Thursday, April 23, 2020

हिरे गारा एक्या ठायी. ( अर्थ- परमार्थ : लेख चौथा)

दासगणू महाराजांनी "श्री गजानन विजय" ही पोथी काही शेअर बाजार किंवा गुंतवणूक क्षेत्र डोळ्यांसमोर ठेवून किंवा डोक्यात ठेवून निश्चितच लिहिलेली नाही ; आणि श्रद्धेय गजानन महाराज यांचाही  दूरान्वयेसुद्धा या क्षेत्राशी संबंध नव्हता हे वेगळेपणाने सांगण्याची जरासूद्धा आवश्यकता नाही .

 पण या पोथीत काही काही ओव्या अशा आहेत की त्या ओव्या शेअरबाजारातल्या वातावरणाची अतिशय वस्तुनिष्ठ चर्चा करत आहेत असेच वाटते .
निदान मला तरी ....
अगदी दरवेळी .

असे वाटण्याची पहिली ठेच पहिल्याच अध्यायाच्या १0७ व्या ओवीत लागते .
ती ओवी अशी .,

" हिरे गारा एक्या ठायी
मिसळल्या असती जगा ठायी
पारखी तो निवडून घेई
गार टाकून हिऱ्या ते ."

आपल्याच अस नव्हे , तर कोणत्याही शेअरबाजारात , कोणत्याही काळात ,ज्या शेअर्सची उलाढाल होत असते ,उलटसुलट चर्चा होत असते त्याचे वर्णन , या ओवीच्या पहिल्या २ ओळीत जे वर्णन केले आहे त्याहून जास्त चपखलपणे करता येणे केवळ अशक्य आहे .


प्रश्न तो नाहीये .
खरा प्रश्न आहे तो या ओवीच्या तिसऱ्या आणि चौथी ओळींबाबत ...
या दोन ओळी ही शेअरबाजारात वावरत असताना बाळगण्याची आचारसंहिता ?
की या ओळी ही अपेक्षा ?
की
या ओळी ही वस्तुस्थिती ?
ह्याचे उत्तर ज्याचे त्यानी ज्याला त्यालाच दिलेले बरे !!!!

काही काही वेळेला तर या ओवीतल्या पहिल्या दोन ओळी हा निष्कर्ष वाटतो ; आणि शेवटच्या दोन ओळी या object clause किंवा Mission statement सारख्या वाटायला लागतात .
खर म्हणजे Need to have; आम्ही सोयीस्करपणे त्या Better to have असे मानलेल्या.

हे कळत नाही असे नाही .
ते वळत नाही हे जास्त खरे .
आणि हे एकदा मनोमन पटायला लागले ना या पोथीतल्या पहिल्या अध्यायतल्या १२0 व्या ओवीतली " व्यवहाराचा विसर पडला " ही सबब किंवा कारणमीमांसा न वाटता मला आपलेच वर्णन वाटायला लागते .

हे आपले अस सारखे होत राहते . आणि ते होत राहणार याची दासगणू महाराजांना इतकी खात्री आहे की ही दुनिया ( पर्यायाने हा शेअरबाजार )  कशी  आहे हे ते केवळ पहिल्याच अध्यायात फक्त एकदाच सांगून थांबत नाहीत . तर त्याच शब्दांत किंवा शब्द बदलूनही संपूर्ण पोथीभर परत परत सांगत राहतात .

उदाहरणच द्यायचे झाले तर  या पोथीच्या तिसऱ्या अध्यायातील ११२  वी ओवी ...
" जेथे साधू सज्जन
तेथेच मैंद निर्माण
हिरे गारा एकवटूनी
खाणीमाजी राहाती "
याचे काही वेगळे वर्णन करायला नको . नाही का ?

मला तर नेहमी वाटते की या पोथीच्या तिसऱ्या अध्यायातल्या अनेक ओव्या गुंतवणूक विषयक अभ्यासक्रमात Compulsory Readings म्हणून लावाव्या अशा आहेत .

मुळात अनेक गोष्टी एकाच ठिकाणी मिळत आहेत म्हणजे त्या पूर्णपणे जरी नाही तरी निदान बहुतांश प्रमाणात तरी सारख्या असतील अस मानण्याकडे आपल्या सगळ्यांचाच कल असतो ...
अगदी अध्यात्मात सुद्धा ...
म्हणून तर म्हणले जाते ना की आपण गुरु सुद्धा आपल्याला परवडेल - पेलवेल असा आणि असाच करतो ...
दासगणू महाराज तिसऱ्या अध्यायाच्य्या ११३ व्या ओळीत मस्त कान टोचतात.
ते लिहितात ...
" स्थान एक म्हणून
किंमत नाही समान
तेज हिऱ्याचे हिऱ्यालागून
भुषवी न गारेला || "

  अस सांगूनही आपली " कळले पण वळले नाही " ही व्रुत्ती- प्रव्रुत्ती फारशी पटकन बदलण्यातली नाही याची त्यांना इतकी खात्री आहे की  याचा काय परिणाम असतो हे ते लगेचच पुढच्या ओवीत सांगते होतात . तिसऱ्या अध्यायाच्या ११४ व्या ओवीत ते म्हणतात ...
" गार ती गार च राही
पायाखाली तुडवली जाई
ऐसी स्थिती कधी न येई
अमोलीक हिऱ्याला "

आपण कसे सुधारलो तरी ते सुधारणे  पक्के अर्धवट आणि तेही तात्पुरते .
जरा चर्चा झाली रे झाली की आपण तिथे गर्दी केलीच ...काहीही साधकबाधक विचार न करता ...याचे एकदम बरोब्बर वर्णन या पोथीच्या तिसऱ्या अध्यायातल्या ५ व्या ओवीत केले आहे ..
" मधु तेथे माश्या जमती
न लागे करणे आमंत्रण ." .

या दुनियेत आणि शेअरबाजारातही " भावे भेटतो उमापती " ( दुसरा अध्याय ,८९ वी ओवी ) हे खरे आहे ...एकाच अर्थाने आणि वेगवेगळ्या अर्थानेही.
दुनियेत  भाव म्हणजे मनोभाव
आणि शेअरबाजारात बाजारभाव !॥ ॥

हे ठरवत असताना स्थान - माहात्म्य कधीच फारसे महत्वाचे नसते . हे आता आपण अनुभवाने शिकत आहोत .
पण याआधीही असे अनुभव आले आहेतच की !!!
गडबडीच्या बाजारात आपल्याला नेहमीच सल्ला दिला जातो की अशावेळी Defensive Stocks किंवा shares घ्यावे ...
अशी क्षेत्रे म्हणजे पायाभूत सुविधा ( इनफ्रास्ट्रक्चर) , ग्रुहनिर्माण व त्यासंबंधी वित्तीय सेवा , औषधी कंपन्या ....
पण म्हणून काही ते त्या क्षेत्रातले काही सगळेच शेअर्स घेण्याजौगे नसतात ...
आपण आत्ता पाहातौच आहोत की काही कंपन्या अशा आहेत की या बाजारातही चीन सुद्धा त्यात गुंतवणूक करत आहे आणि त्या क्षेत्राच्या जवळपासच्या क्षेत्रातल्या काही कंपन्या अशा आहेत की त्या काराग्रुहाला घरपण देत आहेत .
अशावेळी या पोथीच्या तिसऱ्या अध्यायातल्या १४५ व्या ओवीची यथार्थता मनोमन पटत राहते .
" मोगरा , निवडुंग  , शेर
ही जमिनीची लेकरं
परी किंमतीचा प्रकार
निरनिराळा तो तिघांचा "

एकदा हे मनोमन जाणवायला लागले की ह्या पोथीच्या तिसऱ्या अध्यायातली ११५ वी ओवी जणूकाही आपण दरक्षणी स्वतःला सांगत राहावी असे वाटत राहाते ..,
"सोमला साखर मानू नये
विषा  जवळ करू नये
तस्करासी लेखू नये
निज कंठीचा ताईत "

सरतेशेवटी ,अशा पदोपदी कात्रजचे घाट असणाऱ्या , जागोजागी मयसभा असणाऱ्या , प्रत्येक ठिकाणी भुलभुलैय्या असणाऱ्या या शेअरबाजार नामक क्षेत्रात माझ्या - तुमच्या सारख्या  सर्वसामान्य व लहान गुंतवणूकदारांनी आपले स्वकष्टाचे पैसे गुंतवत असताना काय आचार - संहीता पाळावी हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल .( आणि या लेखमालेतच तसा लेख  लिहिण्याचा मी जरूर प्रयत्न करेन .)

तूर्तास या पोथीच्या तिसऱ्या अध्यायातील १५१ वी ओवी आवर्जून  लक्षात ठेवली पाहिजे .
ती ओवी अशी ....

"तेथे विचारा ठेवावे
अहर्निशि जाग्रूत .||





१२ एप्रिल २0२0

No comments:

Post a Comment