Thursday, October 15, 2020

शेअरबाजारातल्या कावळे- चिमण्या

" कोरोना झिंदाबाद " च्या लॉक-डाऊन मुळे मार्च 2020 पासून गेले सात महिने आपण सगळे घरी आहोत.

मी तर मे 2020 पासून सेवानिवृत्त ( रिटायर) झालो असल्याने अगदी पूर्णपणे मोकळा... वर्क फ्रॉम होम सुद्धा नाही.

त्यामुळे इकडच्या- तिकडच्या गोष्टी निष्कारणच बघितल्या जातात आणि त्यांची सांगड मनोमन भलतीकडेच घातली जाते.

आता हेच बघा ना...

गेली कित्येक वर्षं खिडकीच्या जाळीत कावळे- चिमण्यांना काहीतरी खायला आणि प्यायला पाणी ठेवण्याची आमच्या घरी पद्धत आहे.... आपल्यापैकी अनेकांकडेही असणारच!

पण इतकी वर्षं स्वतःचा ब्रेकफास्ट सकाळी सात वाजता सुरू करण्याआधी ठेवले गेले तरी लक्ष जायचे नाही.

अनेकदा लक्षात यायचे नाही.

आता यायला लागले आहे.

आणि हेही लक्षात यायला लागले आहे की या कावळे- चिमण्यांच्या सवयी बऱ्याच बाबतीत शेअरबाजारा सारख्याच आहेत.


सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कावळे- चिमण्यांना ठेवायची आपली वेळ चुकली तर ते जाणीव करून देतात 

विशेषतः कावळे...

काव- काव सुरू त्यांची.

नेहमीच ज्या खिडकीत ठेवतो तिथे तर ओरडतातच.

पण आपल्या घराच्या इतर खिडक्याशी येऊन सुद्धा!

चिऊताईची पद्धत जरा वेगळी...

ती खिडकीच्या ग्रिल मधून आत येणार.

आणि खिडकीच्या काचेला बाहेरून चोच लावत अगदी मान मान वेळावून- वेळावून घरात बघत बघत राहणार.

हे त्यांचे वागणं पाहताना मला नेहमी, अगदी दररोज, गुंतवणूक क्षेत्राचे आद्य कुलगुरू बेंजामिन ग्राहम शेअरबाजाराचे वर्णन " मिस्टर मार्केट " अस करतात त्याची हमखास आठवण येते... 

दररोज वेगळी संधी घेऊन येणारा आणि आपल्याला साद घालणारा शेअरबाजार!

आदल्या दिवशी त्यांनी मारलेल्या हाकेला तुम्ही काय आणि कसा प्रतिसाद दिलात याचा जरासूद्धा विचार न करणारी ही मंडळी.... शेअरबाजार आणि कावळे- चिमण्याही!


इतकेच नाही काही!

आता हे दररोज बघताना अजून एक लक्षात आले आहे की आपण त्यांना दाणा- पाणी दररोज किति वाजता ठेवतो यांवर कावळे- चिमण्यांचे बरोब्बर लक्ष असते.

आपण त्यावेळी आपल्या खिडकीची काच उघडायच्या आसपास ते बाहेरच्या तारेवर कींवा पत्र्यावर येऊन बसलेले असतात.,.

अगदी हमखास...

स्टॉक- एक्सचेंज मधे दिवसाचे व्यवहार प्रत्यक्षात ट्रेडिंग सुरू व्हायच्या आधी "प्री-ट्रेड" ऑर्डर्स स्क्रीनवर घालून ठेवल्यासारखे!!!!

शेअरबाजार आणि कावळे- चिमण्या....


तसे अजून एक....

तुमच्या एक लक्षात आले आहे का असं दाणा- पाणी घ्यायला कावळे एकटे- दुकटे येत नाहीत. ते दुसऱ्या कावळ्यांना  बोलावून बोलावून घेतात... 

अगदी कावकाव करून...

दलालांनी  आपल्या ग्राहक- गुंतवणूकदारांना फोन करून करून सांगावं असं!

अर्थातच...

अशा बोलावण्यात काहीजणांना आपसूकच फायदा होतो.

कावळे काव- काव करून बोलावू इच्छित असतात त्यांच्या दुसऱ्या भाईबंदाना...

ते तर येतातच.

पण कबुतरं ही येतातच....बिन बुलाये मेहमान.. कारण त्यांचा खाक्या च मुळी " मान ना मान, मै तेरा मेहमान " असा असतो.

आता कबुतरं हे आपल्याला उद्देशून म्हणत असतात की कावळ्यांना हे काही उलगडत नाही पटकन.

शेअरबाजारात असे " बिन बुलाये मेहमान "असतातच की!!!


अजूनही एक....

जर दाणा- पाणी घ्यायला एक- दोन पेक्षा जास्त कावळे एकाचवेळी आले तर सगळे एकदमच घेत नाहीत. थोडे आधी घेतात आणि बाकीचे त्यावेळी आजूबाजूला लक्ष ठेवतात... असं मस्त आळीपाळीने सुरू असते...

शेअरबाजारात ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्याच्या ( FMCG ) शेअर्सचे बाजारभाव असेच वागतात नाही का!

कधी- कधी औषधी कंपन्यांचे शेअर्स आणि पायाभूत सुविधा कंपन्यांचे शेअर्स ही!

कबुतरांचि मात्र घिसाडघाई सुरू असते.

कोणीच कोणासाठी थांबायला तयार नसते.

एकाचवेळी अनेक बड्या स्टार्स चे सिनेमे रिलीज व्हावेत तसे...

शेअरबाजारात प्राथमिक बाजाराचे ( प्रायमरी मार्केट) नाते कावळ्यांपेक्षा कबूतरांशी जास्त जवळचे असावे.


कावळे आणि कबुतरं एकाचवेळी दाणा- पाण्यासाठी झगडत असतात तेंव्हा चिमण्या मात्र तिथे फिरकत नाहीत.

शेअरबाजार आणि म्युच्युअल फंड जोरात असताना सोनं आणि रियल इस्टेट शांत असावे तसे!


पण जर कबुतरं नसतील आणि फक्त कावळे च असतील तर मात्र चिमण्या त्यांचा मुक्त संचार करतात...

शेअरबाजारात वाहन उद्योगाचे शेअर्स जोरात असताना वाहन- पूरक उद्योगाचे ( auto-anciliaries) शेअर्स ही चालावेत असं!


माझ्या अजून एक लक्षात आले आहे की कावळे बहुतांश वेळा खिडकीच्या ग्रिल च्या बाहेरून अन्न टिपतात.

Bosch, Nestle सारखे मोठ्या भावांचे शेअर्स आपल्या नजरेत असावेत; पण हातात नसावेत तसे....

चिमण्या मात्र अगदी बिनधास्त खिडकीच्या ग्रिल मधून आत येत त्या फळीवर बसून दाणे टिपतात... Rallis, ITC, Castrol ,SBI च्या शेअर्स सारखे.,. आवाक्यातही आणि फायद्यातही !


त्यातही कावळे ग्रिलच्या आत येऊ शकत नाहीत असे नाही.

पण ते सहसा येत नाहीत.

आपला आब राखून असतात जणू काही..

एशियन पेन्ट्स, लार्सन -टुब्रो, एचडीएफसी, टीसीएस च्या शेअर्स सारखे!

कबुतरं आत येतातच ग्रिलच्या..

आणि सगळे घाण करून ठेवतात... कशाला उगाचच एखाद्या शेअर्स चे नाव घ्या।।।


चिमण्या- कावळे आणि शेअरबाजारात एक धमाल साम्य आहे.

कावळे अन्न टिपताना भसाड्या पद्धतीने चोच लावत सगळे पसरून ठेवतात... त्यांच्या चोचीची रचना, पोझिशनिँग, आकार यांचा तो परिणाम असावा....

संगोपन हा घटक....

चिमण्या मात्र  अस सुबकपणे टिपतात की आपण तिथे ठेवले होते की नाही अशी आपलीच आपल्याला शंका यावी.... आपली गुंतवणूक अशी असावी नाही का? 

त्रूप्त हौत्साते!!! !!!


तसे मध्यंतरी चिमण्या गायबच झाल्या होत्या.

पण आता दिसतात पुन्हां.

आता माझ्या लक्षात आलय की या अलीकडच्या काही काळात बराचसा चिमणी सारखाच दिसणारा पण पाठीचा रंग हिरवट असणारा आणि आकाराने चिमणी पेक्षाही लहान असणारा एक पक्षी येतो दाणे टिपायला....

सुस्वर गातौही तो...

चिमणी इतकाच बिनधास्त आहे.

पण जरा जास्त निवांतपणे उशीरा येतो...

शेअरबाजारात Emerging Bluechips असे असतात ना.... 

नीट लक्ष ठेवावे लागते त्यांच्यावर...

नाहीतर गल्लत होते!


कोरोना नंतरच्या लॉक- डाऊन मुळे प्रदूषण खूपच कमी झाल्यामुळे बरेच पक्षी पुन्हा कींवा नव्याने दिसू लागले आहेत असे जाणकारांचे म्हणणं आहे.

गुंतवणूक क्षेत्रात सुद्धा.....


शेअरबाजारात कावळे- चिमण्या..........





14 ऑक्टोबर 2020.

1 comment:

  1. प्रज्ञा पावगीOctober 15, 2020 at 4:01 PM

    अफलातून !!!काय जबरदस्त निरीक्षण आहे तुझे शेखर. कावळे, चिमण्या, कबुतरे आणि त्यांची शेअरबाजाराशी घातलेली सांगड केवळ लाजवाब !!

    ReplyDelete