Thursday, April 16, 2020

अमृतांजन ...

मुंबई - पुणे महामार्गावरील १९० वर्षं जुना पण तरीही अजूनही भरभक्कम असलेला ( आणि तरीही की म्हणूनच उपयोगात नसलेला ) अमृतांजन पूल ४ एप्रिल २०२० रोजी पाडण्यात आला .ही बातमी आपण सगळ्यांनी त्यादिवशी आणि नंतरही अनेक चित्रवाहिन्यांवर पाहिली ...

ती पाहात असताना आणि तेंव्हापासून मनामधे अनेक विचार येत होते . असे विचार शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न .

ही बातमी देताना एका वाहीनीवर " पाडकाम " असा शब्दप्रयोग करण्यात येत होता . आपल्या मराठीत असा काही शब्द आहे हॆ निदान मला तरी माहीती नव्हते . असा शब्द आपल्या मराठीत  असल्यास मी माझ्या नसलेल्या अकले बद्दल मनापासून माफी मागतो .

दुसरा विचार म्हणजे , खरं तर या पूलाचा आणि अमृतांजन कंपनीचा तसा काहीही संबंध नाही . ना या कंपनीच्या मागणी वरून त्यावेळी हा पूल बांधण्यात आला होता , ना या कंपनीने त्या पूलासाठी आलेला खर्च प्रायोजित  होता . या कंपनीकडे या पूलाची टोल - वसूलीही असल्याचेही काही ऐकिवात नाही .( पुन्हा माझे अद्न्यान...आणि माफीही ). कारण मुळातच त्यावेळी असा काही आक्रुतीबंध ( Pattern अशा अर्थाने ) सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात अस्तित्वातच नव्हता .



तरीही या पुलाचे नामानिधान अमृतांजन पूल असं व्हायचे कारण म्हणजे या पुलाच्या डोक्यावर असलेला या कंपनीचा भला - थोरला बोर्ड . तो बोर्डही इतका मोठा की अगदी आंधळ्याला सुद्धा ऐन अमावास्येला दिसेल . घाटाच्या ऊन - वारा - पाऊस याला पुरून उरेल असा त्या जाहीरातीचा पाया ....आजकालचे बोर्ड वाऱ्याच्या झुळकीनेही पडतात ; पण अमृतांजनाच्या या जाहीराती बाबत असं कधी काही ऐकिवात नाही .

याबाबतची तिसरी गोष्ट म्हणजे या पुलाला अमृतांजन पूल हॆ नाव कोणत्याही सरकारी यंत्रणेने दिलेले नसून ते नाव लोकरहाटीतून पडले होते . अशी नावे पटकन विस्म्रुतीत जात नाहीत . कारण ही नाव त्या वस्तूच्या अस्तित्वावर अवलंबून नसतात ; तर जन - स्म्रुती वर अवलंबून असतात .
आणि जन - स्म्रुती अशाबाबतीत अल्पकालीक नसते .
( याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमच्या डोंबिवलीची  " झरण ची पाटी " )

याबाबतची चौथी गोष्ट म्हणजे जो प्रकार जाहीरातीचा ; तोच अनुभव पूलाचा . इतक्या वर्शानीही तो सुस्थितीत म्हणजे काय ?  गेली अनेक वर्षं तो वापरात नव्हता हॆ जरी मान्य केले तरी तो पूल अशा अर्थाने " धोकादायक इमारत " झाला होता म्हणून आत्ता पाडण्यात आलेला नसून त्याच्या आजूबाजूला नंतरच्या काळात आपण ज्या पद्धतीने रस्ते व इतर वाहतुकीची साधने निर्माण केली त्या साधनांची सुरक्षितता अडचणीत येऊ लागली हॆ आत्ता हा पूल पाडण्यात आला आहे हॆ इथे लक्षात घेतले पाहिजे .
प्रश्न असा आहे की हा पूल अद्याप सुस्थितीत कसा ? अलीकडेच बांधलेला रस्ता - पूल - फ्लायओव्हर हॆ खचतात - खड्डे पडतात - त्यावर पाणी साठते असा आजकाल सर्वपक्षीय अनुभव असणाऱ्या आजकालच्या पिढीला हॆ अविश्वसनीय वाटले हो ! !

याबाबतची पाचवी  गोष्ट म्हणजे जर हा पूल इतका चांगल्या स्थितीत होता तर नंतरच्या काळातील साधने बनवताना त्यांचे आरेखन ( प्लानिंग अशा अर्थाने ) करताना या पुलाचा उपयोग करून घेता आला असता का ( लिव्हरेजिंग अशा अर्थाने ) ?

याबाबतची सहावी  गोष्ट हा अमृतांजन  पूल अस्तित्वात असू दे नाहीतर नसू दे ; हा पूल आणि त्या पुलाशी अविभाज्यपणे निगडीत अमृतांजन विषयक शीर्षके हॆ एका विशिष्ट पिढीपर्यन्तच्या प्रवाशांच्या भाव - विश्वाचा अतूट असा धागा आहे . आता तो पूल अस्तित्वात नसला तरी तो धागा तूटणारा नाही . जसं स्टेशनचे नाव बदलले तरी अनेकांच्या  डोक्यातून आणि मनातून  व्ही टी स्टेशन , प्रभादेवी , चेन्नई हॆ जात नाही ,  तसं आहे हॆ !  ही मंडळी पुढची काही वर्षं तरी त्या जागेला अमृतांजन पूल च म्हणणार ....
अगदी मीही ....
आजच सकाळी मी माझ्या ड्रायव्हरला फोन करून सांगितले की सध्याची संचारबंदी पूर्णपणे उठली रे उठली की पहिल्यांदा काय करायचे तर अमृतांजन पूल  ..

याबाबतची सातवी गोष्ट म्हणजे हा पूल जसा अनेक पिढ्यांच्या भाव - विश्वाचा अविभाज्य भाग आहे ; तसा आणि अगदी तसाच , किंवा त्यापेक्षा काकणभर जास्तच अमृतांजनची बाटली हा अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे . कीतीजणांच्या उशी - पांघरुणाचा , बगचा , पर्सचा तो अत्यंत अत्यावश्यक घटक आहे ! असायचा !  डोकं दुखत असू दे नाहीतर नसू दे , आडवे पडताना कपाळाला बोटभर अमृतांजन चोपडण्याची दररोजची सवय किती पिढ्यांना होती कोण जाणे !
ही मागणी काळ - निरपेक्ष , वय - निरपेक्ष , लिंग - -निरपेक्ष , भूगोल - निरपेक्ष , उत्पन्न - गट निरपेक्ष असल्याच अनुभव आणि स्वानुभव आहे अनेकांना !
त्याप्रमाणात डोकेदुखीच्या - अंगदुखीच्या - निद्राभक्तीच्या औषधांचा खप कमी झालेला आहे .

याबाबतची आठवी गोष्ट म्हणजे गुंतवणूक क्षेत्र असं सांगते की अशी आणि इतकी जबरदस्त मागणी ज्या उत्पादनाला असते ती कंपनी आणि पर्यायाने त्या कंपनीचे शेअर्स तूफ्फान चालतात . हॆ अमृतांजन कंपनीला चपखलपणे लागू पडते . या कंपनीने आपली कारभाराची जागा मुंबईहून कित्येक दशकांपूर्वीच आत्ताच्या चेन्नईला ( पूर्वीचे मद्रास ) हलवली . विभागीय स्टॉक एक्सचेंज म्हणून या कंपनीच्या शेअर्सची नोंदणी ( लिस्टिण्ग ) आधी मद्रास स्टॉक एक्सचेंजवर आणि १९९० च्या दशकात ओव्हर दी काउंटर ( OTC ) एक्स्चेंजवर होती . या दोन्ही एक्स्चेंज वर ज्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या शेअर्सची उलाढाल नियमितपणे होत असे त्यातले सर्वात अग्रगण्य नाव म्हणजे " अमृतांजन "
ही कंपनी त्यावेळी एकास एक बोनस शेअर देण्यासाठी प्रसिद्ध होती . हिंदुस्थान लिव्हर या नामांकित विदेशी कंपनीने अमृतांजन कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न सुद्धा एकेकाळी केला होता . पण नाही झाले ते त्यावेळी असं काही !
काळाच्या ओघात अनेक कारणांनी ही दोन्ही स्टॉक एक्स्चेंज आपले अस्तित्व गमावून बसले .
 पण ही कंपनी आणि तिचे हॆ उत्पादन मात्र ....

याबाबतची नववी गोष्ट म्हणजे अमृतांजन हॆ औषध ज्या पद्धतीचे आहे त्या पद्धतीची इतर मलमे किंवा औषधे बाजारात त्यावेळीही येत असत आणि आजही येत असतात .
पण अमृतांजन ते अमृतांजन ....
त्याच्याविषयी त्या क्षेत्रात गंमतीने असं म्हणल जायचे की " या औषधाच्या नावातच अमृत आहे ..ते अजरामरच होणार आणि राहणार ..."

याबाबतची दहावी गोष्ट म्हणजे ही कंपनी मुंबईहून तेंव्हाच्या मद्रासला ( सध्याचे चेन्नई ) होण्यामागे काही व्यावसायिक वाईट अनुभव होते . आणि त्यामुळे तत्कालीन कंपनी प्रवर्तकानी हा निर्णय अंमलात आणला ....
आताचा हा पाडण्याचा निर्णय ....

इति श्री अमृतांजन ( पूल ) पुराणे .....





६ एप्रिल २०२० .

10 comments:

  1. माहिती आवडली, धन्यवाद

    ReplyDelete
  2. चन्द्रशेखर टिळकApril 16, 2020 at 3:37 PM

    आपला अभिप्राय जरूर कळवा.

    ReplyDelete
  3. अशा अनेक ऐतिहासिक ठेवींचा र्‍हास झालाय सर. आपण फक्त केविलवाणा प्रयत्न त्याचं अस्तित्व आठवण्याचा करू शकतो.... खुप छान वाटले वाचून..... अमृताजंण लाऊन ही कळ सोसता येणार नाही.... अमृत तुल्य लेखन केले

    ReplyDelete
  4. छान लेख आहे👍

    ReplyDelete
  5. खूप छान माहिती

    ReplyDelete
  6. खूप छान

    ReplyDelete
  7. मस्त माहितीपूर्ण लेख!!!

    ReplyDelete