Tuesday, October 27, 2020

पोर्टफोलीओ मनेजमेन्ट :: एक मोकळी भाजणी.

 मोकळी भाजणी.

बोली भाषेत मोकळ भाजणी.

एक खमंग पदार्थ.

सर्व पंचेद्रियांना मनापासून सुखावणारा पदार्थ.

आपल्या महाराष्ट्राचा एक भाग ज्यावर आपली मक्तेदारी सांगेल असा पदार्थ.

अगदी या ना त्या स्वरूपात इतर ठिकाणीही हा पदार्थ केला जात असला तरी...


थालीपीठात कसे काहीही घातलं तरी चालत, कोणत्याही पिठाचे ते  लावता येते.भाजणीच हवी असे नाही . बरं हवं त्या पिठात हवं ते ( आणि नको ते ही!) ढकलता येते थालीपीठ करताना.... वादी- संवादी सूर व स्वर असा काही प्रकारच नाही तिथे.

माझा तर ठाम समज आहे की आदल्या दिवशीच्या थाळीत ( जेवणात हो) जे जे काही उरले आहे ते दुसऱ्या दिवशी पिठात कालवून जे थापले जाते त्याला थालीपीठ म्हणतात.

आणि अशा घटक पदार्थांचा  एकमेकांशी मेळ जितका कमी बसत असेल तितके त्यात कांद्याचे प्रमाण जास्त....


मोकळ्या भाजणीचे मात्र तसे नाही .

ती भाजणीचीच करावी लागते .

आणि भाजणीत मुळात सगळे घटक पदार्थ   चांगले भाजलेले असतात.

त्यांचं प्रमाण ठरलेले असतात.

सूपातून- जात्यातून पाखडून...

सगळे घटक पदार्थ  तावून सुलाखून निघालेले  असतात.

ते दळत असताना सुद्धा किति जाड दळायचे, किति बारीक दळायचे हे ठरलेले असते.

असले सगळे निकष पूर्णपणे जमले आहेत की नाही हे दुसऱ्या कोणी येऊन वेगळेपणाने सांगावे लागत नाहीत 

 कारण

मोकळ भाजणी करायला घेतल्यापासून त्याचा  येणारा वास आणी एक विशिष्ट आवाजच त्याची साद देत असतो.

आणि दाद मिळवत असतो.


त्यामुळे की आणखी कशामुळे हे मला नेमकेपणाने सांगता येणार नाही. पण दरवेळी मोकळ भाजणी खाताना मला गुंतवणूक क्षेत्रातल्या पोर्टफोलीओ मनेजमेन्टची हमखास आठवण येते.

मोकळ भाजणीच्या घटकांचे प्रमाण ठरलेले.

ठरवलेले.

अगदी पिढीजात .

कालानुरूप- व्यक्तीनुरुप- स्थितिनुरुप बदल, खरं म्हणजे, मान्य नसणारे प्रमाण.

शास्त्रोक्त- शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकणाऱ्या आणि शिकवल्या जाणाऱ्या आणि नंतर तहहयात तसेच वागणाऱ्या पोर्टफोलीओ मनेजमेन्ट मधे कुठे काय दुसरे होत असते ? 

पुन्हा दोन्हीकडे " अस का " अस विचारायची सोय नाही.

कारण " असं ( च) असतं ( च)  " हे उत्तर ठरलेले.... 

जमलेल्या मोकळ भाजणीला मनापासून दाद दिली की दरवेळी हमखास ऐकावे लागणारे!


मोकळ भाजणीच्या घटकांचे प्रमाण जसं ठरलेले... 

तसेच आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलीओचे ... 

शेअर्स किति, म्युच्युअल फंड किति, रियल इस्टेट किति, विमा किति, 

( सोनं किति हे मात्र ठरलेले नाही!)

यातलं प्रत्येक निवडून निवडून घेतलेले...


मोकळं भाजणीवर लोणी, ओल खोबरं, कोथिंबीर वगैरे देतात.

ते लागतेही चांगले.

पण खरं तर ते असच आपले डेकोरेशन.

आपल्या पोर्टफोलीओतल्या गुंतवणुकीत अचानक अंतरिम लाभांश ( इन्टेरिम डिव्हिडण्ड) मिळावा तसा...

आनंद द्विगुणित करणारा..

अस मिळालं तर खटकत नाही.

पण लागतही नाही.

निदान शंका तरी येत नाही कोणती... ताक कींवा मठ्ठा प्रकाराला कोथिंबीर- आल लावले की कशी शंका येते ताक मरणाचे आंबट आहे की काय !


आणि मोकळ भाजणीवर बाकी काही नाही तरी थोडं तूप घालून खाणे कींवा मोकळ भाजणी गँसवरून खाली उतरवताना त्यावर थोडं तूप पसरून घालण्याची काहीजणांकडे पद्धत आहे. 

हे म्हणजे अगदी सोने पे सुहागा...

एखाद्या शेअर ने एकाचवेळी मजबूत अंतिम लाभांश ( फायनल डिव्हिडण्ड) आणि भरघोस खास लाभांश ( स्पेशल डिव्हिडण्ड) , शिवाय त्याचवेळी बोनस शेअर्स द्यावेत अशातली गत.....


तसेच मोकळ भाजणी काय आणि पोर्टफोलीओ मनेजमेन्ट म्हणजे म्हणलं तर फेडरल स्टेट नाहीतर...

 परतून परतून मोकळे केलेले आणि  तरीही एकसंध राहिलेले ... 

एकमेकात गुंतलेले .

 तरीही स्वतःच वेगळं अस्तित्व जपणारे, 

प्रत्येकजण आपापला आब राखून असणारे

विभक्त एकसंधता

की 

एकसंध विभक्तता ?


एकंदरीतच काय

थालीपीठ हे वेगवेगळे पक्ष एकमेकांत विलीन होऊन काळाच्या ओघात कींवा दाबदबावाने एकजीव झालेले

( " धपाटे " हा पदार्थ ही तसा थालीपीठ प्रकाराला समानार्थी कींवा निदान समांतर! )

तर

मोकळ भाजणी म्हणजे एका स्वरात चाललेले आघाडी सरकार !!!


पोर्टफोलीओ मनेजमेन्ट ( Portfolio Management) हे थालीपीठ? की मोकळं भाजणी ?

की दोन्ही ?

की जमलं- जिंकले की मोकळ भाजणी ?

आणि नाहीतर थालीपीठ ?


खरं सांगू ?

थालीपीठ हे साजरे होणं आहे

आणि

मोकळ भाजणी हे साजरे करणं आहे.


आयुष्य काय कींवा गुंतवणूक काय...

हवी असते मोकळ भाजणी च!

थालीपीठ चालवून घेतो इतकेच

कोण म्हणे.... त्यातल्या त्यात.





21 ऑक्टोबर 2020 .

No comments:

Post a Comment