Tuesday, October 27, 2020

पोर्टफोलीओ मनेजमेन्ट :: एक मोकळी भाजणी.

 मोकळी भाजणी.

बोली भाषेत मोकळ भाजणी.

एक खमंग पदार्थ.

सर्व पंचेद्रियांना मनापासून सुखावणारा पदार्थ.

आपल्या महाराष्ट्राचा एक भाग ज्यावर आपली मक्तेदारी सांगेल असा पदार्थ.

अगदी या ना त्या स्वरूपात इतर ठिकाणीही हा पदार्थ केला जात असला तरी...


थालीपीठात कसे काहीही घातलं तरी चालत, कोणत्याही पिठाचे ते  लावता येते.भाजणीच हवी असे नाही . बरं हवं त्या पिठात हवं ते ( आणि नको ते ही!) ढकलता येते थालीपीठ करताना.... वादी- संवादी सूर व स्वर असा काही प्रकारच नाही तिथे.

माझा तर ठाम समज आहे की आदल्या दिवशीच्या थाळीत ( जेवणात हो) जे जे काही उरले आहे ते दुसऱ्या दिवशी पिठात कालवून जे थापले जाते त्याला थालीपीठ म्हणतात.

आणि अशा घटक पदार्थांचा  एकमेकांशी मेळ जितका कमी बसत असेल तितके त्यात कांद्याचे प्रमाण जास्त....


मोकळ्या भाजणीचे मात्र तसे नाही .

ती भाजणीचीच करावी लागते .

आणि भाजणीत मुळात सगळे घटक पदार्थ   चांगले भाजलेले असतात.

त्यांचं प्रमाण ठरलेले असतात.

सूपातून- जात्यातून पाखडून...

सगळे घटक पदार्थ  तावून सुलाखून निघालेले  असतात.

ते दळत असताना सुद्धा किति जाड दळायचे, किति बारीक दळायचे हे ठरलेले असते.

असले सगळे निकष पूर्णपणे जमले आहेत की नाही हे दुसऱ्या कोणी येऊन वेगळेपणाने सांगावे लागत नाहीत 

 कारण

मोकळ भाजणी करायला घेतल्यापासून त्याचा  येणारा वास आणी एक विशिष्ट आवाजच त्याची साद देत असतो.

आणि दाद मिळवत असतो.


त्यामुळे की आणखी कशामुळे हे मला नेमकेपणाने सांगता येणार नाही. पण दरवेळी मोकळ भाजणी खाताना मला गुंतवणूक क्षेत्रातल्या पोर्टफोलीओ मनेजमेन्टची हमखास आठवण येते.

मोकळ भाजणीच्या घटकांचे प्रमाण ठरलेले.

ठरवलेले.

अगदी पिढीजात .

कालानुरूप- व्यक्तीनुरुप- स्थितिनुरुप बदल, खरं म्हणजे, मान्य नसणारे प्रमाण.

शास्त्रोक्त- शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकणाऱ्या आणि शिकवल्या जाणाऱ्या आणि नंतर तहहयात तसेच वागणाऱ्या पोर्टफोलीओ मनेजमेन्ट मधे कुठे काय दुसरे होत असते ? 

पुन्हा दोन्हीकडे " अस का " अस विचारायची सोय नाही.

कारण " असं ( च) असतं ( च)  " हे उत्तर ठरलेले.... 

जमलेल्या मोकळ भाजणीला मनापासून दाद दिली की दरवेळी हमखास ऐकावे लागणारे!


मोकळ भाजणीच्या घटकांचे प्रमाण जसं ठरलेले... 

तसेच आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलीओचे ... 

शेअर्स किति, म्युच्युअल फंड किति, रियल इस्टेट किति, विमा किति, 

( सोनं किति हे मात्र ठरलेले नाही!)

यातलं प्रत्येक निवडून निवडून घेतलेले...


मोकळं भाजणीवर लोणी, ओल खोबरं, कोथिंबीर वगैरे देतात.

ते लागतेही चांगले.

पण खरं तर ते असच आपले डेकोरेशन.

आपल्या पोर्टफोलीओतल्या गुंतवणुकीत अचानक अंतरिम लाभांश ( इन्टेरिम डिव्हिडण्ड) मिळावा तसा...

आनंद द्विगुणित करणारा..

अस मिळालं तर खटकत नाही.

पण लागतही नाही.

निदान शंका तरी येत नाही कोणती... ताक कींवा मठ्ठा प्रकाराला कोथिंबीर- आल लावले की कशी शंका येते ताक मरणाचे आंबट आहे की काय !


आणि मोकळ भाजणीवर बाकी काही नाही तरी थोडं तूप घालून खाणे कींवा मोकळ भाजणी गँसवरून खाली उतरवताना त्यावर थोडं तूप पसरून घालण्याची काहीजणांकडे पद्धत आहे. 

हे म्हणजे अगदी सोने पे सुहागा...

एखाद्या शेअर ने एकाचवेळी मजबूत अंतिम लाभांश ( फायनल डिव्हिडण्ड) आणि भरघोस खास लाभांश ( स्पेशल डिव्हिडण्ड) , शिवाय त्याचवेळी बोनस शेअर्स द्यावेत अशातली गत.....


तसेच मोकळ भाजणी काय आणि पोर्टफोलीओ मनेजमेन्ट म्हणजे म्हणलं तर फेडरल स्टेट नाहीतर...

 परतून परतून मोकळे केलेले आणि  तरीही एकसंध राहिलेले ... 

एकमेकात गुंतलेले .

 तरीही स्वतःच वेगळं अस्तित्व जपणारे, 

प्रत्येकजण आपापला आब राखून असणारे

विभक्त एकसंधता

की 

एकसंध विभक्तता ?


एकंदरीतच काय

थालीपीठ हे वेगवेगळे पक्ष एकमेकांत विलीन होऊन काळाच्या ओघात कींवा दाबदबावाने एकजीव झालेले

( " धपाटे " हा पदार्थ ही तसा थालीपीठ प्रकाराला समानार्थी कींवा निदान समांतर! )

तर

मोकळ भाजणी म्हणजे एका स्वरात चाललेले आघाडी सरकार !!!


पोर्टफोलीओ मनेजमेन्ट ( Portfolio Management) हे थालीपीठ? की मोकळं भाजणी ?

की दोन्ही ?

की जमलं- जिंकले की मोकळ भाजणी ?

आणि नाहीतर थालीपीठ ?


खरं सांगू ?

थालीपीठ हे साजरे होणं आहे

आणि

मोकळ भाजणी हे साजरे करणं आहे.


आयुष्य काय कींवा गुंतवणूक काय...

हवी असते मोकळ भाजणी च!

थालीपीठ चालवून घेतो इतकेच

कोण म्हणे.... त्यातल्या त्यात.





21 ऑक्टोबर 2020 .

शिलालेख

" तू पाठवलेला ' बौद्ध धर्मातील स्त्रीदेवता " ' हा लेख वाचला. अप्रतिम आहे. असे काही त्याआधी असते हे माहीती असणे तर सोडूनच दे; कधी वाचलेही नव्हते. " 

" तुला वाचायला आवडेल याची खात्रीच होती. म्हणून तर तुला पाठवले. अगदी सकाळी सकाळीच. तुझ्या याबाबतच्या रिप्लाय ची वाट च पाहात होते. "

" एकदमच अनोखे आहे. ".

"इंडाँलाँजीत खूपच वेगवेगळ्या विषयांचा परिचय होऊन अंतर्मुखता येते. 

एकीकडे नवीन गोष्टी कळल्याचा आनंद तर दुसरी कडे वैभवशाली वारसा गमावल्याचे दुःख आणि खंत." 

" खरं आहे. हे आपापल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ही खरं आहे का ?

जे सांभाळायला हवे होते ते सांभाळू शकलो नाही; आणि टाळले असते तरी चालले असते तरी अस काही ना काहीतरी ( काहीतरीच) मात्र उरी कवटाळून राहिलो... नंतरचे शिलालेख " .

"प्रत्येकाच्या आयुष्यात हे सगळं येतच. वयाप्रमाणे संदर्भ, जाणिवा बदलत जातात, त्यावेळी घेतलेले निर्णय बरोबर ठरतातच असे नाही. Commission n omission ला जबाबदारही आपणच ठरतो. Introspection सुरु होते आणि चुका मान्य करण्याची प्रगल्भता ही येते."

" एकदम सहमत. "

" तसे तपासून पाहावे लागेल. वेळ लागणार नाही. "

" वेळ लागणार नाही. पण अवेळ झाली आहे ही जाणीव छळेल  का ? "

" शिलालेखाचे स्वरूप बदलेल.... "





18 ऑक्टोबर 2020.

Thursday, October 15, 2020

शेअरबाजारातल्या कावळे- चिमण्या

" कोरोना झिंदाबाद " च्या लॉक-डाऊन मुळे मार्च 2020 पासून गेले सात महिने आपण सगळे घरी आहोत.

मी तर मे 2020 पासून सेवानिवृत्त ( रिटायर) झालो असल्याने अगदी पूर्णपणे मोकळा... वर्क फ्रॉम होम सुद्धा नाही.

त्यामुळे इकडच्या- तिकडच्या गोष्टी निष्कारणच बघितल्या जातात आणि त्यांची सांगड मनोमन भलतीकडेच घातली जाते.

आता हेच बघा ना...

गेली कित्येक वर्षं खिडकीच्या जाळीत कावळे- चिमण्यांना काहीतरी खायला आणि प्यायला पाणी ठेवण्याची आमच्या घरी पद्धत आहे.... आपल्यापैकी अनेकांकडेही असणारच!

पण इतकी वर्षं स्वतःचा ब्रेकफास्ट सकाळी सात वाजता सुरू करण्याआधी ठेवले गेले तरी लक्ष जायचे नाही.

अनेकदा लक्षात यायचे नाही.

आता यायला लागले आहे.

आणि हेही लक्षात यायला लागले आहे की या कावळे- चिमण्यांच्या सवयी बऱ्याच बाबतीत शेअरबाजारा सारख्याच आहेत.


सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कावळे- चिमण्यांना ठेवायची आपली वेळ चुकली तर ते जाणीव करून देतात 

विशेषतः कावळे...

काव- काव सुरू त्यांची.

नेहमीच ज्या खिडकीत ठेवतो तिथे तर ओरडतातच.

पण आपल्या घराच्या इतर खिडक्याशी येऊन सुद्धा!

चिऊताईची पद्धत जरा वेगळी...

ती खिडकीच्या ग्रिल मधून आत येणार.

आणि खिडकीच्या काचेला बाहेरून चोच लावत अगदी मान मान वेळावून- वेळावून घरात बघत बघत राहणार.

हे त्यांचे वागणं पाहताना मला नेहमी, अगदी दररोज, गुंतवणूक क्षेत्राचे आद्य कुलगुरू बेंजामिन ग्राहम शेअरबाजाराचे वर्णन " मिस्टर मार्केट " अस करतात त्याची हमखास आठवण येते... 

दररोज वेगळी संधी घेऊन येणारा आणि आपल्याला साद घालणारा शेअरबाजार!

आदल्या दिवशी त्यांनी मारलेल्या हाकेला तुम्ही काय आणि कसा प्रतिसाद दिलात याचा जरासूद्धा विचार न करणारी ही मंडळी.... शेअरबाजार आणि कावळे- चिमण्याही!


इतकेच नाही काही!

आता हे दररोज बघताना अजून एक लक्षात आले आहे की आपण त्यांना दाणा- पाणी दररोज किति वाजता ठेवतो यांवर कावळे- चिमण्यांचे बरोब्बर लक्ष असते.

आपण त्यावेळी आपल्या खिडकीची काच उघडायच्या आसपास ते बाहेरच्या तारेवर कींवा पत्र्यावर येऊन बसलेले असतात.,.

अगदी हमखास...

स्टॉक- एक्सचेंज मधे दिवसाचे व्यवहार प्रत्यक्षात ट्रेडिंग सुरू व्हायच्या आधी "प्री-ट्रेड" ऑर्डर्स स्क्रीनवर घालून ठेवल्यासारखे!!!!

शेअरबाजार आणि कावळे- चिमण्या....


तसे अजून एक....

तुमच्या एक लक्षात आले आहे का असं दाणा- पाणी घ्यायला कावळे एकटे- दुकटे येत नाहीत. ते दुसऱ्या कावळ्यांना  बोलावून बोलावून घेतात... 

अगदी कावकाव करून...

दलालांनी  आपल्या ग्राहक- गुंतवणूकदारांना फोन करून करून सांगावं असं!

अर्थातच...

अशा बोलावण्यात काहीजणांना आपसूकच फायदा होतो.

कावळे काव- काव करून बोलावू इच्छित असतात त्यांच्या दुसऱ्या भाईबंदाना...

ते तर येतातच.

पण कबुतरं ही येतातच....बिन बुलाये मेहमान.. कारण त्यांचा खाक्या च मुळी " मान ना मान, मै तेरा मेहमान " असा असतो.

आता कबुतरं हे आपल्याला उद्देशून म्हणत असतात की कावळ्यांना हे काही उलगडत नाही पटकन.

शेअरबाजारात असे " बिन बुलाये मेहमान "असतातच की!!!


अजूनही एक....

जर दाणा- पाणी घ्यायला एक- दोन पेक्षा जास्त कावळे एकाचवेळी आले तर सगळे एकदमच घेत नाहीत. थोडे आधी घेतात आणि बाकीचे त्यावेळी आजूबाजूला लक्ष ठेवतात... असं मस्त आळीपाळीने सुरू असते...

शेअरबाजारात ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्याच्या ( FMCG ) शेअर्सचे बाजारभाव असेच वागतात नाही का!

कधी- कधी औषधी कंपन्यांचे शेअर्स आणि पायाभूत सुविधा कंपन्यांचे शेअर्स ही!

कबुतरांचि मात्र घिसाडघाई सुरू असते.

कोणीच कोणासाठी थांबायला तयार नसते.

एकाचवेळी अनेक बड्या स्टार्स चे सिनेमे रिलीज व्हावेत तसे...

शेअरबाजारात प्राथमिक बाजाराचे ( प्रायमरी मार्केट) नाते कावळ्यांपेक्षा कबूतरांशी जास्त जवळचे असावे.


कावळे आणि कबुतरं एकाचवेळी दाणा- पाण्यासाठी झगडत असतात तेंव्हा चिमण्या मात्र तिथे फिरकत नाहीत.

शेअरबाजार आणि म्युच्युअल फंड जोरात असताना सोनं आणि रियल इस्टेट शांत असावे तसे!


पण जर कबुतरं नसतील आणि फक्त कावळे च असतील तर मात्र चिमण्या त्यांचा मुक्त संचार करतात...

शेअरबाजारात वाहन उद्योगाचे शेअर्स जोरात असताना वाहन- पूरक उद्योगाचे ( auto-anciliaries) शेअर्स ही चालावेत असं!


माझ्या अजून एक लक्षात आले आहे की कावळे बहुतांश वेळा खिडकीच्या ग्रिल च्या बाहेरून अन्न टिपतात.

Bosch, Nestle सारखे मोठ्या भावांचे शेअर्स आपल्या नजरेत असावेत; पण हातात नसावेत तसे....

चिमण्या मात्र अगदी बिनधास्त खिडकीच्या ग्रिल मधून आत येत त्या फळीवर बसून दाणे टिपतात... Rallis, ITC, Castrol ,SBI च्या शेअर्स सारखे.,. आवाक्यातही आणि फायद्यातही !


त्यातही कावळे ग्रिलच्या आत येऊ शकत नाहीत असे नाही.

पण ते सहसा येत नाहीत.

आपला आब राखून असतात जणू काही..

एशियन पेन्ट्स, लार्सन -टुब्रो, एचडीएफसी, टीसीएस च्या शेअर्स सारखे!

कबुतरं आत येतातच ग्रिलच्या..

आणि सगळे घाण करून ठेवतात... कशाला उगाचच एखाद्या शेअर्स चे नाव घ्या।।।


चिमण्या- कावळे आणि शेअरबाजारात एक धमाल साम्य आहे.

कावळे अन्न टिपताना भसाड्या पद्धतीने चोच लावत सगळे पसरून ठेवतात... त्यांच्या चोचीची रचना, पोझिशनिँग, आकार यांचा तो परिणाम असावा....

संगोपन हा घटक....

चिमण्या मात्र  अस सुबकपणे टिपतात की आपण तिथे ठेवले होते की नाही अशी आपलीच आपल्याला शंका यावी.... आपली गुंतवणूक अशी असावी नाही का? 

त्रूप्त हौत्साते!!! !!!


तसे मध्यंतरी चिमण्या गायबच झाल्या होत्या.

पण आता दिसतात पुन्हां.

आता माझ्या लक्षात आलय की या अलीकडच्या काही काळात बराचसा चिमणी सारखाच दिसणारा पण पाठीचा रंग हिरवट असणारा आणि आकाराने चिमणी पेक्षाही लहान असणारा एक पक्षी येतो दाणे टिपायला....

सुस्वर गातौही तो...

चिमणी इतकाच बिनधास्त आहे.

पण जरा जास्त निवांतपणे उशीरा येतो...

शेअरबाजारात Emerging Bluechips असे असतात ना.... 

नीट लक्ष ठेवावे लागते त्यांच्यावर...

नाहीतर गल्लत होते!


कोरोना नंतरच्या लॉक- डाऊन मुळे प्रदूषण खूपच कमी झाल्यामुळे बरेच पक्षी पुन्हा कींवा नव्याने दिसू लागले आहेत असे जाणकारांचे म्हणणं आहे.

गुंतवणूक क्षेत्रात सुद्धा.....


शेअरबाजारात कावळे- चिमण्या..........





14 ऑक्टोबर 2020.

थालीपीठ.

शेखर, 

एक लक्षात ठेव.

आपले आयुष्य अगदी थालीपीठा सारखे असते.

आणि ते तसेच जगावे लागते.

तू कितीही चेष्टेने- गंमतीने- रागाने म्हणालास की आदल्या दिवशीच्या थाळीत उरलेले सर्व पदार्थ पिठात एकत्र कालवून केले जाते, त्या पदार्थाला थालीपीठ म्हणतात ....

 तरी प्रत्यक्षात आयुष्य तसेच असते रे! 

इतकेच नाही.

दिली वेळ साजरी करणे हे थालीपीठ आणि आयुष्य यांत प्रचंड साम्य आहे.

नुसती वेळ मारून नेत नाही...

छान साजरी करते वेळ थालीपीठ...

पटतंय ना !


एवढेच नाही..

बघ ना...

सहसा थालीपीठ खायला कोणी जेवणाचे ताट घेत नाही.

त्यासाठी बऱ्याच वेळी आपली ताटली....

आपले आयुष्य कुठे नेहमीच ताट असते.

पण

ताटली असली ना की थालीपीठ घेताना काळजी घ्यावी लागते.

गरम थालीपीठाचे दोन तुकडे एकदमच घेऊन चालत नाही.

कारण मग ते एकमेकांवर ठेवावे लागतात.

पण त्यामुळे त्यांना एकमेकांची वाफ लागते.

त्यात दोन्ही तुकडे सर्दट होतात.

मग काय करतात !

एकावेळी एकच तुकडा ताटलीत.

दुसरा तव्यावर.

अगदी तव्याखालचा गँस बंद केला तरी!

आयुष्याचा आनंद असाच पुरवून पुरवून घ्यायचा असतो रे!


आणी तुझ्या लक्षात आले आहे का

गँस बंद असला तरी त्यावरचा थालीपीठाचा तो दुसरा तुकडा आपोआपच गरम राहतो.

जास्तच कुरकुरीत- खुसखुशीत होतो...

पहिल्यापेक्षा थोडा का होईना पण वेगळ्या चवीचा...

आयुष्यात वेगळेपण अस आणता येते रे...


अजून एक...

थालीपीठ व्यावसायिक आयुष्यातलंही एक गणित सांगते...

बघ...

" रॉ मटेरियल " एकमेकांत मिसळून, मुरवून घ्यायचे; पण अनुभव नावाचं फिनिश्ड प्रॉडक्ट नाही.


आणि थालीपीठ प्रक्रियाही बघ...

ते परातीतल्या पिठाला " थोपटणे " आहे.

" धोपटणे " नाही.

कधी थोपटायाचे आणि कधी धौपटायचे हे थालीपीठ शिकवते रे!!!


तुला थालीपीठ अतिशय आवडते आणि मिळालेले आयुष्यही तू अतिशय समरसून जगतोस म्हणून हे सांगितले इतकेच !


विसरू नकोस थालीपीठ....






13 ऑक्टोबर 2020.