Tuesday, May 5, 2020

सुवर्णा जोशी यांचे मनोगत - मला आवडलेलं पुस्तक

    मध्यंतरी श्री.चंद्रशेखर टिळक सरांना मी विनंती केली म्हणून त्यांनी त्यांची आठ पुस्तकं मला पाठवली. अतिशय सुरेख आहेत पुस्तकं.  एक अर्थतज्ञ,  त्या विषयावरचे सुप्रसिद्ध व्याख्याते असलेल्या सरांचा एक वेगळाच पैलू  त्यांच्या पुस्तकातून पहायला मिळाला, एक मिस्कील,  रसिक, उमदा,  अलवार जाणिवेचा रसिक अनुभवायला मिळाला. 

     आज मी सरांच्या " मल्हार मनाचा" या मला अतिशय आवडलेल्या पुस्तकाविषयी थोडसं, मला जमेल तसं लिहितेय. या पुस्तकाविषयी सर असं म्हणालेत," एखाद्या घटनेच्या सादेला मनाचा प्रतिसाद जरी लगेच मिळाला आणि तो एकदाच आला तरी त्याचा मल्हार मनात सतत बरसत असतो. अशा आठवणींचे चंदन आयुष्याच्या सहाणेवर कळत नकळत उगाळले जातेच.  अशा सुगंधाला लघुकथा व ललित लेख यांच्या सीमारेषेवर लेखनबद्ध करणारे पुस्तक. " 

पहिला ललितलेख  आहे "कल्पिता". यात तीन मित्र आणि त्यांची एक मैत्रीण कल्पिता  यांची अनोखी कथा आहे.  यापैकी एक मित्र म्हणजे टोळकं सरच आहेत असं मला वाटलं.पन्नास वर्षे झाली आहेत त्यांच्या मैत्रीला.  तीन मुलगे आणि एक मुलगी असली तरीही जितकी चार मित्रांची मैत्री सच्ची असते, निर्मळ असते, तितकीच यांची मैत्री सच्ची आहे. सहवासाने सगळेजणं एकमेकांच्या आवडीनिवडी,  सवयी याविषयी सतत जाण ठेवून एकमेकांना जपणारे आहेत. आत्ता ते भेटलेत तेव्हा ते आयुष्यात स्थिरस्थावर झालेत आणि तिच्यासह सर्वांची लग्नं झालेली आहेत. तिचा नवरा पण ही अनोखी मैत्री समजून तर घेतोच पण त्याला त्या मैत्रीचा अभिमानही आहे. एकमेकांच्या मनाजवळ असणं म्हणजे खरी मैत्री,  हे पटलं. आत्ता तर याचा खूपच अनुभव घेतोय आपण !!!

         दुसरा लेख रांगोळी हा मला सर्वात जास्त आवडलेला लेख,  सर्व लेखांवर लिहीलं तर पुस्तक होईल, म्हणून मला विशेष आवडलेत त्या बद्दल लिहीणारे. रांगोळी आपण सगळेच नेहमीच बघतो,  आम्ही बायका तर रोजच रांगोळी काढतो, अगदी मला छान रांगोळी काढता येत नसली तरीही निदान देवासमोर तरी रांगोळी काढून त्यावर हळदीकुंकु घालतेच मी !! त्या रांगोळी विषयी इतका अनोखा, मनाला भिडणारा, मोह घालणारा,अलवार विचार कोणी करेल असं मला वाटलं नव्हतं.  रांगोळी म्हणजे एक घरंदाज कलाकृती असून घरातील वातावरणाचा अंदाज देणारी एक बाब आहे, रांगोळी मला तिचा पहिलाच दिवाळसण साजरा करायला माहेरी आलेल्या लेकीसारखी माहेरवाशीण वाटते!! घरगुती पण आवडीची!! आपल्या वाढत्या वयानुसार रांगोळी काढायला बसलेल्या माहेरवाशीणींचे भावणारे रुप कदाचित बदलत असेल!! किती छान वाटतं हे सगळं!! या कथेत आपल्या, लेकीच्या आणि होणार्या सुनेच्या मायेची अलवार आणि सुरेख रांगोळीच काढलेली आहे. या लेखात सरांचं कर्तृत्ववान, कणखर आणि तरीही कनवाळू, पण भावुक रुप मनाला भावलं. एकाच माणसाची अशी अनोखी रुपं बघायला मिळतात, हेच तर वैशिष्ट्य आहे या पुस्तकांचं.  

           अपेक्षा या लेखात एक बाॅस आणि तरुण, बाॅसच्या लेकीसारखी असलेली कलीग यांची अनोखी कथा आहे.  बाॅस अनुभवी आणि मायाळू आहे. नवीनच आलेली कलीग ही सगळं काम शिकून आता नक्कीच प्रमोशन मिळवेल याची खात्री असली तरीही तिची काळजी, हुरहुर आहे. त्या दोघांचं ते अनोखं नातं, बाॅसने तिला वडिलांसारखं प्रोटेक्ट करणं,  तिची काळजी घेऊन तिला यशस्वी होण्यासाठी मदत करणारे असे बाॅस, आणि आपल्या वडिलांसारखं माया करणारं माणूस मिळालं म्हणून काम करतांना झटणारी आणि मनापासून हे नातं आवडणारी मुलगी,  खूप छान वाटलं. आजच्या काळात जे अनुभव सगळीकडे रंगवतात, बाॅसशी लफडं,  प्रमोशन मिळू नये यासाठी कटकारस्थानं,  मुलगी पाहिली की फक्त  वासना मनात बाळगणारे पुरुष,  या पार्श्वभूमीवर ही कथा विशेष आवडली.  शिवाय मला स्वतःला असेच बाॅस मिळाले होते, माझ्या पहिल्या नोकरीच्या काळात. अप्रतिम कथा.

                पुढची कथा आहे " माझी गं - ती सासू " हे मनोगत आहे एका सुनंचं,  जिच्या आयुष्यात सासुचं योगदान खूप मोठं आहे.  यातल्या सुनेला आयुष्य कसं सुखदायी करायचं यासाठी मंत्र दिला तो सासुबाईंनी.  संसारातील सगळी कर्तव्य पार पाडत असतांना आपले छंद जोपासले तर जगणं आनंददायी होतं म्हणून गाणं शिकणं,पेंटींग, क्राफ्ट हे छंद जोपासायला प्रोत्साहन दिलं, अगदी मुलाला करुन वाढायच्या तशी गरम तव्यावरची पोळी सुनेला करुन वाढली. नाटकात काम करणं, निवेदन करणं यासाठी तयारी करायला वेळ दिला, वाचन कर,माहिती घे अशा सूचना दिल्या.  हे सगळं मला अद्भुत वाटतं. मुलीला काय करायचेत नसते छंद ,असं म्हणणार्या आया खूप बघितल्यात,  पण हे म्हणजे अतिशय आवडलं. मी सासू होणार नाही, पण होता होईतो शेजारीपाजारी किंवा मैत्रीणींना मदत नक्कीच करेन. 

     "मन पाखरु पाखरु " हा एक अप्रतिम लेख आहे, या विषयावर असं काही लिहीता येईल, असं हा लेख वाचेतो माझ्या मनातही आलं नव्हतं. एक अगदी छोटासा विषय, एक चित्रं: पूर्णपणे निष्पर्ण वृक्ष., मात्र त्याच्यावर एकमेकांकडे तोंड करुन बसलेले कितीतरी रंगीबेरंगी पक्षी आहेत.  या चित्राकडे पाहून लेखकाच्या मनात आलेले विविध विचार वाचून स्तिमित झाले. आपणच एक निष्पर्ण वृक्ष आहोत की काय? की आपण रंगीबेरंगी पाखरु आहोत? यातच एक विचार असा की आठवणी पण पाखरु असतात, यातच कबीराचे दोहे आठवून आयुष्याची दिशा दाखवणारे विचार मांडलाय. शेवटी तर निष्पर्ण झाडं ही प्राप्त परिस्थिती आणि संवादाची आवश्यकता अधोरेखित करणारे ते पक्षी!! किती सुरेख विचार !!!

         "सांगाती "  ही बहुदा सरांची आठवण सरिता असावी. मुरलेल्या लग्नानंतर एकमेकांना न बोलता,  न सांगता परिपूर्ण ओळखणारे ते दोघं  !! काॅलेजमधल्या प्रेमाची अलवार आठवण, एकमेकांच्या आवडीनिवडी जपणारे, तरीही छोट्या छोट्या गोष्टीत होणारे  रुसवा फुगवा,  मनवणं  हे इतकं अलवार,  तरीही रोमँटीक वाटत,  नवीन पिढीला ते अद्भुत वाटेल. 

       एक वेगळीच कथा म्हणजे " कुरकुरे " जुही चावलाची जाहिरात " टेढा है, पर मेरा है " नवरा आणि कुरकुरे याची अनोखी तुलना म्हणजे कुरकुरे!! तुम्ही वाचा, मी सांगत नाही.  

      " तुझं माझ्याकडे लक्ष नाही" 
        यात वेगवेगळे अनुभव लिहिलेत,  ते तुम्ही वाचा, मी वाचल्या नंतर "तुझं माझ्याकडे लक्ष नाही" यातले कितीतरी अनुभव माझ्या मनात आले. एकदा  सकाळी कामाची गडबड असते, तेव्हा सगळं आटोपून हाॅलमधे आल्यावर मी सासुबाईंना सूचना देत देत माझं आवरत होते, " थर्मासमधे काॅफी आहे, तुमच्या गोळया डबीत काढून ठेवल्या आहेत,  आज भाजी तुमच्या खास आवडीची नाही म्हणून आंबोशीचं लोणचं टेबलावर काढून ठेवलंय,  तेवढ्यात अहो पेपर वाचत बसले होते,  ते म्हणाले, " तुझं माझ्याकडे लक्ष नाही, अजून माझं आवरलं नाहीये, मी आज जात नाहीये ऑफिसमध्ये!!" याची आठवण झाली. तुम्हाला पण अशा कितीतरी गोष्टी आठवतील. 

      " आगळा दुरावा" ही आगळीवेगळी कथा आहे घटस्फोटित जोडप्याची!! त्या दोघांनी अगदी विचारपूर्वक घटस्फ़ोट घेतलेला आहे,  तरीही त्यांचे संबंध अगदी अलवार जाणिवेच्या पातळीवर असून, कोणतीही कटुता नाही. तिला राजकारणात करियर करायची होती आणि याला सैद्धांतिक गैरव्यवहार करणे मान्य नव्हते म्हणून घटस्फ़ोट घेतलेला होता. आजही एकमेकांची मतं आणि मनं जपणारे, एकमेकांना आपलं यशापयश मनापासून सांगणारे,  एकमेकांच्या कुटुंबाशीही छान संबंध ठेवणारे,  असे आगळेच नवराबायको आहेत यात. मला ही कथा अतिशय आवडली. खरंच माणसाने इतकं डोळस व्हायला शिकलं पाहिजे. 

         याव्यतिरिक्त इतरही लेख/ कथा अप्रतिम आहेत, यात जावं उजवं करणं कठीण आहे. पण लताच्या गाण्यात सुद्धा आपण अति आवडीची गाणी निवडतोच ना, तसे हे लेख मी निवडले.

        माझं लिखाण हा ट्रेलर माना आणि तुम्ही स्वतः सरांची पुस्तकं नक्की वाचा. 

       इतरही पुस्तकं वाचली आहेत, त्याविषयी लिहीतेय नक्कीच.

सुवर्णा भावे जोशी
चिपळूण .
११ एप्रिल २0२0

5 comments: