Wednesday, April 29, 2020

बहुआयामी प्रकाश पिटकर यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्र

Image © Prakash Pitkar...

 

*यमन - हुरहूर - कातरवेळ
नळसरोवर, गुजरात

यमन हा केवळ राग नाही
जगण्याची अनुरागी वृत्ती आहे
मनोमन जपलेल्या अपेक्षांचे
सार्थसे वर्णन आहे ....

ना वय, ना काळ
हा तानपुरा गूंजता असतो
'रंजिश ही सही'
स्वतःलाच सांगत असतो ....

'आज जाने की जिद ना करो'
असं कोणीतरी म्हणावं
हे कोणाला वाटत नसतं ?
मनाला मोकळं जरा सोडायचं असतं ....

'मंद झाल्या तारका'
तरी आणि तरीही मनोमन
'येरी आली पियाबिन'
रंगत असते .....

यमन हा वर्णनाचा विषय नसतो
ते विशेषण, क्रियाविशेषण असते
तानपुऱ्याला तानपुऱ्याने दिलेले
साथीदारासाठीचे रंजन असते ....
- चंद्रशेखर टिळक

गुंतवू म्हणून गुंतत नाही
सोडवू म्हणून सुटत नाही
इतर काय, अगदी स्वतःचेही नाही
मनाचे वागणे मनालाही कळत नाही ....

आयुष्यात कधीही काही
सहजासहजी मिळत नाही
कठीण तेच हवं असतं तरीही
मनाचे वागणे मनाला कळत नाही ...

हे असं सॉफ्ट..समोरच्याच्या मनाला सहज भिडणारं, लिहिणारा माणूस देशातला अत्यंत प्रखर बुद्धीचा, नामवंत अर्थपंडित आहे. देशातल्या अतिशय प्रतिष्ठित अशा एन.एस.डी.एल. (National Securities Depository Limited) या संस्थेचा कार्यकारी उपाध्यक्ष होता. मुंबई स्टॉक एक्सचेंज, सेबी अशा संस्थातून मोठा अधिकारी होता, यावर विश्वास बसेल काय? तर नक्कीच नाही. हा नुसताच अर्थतज्ञ नाही तर उत्तम प्रभावी वक्ता. त्याची अर्थसंकल्पावरची भाषणं ऐकायला हजारोंची गर्दी. अनेक पुस्तकांचा लेखक आणि व्याख्याता सुद्धा.

या मोठया माणसाला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. तसा मी देखील ओळखतो. खरं तर तो माझ्यापेक्षा तीनेक वर्षांनी मोठा असेल. माझ्याच कॉलेजचा. त्याला मी एकदाच दोन मिनिटाकरता भेटलोय. माझ्या अगदी जवळच्या मित्राच्या आणि सुप्रसिद्ध गायकाच्या - विनायक जोशीच्या मुलाच्या, गंधारच्या  लग्नात. तिथे कोणीतरी माझी याच्याशी ओळख करून दिली. तेव्हा तो मला नक्कीच ओळखत नव्हता. नंतर मात्र फेसबुकवरच्या लिखाणाद्वारे बहुतेक तो मला ओळखायला लागला. अधेमधे कमेंटसच्या माध्यमातून थोडंसं बोलणं व्हायला लागलं. थोडी ओळख वाढली. गेल्या वर्षी मग या भल्या माणसाने त्याची सात आठ पुस्तकं मला स्वखर्चाने हैदराबादला पाठवली. त्यानंतर असं काहीतरी झालं आणि पुढचे बरेच महिने मी ती पुस्तकं वाचू शकलो नाही का त्याला माझी कृतज्ञता व्यक्त करू शकलो.

त्याच्या लिखाणातून जाणवलेली त्याची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याचं अत्यंत ओरिजिनल असं भूमीवर असणं. तो डोंबिवलीचा. मध्यम वर्गीय घरात वाढलेला. सगळे बाळबोध संस्कार उत्तम मिळालेला. आयुष्यात आपल्या बुद्धिमत्तेच्या, व्यासंगाचा जोरावर आकाशाएवढी प्रगती करूनही, इतक्या मोठया उंचीवर राहूनही, हा काय सुरेख लिहितो बघा ...

कॉमर्स कॉलेजच्या वर्षांनी
शिकवले नाहीत
इतके आणि असे
अकाउंट्स आयुष्य
शिकवून गेले
गुरुदक्षिणा म्हणून
काही प्रश्न विचारून गेले ....

स्वभावाने गरीब राहिलो
सज्जन होतो, सज्जन राहिलो
समंजसपणे वागत राहिलो
हे संस्कारांनी शिकलो
असं असणं, असं वागणं
Goodwill की Contingent Liability
असा प्रश्न आयुष्य विचारून गेले ....

त्याच्या कवितेतून ... लिहिण्यातून मग हे सगळं लखलखितपणे दिसत राहतं. आपल्या पूर्वीच्या वातावरणाशी नाळ असलेलीं मनं मग त्याचं वाचून पार ओली होतात. मग त्याच्या घरचा लघुरुद्र असेल किंवा घरी केलेला आई-आजीच्या हातचा काही पदार्थ - हा माणूस इतका मोठा असूनही किती सुंदर लहान राहू शकतो. तो म्हणतो :

आजी, अजून एक
तू जशी बंद डब्याच्या झाकणावरून गोलगोल वारंवार हात
फिरवायचीस ना अगदी तसाच मनांच्या डब्यावर सारखं
बोट फिरवलं जातं गं
तलबंद कप्प्यातलं अगदी सांडलं नाही
तरी ओघळतं
निदान हिंदकळतं
मग जरा तरी गडबड होतेच गं
आजी,
तव्यावरचं साधं धिरडं सुद्धा किती मायेने
बसुन सुधारस
मामीनं काचेच्या मोठया बरणीत भरून ठेवलेला मोरावळा
तू अगदी आवडीने पीत असलेला रस ...

आजी,
तुझिया ती निर्मलता, स्निग्धता, माया
थेंबभर तरी आज माझ्या ओंजळीला ....

हा भला माणूस साधाच राहिला. अगदी पूर्वी होता तसाच. सगळीकडे अगदी सामान्य म्हणून फिरत राहिला. साहजिकच हजारो लोक त्याच्या आजूबाजूला जमत राहिले. आपलं घर, गल्ली, विभाग, त्याच्या कर्मभूमी डोंबिवलीने मग त्याला अत्युच्च सन्मान दिला. चंद्रशेखर टिळक म्हणूनच ग्रेट आहेत.
आज 'थेंब थेंब आयुष्य' या त्यांच्या कविता संग्रहातल्या कविता वाचल्या. ७६ कविता त्यात आहेत. यातली प्रत्येक कविता मनाला भिडणारी आहे. झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्या सारखी आहे. हा माणूस खऱ्या मातीतला - त्यामुळे त्याच्या मनातून येणारा प्रत्येक शब्द, विचार, काव्य नाजूक, सुंदर. मंद दरवळ असलेला.

शेखर सर - तुमचा अवघ्या मराठी मनाला - मातीला खूप अभिमान वाटतो. तुम्ही मराठी पताका आकाशात बुद्धीनं, तेजानं, मनाच्या सुंदरतेने फडकत ठेवली आहे. तुमच्याशी प्रत्यक्ष ओळख, हे माझं अहो भाग्य. तुम्हाला अत्यंत प्रेमाने, स्नेहाने आणि अर्थात आदराने वंदन.

काव्यसंग्रह - थेंब थेंब आयुष्य
कवी - चंद्रशेखर टिळक
संवेदना प्रकाशन - २५ डिसेंबर २०१७

(त्यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ कमेंटमध्ये दिलं आहे. दुसरं म्हणजे त्यांची अजून - वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं आहेत. नक्कीच लिहिणारे त्या सगळ्यांबद्दल)
© प्रकाश पिटकर

2 comments:

  1. मनःपूर्वक धन्यवाद प्रकाशजी पिटकर...

    ReplyDelete
  2. फारच छान!प्रकाशजी पिटकरांनी यथायोग्य वर्णन केले आहे.

    ReplyDelete