Tuesday, April 14, 2020

बहुरुप्याचे राजेपण . ( अर्थ आणि परमार्थ ....भाग पहिला .)

आज सकाळीच एका वर्गमित्राचा मेसेज आला ...." अरे , आज आपला शेअर बाजार वर आहे ...कालही होता."
त्याच्या विचारण्याचा अर्थ असा होतात की तू तर म्हणत होतास की सध्या शेअरबाजार हॆ क्षेत्र वादळी आहे .म्हणजे तुला काय आणि किती कळत हॆ कळले .
अगदी कळून चुकले .

काय आणि कसं माहीती नाही . पण त्याला उत्तर देताना मी म्हणून गेलो ..." हॆ बहुरुप्याचे राजेपण न ठरो हीच सदिच्छा ."

मी त्याला हॆ उत्तर तर दिले .
पण मग लक्षात आले की ह .भ .प . श्री दासगणू महाराज रचित " श्री गजानन विजय " या पोथीच्या ( लोकप्रिय भाषेत सांगायचे तर गजानन महाराज पोथीच्या ) दहाव्या अध्यायात ही १६१वी  ओवी आहे .

ती ओवी अशी आहे ....
" बहुरुप्याचे राजेपण
कोठून टिके बाजारी "

अर्थातच ही ओवी लिहिताना काही शेअरबाजार कोणाला अभिप्रेत नव्हता हॆ अत्यंत उघड आहे . त्यामुळे असं उत्तर मी दिल्यामुळे अतिशय अपराधी वाटायला लागले.
 शेअरबाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करताना अनेकांना वाटते तसे ....
एकदा सरावले की काही अपराधी वाटत नाही .
चटावतात एकदम ....
म्हणजे हॆ अपराधीपण एक वेगळ्या (च ) तर्हेचे " बहुरुप्याचे राजेपण " ...

हॆ अपराधीपण ताजे असतानाच असं जाणावयला लागले की गजानन महाराजांना आणि अगदी दासगणू महाराजांनाही जरी ते अभिप्रेत नसले तरी या पोथीमधल्या अनेक ओव्या शेअर - बाजाराच्या संदर्भात एकदम चपखलपणे लागू पडतात .

....असाच प्रयत्न करणारी ही लेखमाला .




आता हेच बघा ना ....

"बहुरुप्याचे राजेपण
कोठून टिके बाजारी ."
या ओळी कोणत्याही काळातील , कोणत्याही स्थितीतल्या , कोणत्याही देशातील शेअर - बाजाराचे हॆ किती यथार्थ वर्णन आहे .

आजमितीला आपल्या शेअर - बाजाराचा निर्देशांक अशा पातळीवर आहे की " त्याबाबत जरा नीट विचार करा " असे कोणी कोणाला सांगायला गेले तर निदान ऐकून घेतील . पण दरवेळी अशी स्थिती असतेच असं नाही ना ! ! !
सध्याच्या परिस्थितीत खराखुरा राजाही बहुरुपी नाही ना अशी शंका वाटायला लागते . पण आपल्याला जरी शंका आली तरी खरा राजा काळाच्या कसोटीवर राजा ठरतो .
ठरतोच .
पण एकंदरीतच चढत्या बाजारात तेजीत असणारे अनेक शेअर्स  अशा ऐन कसोटीच्या प्रसंगात असे काही आपटतात की सध्या रस्त्यांवर निष्कारण
फिरणाऱ्याच्या पार्श्वभागावर पोलिसांनी मारलेली दांडूके परवडले असं म्हणण्याची वेळ येते .
अशा वेळी राजाचे बहुरुपी व्यक्तिमत्व आणि बहिरूप्याचे राजेपण यातला फरक ठळक होत जातो .
अशा अर्थाने " बहिरूप्याचे राजेपण , कोठून टिके बाजारी ...."

तेजीच्या शेअरबाजारात हौसे - नवशे - गवशे असे शेअर्स आणि गुंतवणूकदार असे दोघेही एकदम दिमाखात , तोऱ्यात मिरवत असतात . कारण अशा बाजारात इंद्राचा ऐरावत आणि शामभट्टाची तट्टाणि या दोघांचेही भाव चढे असतात . त्यामुळे अशा बाजारात एखादा शेअर घेताना जरी चूक झाली तरी ती चूक अशा चढ्या बाजारात निस्तरताना सुद्धा नफा पदरी पडू शकतो . निदान नुकसान तरी बेताचेच होते .
पण हॆ सदा सर्वकाळ नसते ...
अशा अर्थाने " बहुरुप्याचे राजेपण ...."

आणि म्हणूनच अशा बाजारात वावरताना याच पोथीच्या तिसऱ्या अध्यायातली ९९ व्या  ओवीची सदैव आठवण ठेवणे अत्यावश्यक आहे . अगदी खूणगाठ ..
ती ओवी अशी ....
" म्हणून बहुरुप्या कारण
जपणे आहे अवश्य जाण
उगीच पाहून पिवळेपण
सोने पितळेस मानू नका ! "

उतरत्या बाजारात सोने आणि पितळ यातला फरक उघड होत राहतो . तेजीच्या बाजारात पितळ बहुरुप्या सारखे सोने म्हणून कितीही वावरले तरी राजा तो राजा ....बहुरुपी तो बहुरुपी ...
या " व्यवहाराचा विसर पडला " ( पहिला अध्याय ) ही वस्तुस्थिती आणि तीही वारंवार ची वस्तुस्थिती व्हायला लागली की केवळ आर्थिक दैन्यावस्था येते असं होत नाही ना !  अब्रू जाणे ; निदान बदनामी होणे हेही फार लांब राहात नाही ना !
याच पोथीच्या ९ व्या अध्यायातल्या ३८ व्या ओळीत म्हणले आहे तसे ....
"अब्रूदारास अपमान
वाटे मरणाहून मरण "
हा तर आपणच आपलाच केलेला अपमान ...म्हणजे तर आणखीनच घोळ ...

सदा सर्वकाळ , तिन्हीत्रिकाल कसोट्यावर उतरतो तो राजा .
बाकीचे सगळे बहुरुपी .
बहुरुपी एखाद्या क्षणाला असं काही बेमालूम काम करून जातो की तो त्या क्षणाला खरंच राजा वाटतो .
तो राजा वाटतो .
तो राजा नसतो .
तो असतो फक्त बहुरुपी .
शेअर - बाजार तर स्वतःच एक मोठा बहुरुपी आहे ....अगदी सर्वार्थाने ...
त्यामुळे या अपरिहार्य असणाऱ्या गुंतवणूक माध्यमात कार्यरत असताना नीर -क्षीर विवेकाने स्वतःच स्वतःलाच सतत समजावावे लागते ...सतत  ..
" बहुरुप्याचे राजेपण ¦ कोठून टिके बाजारी "

( याची अगदी लगेचच प्रचिती आली .

या लेखाचे कारण ठरलेला मेसेज आज सकाळी आला तेंव्हां मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक ९८० अंशांनी वर होता . तोच निर्देशांक त्याच दिवशी बाजार बंद होताना १८० अंशांनी खाली आला होता . म्हणजे एकाच दिवसात ११६० अंशाचा उतार ....." बहुरुप्याचे राजेपण "

आजकाल दिवसभरात १००० -१२०० अंशांचे चढ - उतार ही काय नवलाईची गोष्ट राहिलेली नाही अशाही अर्थाने " बहुरुप्याचे राजेपण ......"

उद्याचे काय सांगावे  ?  कदाचित या नाटकाची नवीन वेगळीच संहिता असेल अशाही अर्थाने " बहुरुप्याचे राजेपण ....." )








८ एप्रिल २०२०.

9 comments:

  1. तुमच्या लिखाणातले वेगळेपण म्हणजे काय ते हे की पोथीतली ओवी चपखल बसते.‌व हे दाखवण्यासाठी तुमचंच कसब लागत

    ReplyDelete
  2. सुंदर लेख
    अध्यात्मिक आणि व्यावहारिक गोष्टींची सांगड छान जमली आहे

    ReplyDelete
  3. खूप छान लेख.पुढच्या लेखाची वाट बघतो

    ReplyDelete
  4. प्रतिक्रिया- अभिप्राय जरूर कळवा.

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेख

    ReplyDelete
  6. खरच छान .waiting for next...

    ReplyDelete