Monday, April 27, 2020

यश हे प्रयत्नांती असते ..... ( अर्थ आणि परमार्थ ...लेख पाचवा )

परमार्थ समजण्याची माझी कोणत्याही अर्थाने , कोणत्याही प्रमाणात जरासूद्धा कुवत किंवा क्षमता नाही .
गुंतवणूक क्षेत्रात मात्र अद्याप जवळजवळ ३२ वर्षांची नोकरी झाली . 

पण एक आहे या दोन्ही क्षेत्रांविषयी विचार करत असताना मला लोकमान्य टिळक यांच्या एका विधानाची सतत आठवण येते . लोकमान्य टिळक म्हणत असत की ...
" यश हे प्रयत्नांती असते ; वाच्यान्ति नव्हे ."

नाहीतरी ह. भ .प. श्री दासगणू महाराज यानी रचिलेल्या " श्री गजानन विजय " ( लोकप्रिय भाषेत गजानन महाराजांची पोथी ) या पोथीच्या  १५ व्या  अध्यायाच्या एकूण १४१ ओव्यांपैकी ओवी ९ ते १0८ अशा  ९९ ओव्या लोकमान्य टिळक यांच्याविषयीच आहेत ना! 
एखाद्या आध्यात्मिक पोथीत असे आणि इतके स्थान मिळवणारा लोकमान्य टिळक सोडले तर दुसरा कोणताही भारतीय राजकीय नेता नसेल .
असो .

असे क्रुतीशील प्रयत्न न करणाऱ्या मंडळीविषयी ( अर्थातच  पोथीतल्या ओवीला शेअरबाजार जराही अपेक्षित नाही हे उघड आहे .) या पोथीच्या ५ व्या अध्यायातील १0६ व्या श्लोकात एकदम झणझणीत अंजन घालण्यात आले आहे .
ती ओवी अशी ....
" तुझ्या सारखे निरुद्योगी
जन्मले आमच्यात जागोजागी 
म्हणून झालो अभागी 
आम्ही चहू खंडात ." 

त्यामुळे हे किटाळ टाळण्यासाठी कोणत्या मार्गाने जायचे आहे किंवा गेले पाहिजे याचा विचार करावाच लागतो .
यासाठी एक आचार - संहिता पाहिजे ...
आधी आखली पाहीजे .
आणि ती  सतत आचरणात आणली पाहिजे . 
याचे तुमच्या - माझ्या सारख्या प्रत्येकाला महत्व पटवण्यासाठी या पोथीच्या १९ व्या अध्यायाच्या १0६ व्या ओवीचा संदर्भ जरासूद्धा विसरता येणार नाही .
ती ओवी अशी आहे ...
" जो मार्गी चालतो नर 
महत्व त्याचे त्यास 
मार्ग असो कोणताही 
त्याचे मुळी महत्व नाही "||

असा विचार करत असताना आपण एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रात , त्यातही विशेषतः शेअरबाजारात सहभागी होत असताना या बाजारात तर राहायचे पण आपली वैचारिक तटस्थता सोडायची नाही हे पथ्थ्य न विसरता सांभाळत राहावे लागते . तरच या क्षेत्रात यशस्वी होता येते आणि यशस्वी राहताही येते . 
याबाबतचा अतिशय सुंदर द्रुष्तांत या पोथीच्या ६ व्या अध्यायात)ल्या  ६८ व्या ओवीत दिला आहे .
ती ओवी अशी आहे ....
" गार पाण्यात राहते 
परी न पाणी शिरू देते 
तैसेचि वागते साचे 
या प्रपंची माझारी || " 
ही ओवी इतकी स्वयं - प्रकाशित आहे की तिचे आणखी विवरण करण्याची आवश्यकताच उरत नाही .

हे जमवून आणणे सहज सोपे निश्चितच नाही . निदान आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी तर नाहीच नाही . कारण आपल्या सगळ्यांचीच अवस्था " आऊ गेली देवापाशी , चित्त तिचे चपलेपाशी |" अशीच असते . 
संत एकनाथ महाराज यांच्या अनेक भारुडाही त्याचं मोठं बोलके वर्णन वारंवार येत असते . 
पण हे जमणारच नाही असंही नसतं ना! 
त्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र करत राहावे लागते .त्याचे पहिले पाऊल म्हणजे काम करत राहणे .
हा पैलू या पोथीच्या ६ व्या अध्यायातली ११९ व्या ओवीत असा शब्दबद्ध होतो .,.........
" कर्ममार्ग सोडू नको 
विधी निरर्थक मानू नको 
मात्र त्यात होऊ नको 
लीप्त बाळा केंव्हाही || " .

यांत असणारी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आपले स्वतःचे मन . अगदी याच पोथीच्या ७ व्या अध्यायतली ७ वी ओवी ...
" मन सदा आशाळभूत
ते ना कदा स्थिर होत 
नाना विकल्प मनात 
येऊ लागती वरच्यावरी||" 
सांगते अशीच परिस्थिती ...

हे शेअरबाजारात तर सततच होत असते . कारण तिथे गंमतीने म्हणायचे तर लोकशाहीचा अतिरेक सुरू असतोच असतो . " नाना मती ,नाना रीती " अशी सदैव स्थिती तिथली ...
पण यांवर आपले मत अभ्यासान्ती तयार करून त्यावर स्थिर राहावे असे सांगताना या पोथीची ७ व्या अध्यायातली ५२ वी ओवी सहजच म्हणते ...
" जंबुकाच्या चेष्टेला
गजपती न मानी भला 
श्वानाचिया भुंकण्याला
व्याघ्र न दे किंमत  || " 
हे जमले नाही तर " दारीद्र्याचे मनीच्या मनी ,जाती जिरोनि मनोरथ " हे अटळ विधिलिखितच !!

अर्थातच अशा ओव्या लिहिताना संतकवी श्री .दासगणू महाराजांना गुंतवणूक क्षेत्र किंवा शेअरबाजार अभिप्रेत नव्हता हे अतिशय उघडच आहे . 
पण " वेळ " ही गोष्ट , आणि त्यातही " वेळ साधणे " ही गोष्ट आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आणि तेही प्रत्येक क्षेत्रात अतिशय महत्वाची ठरते .
 " Time is essence of contract " हा गुंतवणूक क्षेत्राचा पायाभूत सिद्धांत आहे .
त्याचे समर्पक वर्णन या पोथीच्या ४ थ्या अध्यायाच्या ११४ व्या आणि ११५ व्या ओवीत अशा शब्दांत येते ...
" तरुणपणी ब्रम्हचारी 
म्हातारपणी करसी  नारी 
अरे वेळ गेल्यावरी
नाही साधन उपयोगाचा || ११४||
जे करणे ते वेळेवर 
करावे की साचार 
घर एकदा पेटल्यावर
कूप खणणे निरर्थक ||११५|| "

असे प्रयत्न करताना वेळ जशी आणि जितकी महत्वाची आहे आणि असते ; तेवढीच आणि तितकीच नितांत गरज असते ती स्वतःच्या अपेक्षा अतिशय वास्तव ठेवण्याची !!!
हे संपूर्ण आयुष्याच्या बाबतीत लागू पडणारे आहे .
याला शब्दांकित करताना या पोथीच्या  २0 व्या अध्यायतली १४९ वी ओवी सांगत राहाते ...
" शक्याशक्य विचार 
सुद्न्ये करावा निरंतर 
उगीच पूल सागरावर
बांधावया जाऊ नये || " 

हे जमवायचे असेल तर 
" अहो साजेल ते बोलावे 
जे का पचेल तेच खावे 
उसने ना कधी आणावे 
अवसान ते अंगात || " 
या अकराव्या अध्यायाच्या १५३ व्या ओवीला आपल्या वर्तनाची  Standard Operating Procedure बनवण्यावाचून दुसरा पर्यायच उरत नाही .

आणि या सगळ्यांना सदैव पार्श्वभूमी पुरवत राहणारा मूलभूत भाग म्हणजे अशा वास्तव अपेक्षांसाठी अविरत प्रयत्न कुठे करायचे याचे सदैव जागरूक ठेवावे लागणारे  भान . 
तेही भान या पोथीच्या १३ व्या अध्यायतली २४ वी ओवी देत असते ...
" बीज पेरता खडकावर
ते वाया जाते साचार
त्यास कधी न येणार 
मोड हे ध्यानी धरावे ||२४||

अशा प्रयत्नांतून मिळणाऱ्या यशाची अपेक्षा मोठी ठेवण्यास काहीच आडकाठी नाही हे सांगायला ना गुंतवणूक क्षेत्र विसरत ; ना ही पोथी .
खोटे नाही सांगत ...
या पोथीच्या अध्यायाची १५0 वी ओवी नि: संदिग्धपणे सांगते ...
" कल्पव्रुक्षाच्या तळवटी 
बसून इच्छिली गारगोटी 
वा मागितली करवण्टि
कामधेनू पासून ||" 

आहे की नाही आचारसंहिता ....
क्षेत्र अर्थ असो नाहीतर परमार्थ ...
आणि या आचारसंहितेचा कायमस्वरूपी password म्हणजे लोकमान्य टिळक यांचे विधान  ......

"यश हे प्रयत्नांती असते ; वाच्यान्ति नव्हे ..."





१३ एप्रिल २०२०

No comments:

Post a Comment