Friday, April 17, 2020

लेखणी काढी अक्षर ( अर्थ आणि परमार्थ ....भाग दुसरा .)

आपल्या देशाच्या शेअरबाजाराविषयी विचार करायला लागले ना की मला  गजानन महाराजांच्या पोथीच्या पहिल्याच अध्यायात " लेखणी " चे जे वर्णन केले आहे ना तेच आठवायला लागते .
त्या अध्यायात नाही का म्हणले आहे ....
" लेखणी काढी अक्षर
परी तिच्यात नाही तो जोर
ती निमित्ताकारण साचार
लेखनरुपी कार्याला .¦¦"
( पहिला अध्याय , ३१ वी ओवी )

मला हॆ पूर्ण माहीती आहे आणि पक्के लक्षात आहे की या अर्थाने ही ओवी पोथीत लिहिलेली नाही .
त्याबाबत कोणाच्याही , कसल्याही , कोणत्याही भावना दुखावण्याचाही  माझा जरासुद्धा उद्देश नाही .


पण जे मनात येते ते असं काहीसं ....

आपण लिहायला बसतो . पण काहीवेळा आपले पेन ( लेखणी ) काही मनासारखी चालत नाही .
शाळेत वगैरे असताना आपण शाईचे पेन वापरायचौ . तेंव्हां असं झाले की पहिल्यांदा आपण पेनची निब तपासून पाहायचो. पेन उलटे उभे धरून त्यातल्या शाईचा प्रवाह ( फ्लो ) सीधा आहे ना हॆ पाहायचो . हॆ सगळे करूनही पेन नीट चालले नाही तर ते झटकून पाहायचो. तसं करण्यात पेन जरी चालले नाही तरी मागच्या - पुढच्याच्या अंगावर शाई उडायची !
तेवढीच उंगलबाजी !
मग अगदी कागदही सरळ सपाट करून बघायचो . पण पेनाचा नाठाळ घोडा काही वळणावर यायचा नाही ....
नेमका त्याचवेळी वर्गात शिक्षकांना महत्वाच्या नोट्स लिहून द्यायचा एकदम उत्साह यायचा ...
आपण लिहीत नाही हॆ पाहून फळ्याशेजारी उभे राहायची शिक्षा नशिबी यायची .
एरवी जराही ढुण्कुनही आपल्याकडे न बघणारी वर्गाची माधुरी दीक्षित शिक्षा झाल्यावर मात्र मान वळवून आपल्याला फिदिफिदी हसायची ....
अगदी त्यादिवशी शाळा सुटल्यावर रस्त्यातही ...
निदान तसं वाटायचे तरी ....
भासात आणि दुःखाचत  का होईना ,  चिडवण्या - खिजवण्यासाठी का होईना जिला मनोमन आपली मानली ती माधुरी आपल्याकडे बघते ....
नेमके दुःख कशाचे हेच अजूनही उलगडलेले नाही .

बरं , पुन्हा इतके होऊनही घरी दुसरे पेन मागायची काही सोय नसायची ...
आणि कहर म्हणजे भूताटकी झाल्यासारखे दुसऱ्या दिवशी तेच पेन व्यवस्थित चालायचे ....
आणि आपणही आदल्या दिवशीचा सगळा अपमान विसरून वर्गात हजर .....माधुरी की ....
आणि मग शनिवारी घरी गेल्यावर ते पातेल्यात पाणी घेऊन पेनाचे सगळे भाग सुटे करून ते पेन धुणे -- -फुंकर मारून मारून त्यातले पाणी काढणे ---- त्यात ती ड्रॉपर ने शाई भरणे ...

पुढे शाईच्या पेनची जागा बॉल - पेननी घेतली .
त्याची रीफील गंमत - जंमत करायची ...
त्यावेळी रीफील बदलली जायची .
आताच्या काळात पेनच बदलले जाते .

एवढे सगळे होऊन परीक्षेत मार्क मिळाले नाहीत की पहिली सबब ...."
उत्तर येत होते रे ; पण पेनाने दगा दिला ..."

आपण आणि शेअरबाजार यांचे नाते असंच आहे की नाही !
वरच्या परिच्छेदात प्रत्येक वेळी लेखणी या शब्दाच्या जागी शेअरबाजार हा शब्द घेतला की कसं गणित अगदी ताळा जुळल्यासारखे ....
आपल्याकडे वेळ , हिंमत , पैसा नसला की बाजारात संधी मुबलक ....
शेअरबाजार आपली लेखणी आणि वर्गातली ती आणि तीच माधुरी दीक्षित ! ! !

हॆ असं काहीतरी सुचायला लागले ना की असंही वाटते की १९९०च्या आधीचा " फ्लोअर - बेस्ड ट्रेडिंग " वाला आपला शेअरबाजार म्हणजे शाईचे पेन आणि सध्याचा " स्क्रीन - बेस्ड ट्रेडिंग " वाला आपला शेअरबाजार म्हणजे बॉल पेन ....

खरं म्हणजे असे आहेही आणि नाहीही .
हॆ मनोमन पक्के माहीती असते .
कळत पण वळत नाही असं ! ! !

आपण आपल्याला अपेक्षित निकाल ( रिझल्ट अशा अर्थाने ) मिळाला नाही की सरसकट शेअरबाजार या क्षेत्रावर खापर फोडतो ...
पण हॆ आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशातली गत आहे की नाही !
लिहिताना पेन चालले नाही यांत पेनाचा दोष किती आणि आपण त्याची किती काळजी किती घेतली आहे की नाही याचा दोष किती हॆ कसे आणि कोणी ठरवायचे ?

" लेखणी काढी जोर ¦ परी तिच्यात नाही तो जोर ¦¦  " हा  शब्द - प्रयोग कशा अर्थाने घ्यायचा हॆ त्याचेच उदाहरण आहे .
शेअरबाजाराने पैसा मिळू  दिला नाही असं म्हणताना आपण सरसकट बाजारात नाही तर त्यातल्या एखाद्या - दुसऱ्या कंपनीच्या शेअर्समधे आपले पैसे गुंतवलेले असतात . त्या कंपन्यां चालल्या , आणि आपण त्यात योग्य वेळी पैसे गुंतवले तरच आपल्याला पैसे मिळणार .
या कंपन्यांचा एकत्रित जोर तो या बाजाराचा जोर .
आपली भक्ती --आपली निष्ठा याचा जोर किंवा कमजोर हा परमार्थाचा जोर किंवा कमजोर !
अशी गुंतवणूक करण्याचे तंत्र - मंत्र आपण अनुभवातून शिकत राहतो . त्याचे मार्गदर्शन अनुभवी गुरु करत राहतात .
त्याचे वाचन - चिंतन - मनन - अनुकरण आपण जसे आणि जितके करू तसं आणि त्या प्रमाणात आपले यश - अपयश ठरत राहते .
अशा अर्थाने ते गुरुक्रुपा आणि गुरुनिष्ठेचे ते फल असते ..
या अर्थाने
" लेखणी काढी जोर
परी तिच्यात नाही तो जोर
ती निमित्ताकारण साचार
लेखनरुपी कार्याला ¦¦ "

अशावेळी सुप्रसिद्ध गुंतवणूक तद्न्य पीटर लिंच म्हणतात ना की " बाजार म्हणजे बाजारामध्ये किंवा बाजारामागे  उभ्या असणाऱ्या कंपन्या . त्यांची कामगिरी म्हणजे बाजाराची कामगिरी . "
( याबाबतची सविस्तर माहीती राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आणि सध्या १५ `वी आव्रुत्ती सुरू असलेल्या माझ्या " गुंतवणूक पंचायतन " या पुस्तकात मिळेल .)
त्याबाबतच्या आपल्या कार्यवाहीच्या कामगिरीवर आपला निकाल  अवलंबून असतो .( यासाठी सहाय्यभूत अशा अनेक घटकांची चर्चा राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या , सध्या तिसरी आव्रुत्ती सुरू असलेल्या आणि ज्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे अशा माझ्या " मार्केट मेकर्स " या पुस्तकात दिली आहे .)
जो प्रकार शेअरबाजाराचा , तोच प्रकार म्युच्युअल फंडाचा आणि पेन्शन फंडाचाही !
श्री .म . माटे म्हणतात ना ...." देश म्हणजे देशातली माणसं " तसं आहे हॆ !

असं झाले ना की पहिल्या अध्यायाच्या १२ व्या ओवीत
" जग , जन , जनार्दन
तूच एक परिपूर्ण ¦¦ "
असं म्हणलय त्याचे सगळे संदर्भ आपल्याशी सुरू होऊन आपल्याशीच संपतात असं वाटायला लागते .
भल्या आणि बुऱ्या अशा दोन्ही अर्थांनी !

हॆ कठीण नाही .
उगाचच  या पोथीच्या पहिल्या अध्यायातल्या २१ व्या ओवीत म्हणल नाही की ...
" तुला अशक्य काही नाही
अवघेंच आहे तुझ्या ठायी ¦¦ "
हॆ त्या पोथीत परमेश्वर आणि संत यांच्या विषयी सांगितले आहे इतकेच !
" तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार ..."

हॆ असं वरचेवर , वारंवार , पुन्हा - -पुन्हा , परत - परत आठवायला आणि जाणवायला लागले की या पोथीच्या विसाव्या अध्यायात पुन्हा लेखणीचे ( पर्यायाने शेअरबाजाराचे )  जे वर्णन केले आहे ते अगदी मनोमन आणि मनापासून पटायला लागते ...
विसाव्या अध्यायाची २०६ वी ओवी अशी आहे ....
" ती लेखणी ज्याच्या करी
तोच अक्षरे काढी सारी
निमित्ताकारणे होते खरी
लेखणी तो लिहावया ¦¦ "

कारण २० व्या अध्यायाच्या २०५ व्या ओवीतही सांगितले आहेच की
" लेखणीने अक्षर लिहिले
परी ते न तिचे सामर्थ्य ¦¦ "
 लेखणी काय किंवा शेअरबाजार काय ते साधन किंवा माध्यम आहे . आणि यातले काहीच स्वयंचलीत नाही हॆ त्रिकालाबाधित सत्य आहे .

लेखणी काढी अक्षरा ....





८ एप्रिल २०२०

3 comments:

  1. नेहमी प्रमाणे छान

    ReplyDelete
  2. अभिप्राय जरूर कळवा ....कॉमेंट च्या रूपाने .

    ReplyDelete
  3. सर खूप छान , मोजकेच पण अचूक .. नेहमीप्रमाणेच

    ReplyDelete