंबई, पर्यायाने महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी असं मानले- म्हणले जात असताना हे केंद्र गुजरात मधे का आणि कसे हा या वादळाचा गाभा !

मुळात ही संकल्पना काय आहे?

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र ही संकल्पना राष्ट्रीय अर्थकारणाला एका चांगल्या आणि वेगळ्या व उच्च पातळीवर नेण्यासाठी उपयुक्त संकल्पना आहे हे निर्विवाद!
आणि त्यामुळे ती संस्था आपल्या राज्यात असावी असं वाटणे केवळ प्रतिष्ठेचा प्रश्न असत नाही. 
अगदी मर्यादीत अर्थाने सांगायचे झाले तरअनेक सरकारी योजनांच्या विविध प्रक्रिया साठी " एक खिडकी योजना " असावी तशा स्वरूपाचे काम असे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र करते. 
किमान तशी त्याच्या कडून अपेक्षा असते. 
अशी संस्था आपल्या देशात SEZ ( स्पेशलाईज्ड एकॉनोमिक झोन ) मधेच असू शकते. त्यासाठी स्वतंत्र वित्तीय सेवा झोनची कायदेशीर तरतूद आहे.
अशी भौगोलिक रचना उदाहरण म्हणून दिलेल्या " एक खिडकी योजना " तल्या खिडकीची जागा घेते. अशा sez मधल्या प्रकल्पाला असणारया वैशिष्ट्यपूर्ण सवलतीची पूरेपूर जाणीव ठेवत भारतीय उद्योजक, त्यांचे विदेशी सहाय्यक कींवा भागीदार, त्यांच्यातील कर्जाची व तंत्राची व्यावहारिक बाजू आणि प्रत्यक्षात व्यवहार याबाबतची आवश्यक ती संस्थात्मक व व्यावहारिक मदत अशा संस्थेने उपलब्ध करून देणे अपेक्षित असते.j
केवळ कर्ज च नव्हे तर अशा कंपन्यातल्या भांडवली गुंतवणुकीचे व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यातली मदतही अशी संस्था करते. अशा व्यवहारात केवळ आपल्या देशातील कायद्याचीच नव्हे तर संबंधित विदेशी भागीदाराच्या देशातील कायद्याने बंधनकारक केलेल्या तरतूदीण्चेही भान सतत ठेवावे लागते. भांडवल उभारणी ते शेअरबाजारात नोंदणी ( स्टॉक एक्स्चेंज लिस्टिण्ग) असा त्याचा पल्ला असतो .
आणि हा प्रकल्प जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत त्याची व्याप्ती असते. आणि हे फक्त आपल्या देशातील कायदा डोळ्यांसमोर ठेवून करून भागत नाही. 
अशा कंपनीच्या कारभारातल्या प्रत्येक टप्प्यावरच्या जोखमीचे मूल्यमापन आणि नियोजन ( रिस्क मनेजमेन्त) हा त्यातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा भाग असतो.... अगदी सर्वार्थाने!!!

या प्रकारचे व्यवहार देशांतर्गत तसेच परदेशी नागरिक कींवा कंपन्या करत असतात. त्यात सहसा बँका , विमा कंपन्या, वित्तीय सल्लागार यांचा पुढाकार असला तरी वेळप्रसंगी संबंधित देशांची सरकारे कींवा सरकारी संस्थाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहभाग असू शकतो.
आणि त्यामुळे हे सगळे गणित " हाय- स्टेक, हाय- ग्लमर ,हाय- प्रोफाईल, हाय- कमांड " स्वरूपाचे असते.
( उदाहरणार्थ.... सध्या चे आपल्या देशातले टेलिकॉम क्षेत्रातले बहुचर्चित.....)

त्यातही विदेशी भांडवल, विदेशी तण्त्रड्ण्यान , विदेशी बाजारपेठ हा विषय सगळ्याच देशांत नेहमीच संवेदनशील असतो हे लक्षात घेतले आणि त्यातही आपल्या देशाचे जागतिक अर्थकारणात असणारे कींवा नसणारे स्थान लक्षात घेता अशा यंत्रणेची आवश्यकता या मुद्द्यावर दुमत व्हायचे कारण नाही. 
आणि हे सर्वच विदेशी चलनात....
कदाचित म्हणूनच तो आता ऐरणीवर आला असावा. 
कारण करोना नंतरच्या अर्थकारणात त्याची गरज जास्तच असेल.

अशा संस्था कोणत्याही देशात एकापेक्षा जास्त असू शकतात. एकापेक्षा जास्त बँकां , एकापेक्षा जास्त स्टॉक- एक्स्चेंज, एकापेक्षा जास्त विमा- कंपन्या , एकापेक्षा जास्त म्युच्युअल फंड , एकापेक्षा जास्त कमोडिटी एक्स्चेंज जर अर्थव्यवस्थेत एकाचवेळी असू शकतात तर एकाचवेळी एकापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र एकाच राष्ट्रीय अर्थकारणात असू शकतात. प्रश्न इतकाच आहे की जर असे एक सेवा केंद्र आधीच सुरू झालेले असताना दुसरे केंद्र सुरू होण्याची प्रक्रिया नेमकी कोणत्या टप्प्यावर रेंगाळली आहे? 
याबाबत कोणीच काहीच बोलत नाही हे आश्चर्यच आहे.
आणि ही प्रक्रिया रेंगाळली आहे, अडकली आहे की अडकवलि गेली आहे हेही तसेच गुलदस्त्यात !!!

आत्ताचा वाद अशा केंद्राबाबत आहे की अशा केंद्राच्या नियंत्रक संस्थेच्या बाबत आणि त्याचे मुख्य कार्यालय कुठे असावे याबाबत आहे हा खरा प्रश्न आहे.
हा वाद कींवा गदारोळ कींवा चर्चा आर्थिक स्वरूपाची आहे असं मानले तर जिथे ज्या संस्थांचे कामकाज सुरू आहे तिथेच त्याचा नियंत्रक असणे हे तर्कशुद्ध आहे. आजमितीला आपल्या देशात अशा स्वरूपाची कार्यरत असणारी एकमेव, अगदी एकमेव संस्था जिथे काम करत आहे तिथेच त्याच्या नियंत्रक संस्थेचे कार्यालय असण्याची केंद्र सरकार ने 27 एप्रिल 2020 रोजी केलेली घोषणा वावगी नाही.
आणि भविष्यकाळात हे कार्यालय दुसरीकडे हलवता येणार नाही असं काही नाही.
त्यामुळे त्या संस्थेचे भौगोलिक स्थान महत्वाचे नसून ही संपूर्ण यंत्रणा किति आणि कशी प्रभावीपणे उपयोगात आणू शकू हे महत्वाचे आहे. सध्याच्या तंत्र- प्रधान जमान्यात भूगोल महत्वाचा नसतो .

सध्याचा ही चर्चा राजकीय असेल तर मग सरकार एकीकडे आणि रिमोट कंट्रोल दुसरीकडे हा तर आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे की अगदी कोणताही पक्ष अपवाद नसणारा !







६ मे 2020.

Tuesday, May 5, 2020

सुवर्णा जोशी यांचे मनोगत - मला आवडलेलं पुस्तक

    मध्यंतरी श्री.चंद्रशेखर टिळक सरांना मी विनंती केली म्हणून त्यांनी त्यांची आठ पुस्तकं मला पाठवली. अतिशय सुरेख आहेत पुस्तकं.  एक अर्थतज्ञ,  त्या विषयावरचे सुप्रसिद्ध व्याख्याते असलेल्या सरांचा एक वेगळाच पैलू  त्यांच्या पुस्तकातून पहायला मिळाला, एक मिस्कील,  रसिक, उमदा,  अलवार जाणिवेचा रसिक अनुभवायला मिळाला. 

     आज मी सरांच्या " मल्हार मनाचा" या मला अतिशय आवडलेल्या पुस्तकाविषयी थोडसं, मला जमेल तसं लिहितेय. या पुस्तकाविषयी सर असं म्हणालेत," एखाद्या घटनेच्या सादेला मनाचा प्रतिसाद जरी लगेच मिळाला आणि तो एकदाच आला तरी त्याचा मल्हार मनात सतत बरसत असतो. अशा आठवणींचे चंदन आयुष्याच्या सहाणेवर कळत नकळत उगाळले जातेच.  अशा सुगंधाला लघुकथा व ललित लेख यांच्या सीमारेषेवर लेखनबद्ध करणारे पुस्तक. " 

पहिला ललितलेख  आहे "कल्पिता". यात तीन मित्र आणि त्यांची एक मैत्रीण कल्पिता  यांची अनोखी कथा आहे.  यापैकी एक मित्र म्हणजे टोळकं सरच आहेत असं मला वाटलं.पन्नास वर्षे झाली आहेत त्यांच्या मैत्रीला.  तीन मुलगे आणि एक मुलगी असली तरीही जितकी चार मित्रांची मैत्री सच्ची असते, निर्मळ असते, तितकीच यांची मैत्री सच्ची आहे. सहवासाने सगळेजणं एकमेकांच्या आवडीनिवडी,  सवयी याविषयी सतत जाण ठेवून एकमेकांना जपणारे आहेत. आत्ता ते भेटलेत तेव्हा ते आयुष्यात स्थिरस्थावर झालेत आणि तिच्यासह सर्वांची लग्नं झालेली आहेत. तिचा नवरा पण ही अनोखी मैत्री समजून तर घेतोच पण त्याला त्या मैत्रीचा अभिमानही आहे. एकमेकांच्या मनाजवळ असणं म्हणजे खरी मैत्री,  हे पटलं. आत्ता तर याचा खूपच अनुभव घेतोय आपण !!!

         दुसरा लेख रांगोळी हा मला सर्वात जास्त आवडलेला लेख,  सर्व लेखांवर लिहीलं तर पुस्तक होईल, म्हणून मला विशेष आवडलेत त्या बद्दल लिहीणारे. रांगोळी आपण सगळेच नेहमीच बघतो,  आम्ही बायका तर रोजच रांगोळी काढतो, अगदी मला छान रांगोळी काढता येत नसली तरीही निदान देवासमोर तरी रांगोळी काढून त्यावर हळदीकुंकु घालतेच मी !! त्या रांगोळी विषयी इतका अनोखा, मनाला भिडणारा, मोह घालणारा,अलवार विचार कोणी करेल असं मला वाटलं नव्हतं.  रांगोळी म्हणजे एक घरंदाज कलाकृती असून घरातील वातावरणाचा अंदाज देणारी एक बाब आहे, रांगोळी मला तिचा पहिलाच दिवाळसण साजरा करायला माहेरी आलेल्या लेकीसारखी माहेरवाशीण वाटते!! घरगुती पण आवडीची!! आपल्या वाढत्या वयानुसार रांगोळी काढायला बसलेल्या माहेरवाशीणींचे भावणारे रुप कदाचित बदलत असेल!! किती छान वाटतं हे सगळं!! या कथेत आपल्या, लेकीच्या आणि होणार्या सुनेच्या मायेची अलवार आणि सुरेख रांगोळीच काढलेली आहे. या लेखात सरांचं कर्तृत्ववान, कणखर आणि तरीही कनवाळू, पण भावुक रुप मनाला भावलं. एकाच माणसाची अशी अनोखी रुपं बघायला मिळतात, हेच तर वैशिष्ट्य आहे या पुस्तकांचं.  

           अपेक्षा या लेखात एक बाॅस आणि तरुण, बाॅसच्या लेकीसारखी असलेली कलीग यांची अनोखी कथा आहे.  बाॅस अनुभवी आणि मायाळू आहे. नवीनच आलेली कलीग ही सगळं काम शिकून आता नक्कीच प्रमोशन मिळवेल याची खात्री असली तरीही तिची काळजी, हुरहुर आहे. त्या दोघांचं ते अनोखं नातं, बाॅसने तिला वडिलांसारखं प्रोटेक्ट करणं,  तिची काळजी घेऊन तिला यशस्वी होण्यासाठी मदत करणारे असे बाॅस, आणि आपल्या वडिलांसारखं माया करणारं माणूस मिळालं म्हणून काम करतांना झटणारी आणि मनापासून हे नातं आवडणारी मुलगी,  खूप छान वाटलं. आजच्या काळात जे अनुभव सगळीकडे रंगवतात, बाॅसशी लफडं,  प्रमोशन मिळू नये यासाठी कटकारस्थानं,  मुलगी पाहिली की फक्त  वासना मनात बाळगणारे पुरुष,  या पार्श्वभूमीवर ही कथा विशेष आवडली.  शिवाय मला स्वतःला असेच बाॅस मिळाले होते, माझ्या पहिल्या नोकरीच्या काळात. अप्रतिम कथा.

                पुढची कथा आहे " माझी गं - ती सासू " हे मनोगत आहे एका सुनंचं,  जिच्या आयुष्यात सासुचं योगदान खूप मोठं आहे.  यातल्या सुनेला आयुष्य कसं सुखदायी करायचं यासाठी मंत्र दिला तो सासुबाईंनी.  संसारातील सगळी कर्तव्य पार पाडत असतांना आपले छंद जोपासले तर जगणं आनंददायी होतं म्हणून गाणं शिकणं,पेंटींग, क्राफ्ट हे छंद जोपासायला प्रोत्साहन दिलं, अगदी मुलाला करुन वाढायच्या तशी गरम तव्यावरची पोळी सुनेला करुन वाढली. नाटकात काम करणं, निवेदन करणं यासाठी तयारी करायला वेळ दिला, वाचन कर,माहिती घे अशा सूचना दिल्या.  हे सगळं मला अद्भुत वाटतं. मुलीला काय करायचेत नसते छंद ,असं म्हणणार्या आया खूप बघितल्यात,  पण हे म्हणजे अतिशय आवडलं. मी सासू होणार नाही, पण होता होईतो शेजारीपाजारी किंवा मैत्रीणींना मदत नक्कीच करेन. 

     "मन पाखरु पाखरु " हा एक अप्रतिम लेख आहे, या विषयावर असं काही लिहीता येईल, असं हा लेख वाचेतो माझ्या मनातही आलं नव्हतं. एक अगदी छोटासा विषय, एक चित्रं: पूर्णपणे निष्पर्ण वृक्ष., मात्र त्याच्यावर एकमेकांकडे तोंड करुन बसलेले कितीतरी रंगीबेरंगी पक्षी आहेत.  या चित्राकडे पाहून लेखकाच्या मनात आलेले विविध विचार वाचून स्तिमित झाले. आपणच एक निष्पर्ण वृक्ष आहोत की काय? की आपण रंगीबेरंगी पाखरु आहोत? यातच एक विचार असा की आठवणी पण पाखरु असतात, यातच कबीराचे दोहे आठवून आयुष्याची दिशा दाखवणारे विचार मांडलाय. शेवटी तर निष्पर्ण झाडं ही प्राप्त परिस्थिती आणि संवादाची आवश्यकता अधोरेखित करणारे ते पक्षी!! किती सुरेख विचार !!!

         "सांगाती "  ही बहुदा सरांची आठवण सरिता असावी. मुरलेल्या लग्नानंतर एकमेकांना न बोलता,  न सांगता परिपूर्ण ओळखणारे ते दोघं  !! काॅलेजमधल्या प्रेमाची अलवार आठवण, एकमेकांच्या आवडीनिवडी जपणारे, तरीही छोट्या छोट्या गोष्टीत होणारे  रुसवा फुगवा,  मनवणं  हे इतकं अलवार,  तरीही रोमँटीक वाटत,  नवीन पिढीला ते अद्भुत वाटेल. 

       एक वेगळीच कथा म्हणजे " कुरकुरे " जुही चावलाची जाहिरात " टेढा है, पर मेरा है " नवरा आणि कुरकुरे याची अनोखी तुलना म्हणजे कुरकुरे!! तुम्ही वाचा, मी सांगत नाही.  

      " तुझं माझ्याकडे लक्ष नाही" 
        यात वेगवेगळे अनुभव लिहिलेत,  ते तुम्ही वाचा, मी वाचल्या नंतर "तुझं माझ्याकडे लक्ष नाही" यातले कितीतरी अनुभव माझ्या मनात आले. एकदा  सकाळी कामाची गडबड असते, तेव्हा सगळं आटोपून हाॅलमधे आल्यावर मी सासुबाईंना सूचना देत देत माझं आवरत होते, " थर्मासमधे काॅफी आहे, तुमच्या गोळया डबीत काढून ठेवल्या आहेत,  आज भाजी तुमच्या खास आवडीची नाही म्हणून आंबोशीचं लोणचं टेबलावर काढून ठेवलंय,  तेवढ्यात अहो पेपर वाचत बसले होते,  ते म्हणाले, " तुझं माझ्याकडे लक्ष नाही, अजून माझं आवरलं नाहीये, मी आज जात नाहीये ऑफिसमध्ये!!" याची आठवण झाली. तुम्हाला पण अशा कितीतरी गोष्टी आठवतील. 

      " आगळा दुरावा" ही आगळीवेगळी कथा आहे घटस्फोटित जोडप्याची!! त्या दोघांनी अगदी विचारपूर्वक घटस्फ़ोट घेतलेला आहे,  तरीही त्यांचे संबंध अगदी अलवार जाणिवेच्या पातळीवर असून, कोणतीही कटुता नाही. तिला राजकारणात करियर करायची होती आणि याला सैद्धांतिक गैरव्यवहार करणे मान्य नव्हते म्हणून घटस्फ़ोट घेतलेला होता. आजही एकमेकांची मतं आणि मनं जपणारे, एकमेकांना आपलं यशापयश मनापासून सांगणारे,  एकमेकांच्या कुटुंबाशीही छान संबंध ठेवणारे,  असे आगळेच नवराबायको आहेत यात. मला ही कथा अतिशय आवडली. खरंच माणसाने इतकं डोळस व्हायला शिकलं पाहिजे. 

         याव्यतिरिक्त इतरही लेख/ कथा अप्रतिम आहेत, यात जावं उजवं करणं कठीण आहे. पण लताच्या गाण्यात सुद्धा आपण अति आवडीची गाणी निवडतोच ना, तसे हे लेख मी निवडले.

        माझं लिखाण हा ट्रेलर माना आणि तुम्ही स्वतः सरांची पुस्तकं नक्की वाचा. 

       इतरही पुस्तकं वाचली आहेत, त्याविषयी लिहीतेय नक्कीच.

सुवर्णा भावे जोशी
चिपळूण .
११ एप्रिल २0२0