Sunday, June 21, 2020

" चाल " बाज चीन.


गेले काही दिवस आपला देश आणि चीन यांच्या सीमारेषेवर सुरू असलेल्या घटना चर्चेत आहेत. ही अशी चर्चा होणे हे स्वाभाविकच आहे. 

पण केवळ इतकीच त्याची स्वाभाविक सहजता असावी कींवा असेल?
आपले तीन आणि वीस ; आणि त्यांचे त्रेचाळीस एवढ्या पुरेसे ते मर्यादीत असेल कींवा आहे ? 
1967 नंतर पहिल्यांदाच या सीमारेषेवर सैनिकांची जीवीतहानी झाली हे त्याचे एकमेव वैशिष्ट्य असेल कींवा आहे ?
1967 ते 2020 या 53 वर्षांच्या काळात भारतीय व चीनी लष्कर एकमेकांच्या समोरासमोर आल्यावर फक्त शारीरिक रेटारेटी असं त्यांचं स्वरूप मर्यादीत असताना आता अचानक- एकदम लाकडी सोटे आणि तेही अणुकुचीदार वायरी गुंडाळलेले  कुठून आले? 
स्थानिक चीनी लष्करी आधीकाऱ्याने  स्वतःचे डोके वापरून स्वतःच्या आधिकारात उपयोगात आणण्या इतपत स्वातंत्र्य  अशा संवेदनशील सीमारेषेवरच्या स्थानिक  लष्करी आधिका ऱ्याला , आणि तेही चीनी आधिकाऱ्याला असते कींवा असेल ?

साहजिकच या सगळ्या प्रश्नांची  उत्तरे नकारार्थी आहेत.
असं असेल आणि आहे तर प्रश्न हा आहे की  आत्ताच असं काय झाले की त्रेपन्न वर्षात जे झाले नाही ते आज व्हावे ?
"कोरोना ( कोवीद 19 )  आणि त्यानंतर..."  हे त्याचे ढोबळ कारण असले तरी ज्याला आपण Last Straw on Camel' s back म्हणतो  असं गेल्या काही दिवसांत काय झाले ? 
कारण कोरोना हे कितिही काळ-काम- वेगाचे गणित असले तरी ते एका अर्थाने  चार- पांच महिने जुने झालेले गणित आहे.

असा विचार करत असताना जाणवलेल्या या काही गोष्टी....

याबाबत मला जाणवणारी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी अलीकडेच आपल्या देशाच्या परकीय चलनांच्या साठ्याने ( फॉरेक्स रिझर्व्ह) गाठलेली  500 बिलियन डॉलर्स ची पातळी. 
स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातली हीं सर्वात जास्त अशी विक्रमी पातळी आहे. 
( या पातळीची कारणमीमांसा आणि संभाव्य परिणाम याची सविस्तर चर्चा माझ्या यु ट्यूब चेनेल वर कालच म्हणजे 19 जून 2020 रोजी लोड केलेल्या विडिओ मधे मी केली आहे. त्याची लींक...YouTube Link (click to see) .

तसं पाहायचं तर आपल्या देशाच्या अशा अभूतपूर्व विक्रमी पातळीवर पोचलेल्या परकीय चलनांच्या साठ्याच्या कित्येक हजार पट मोठा असा परकीय चलनांचा साठा चीनकडे आहे. आणि तसा तो गेले कित्येक वर्षं आहे. आणि कोरोनानंतरच्या अर्थकारणातही त्यात फारसा फरक पडलेला नाही. निदान फार मोठा फरक तरी नक्कीच पडलेला नाहीच नाही.
असं असूनही चीनने असें लष्करी द्रुष्टीने आक्रमक का व्हावे हे समजून घेणे आवश्यक आहे. चीनच्या द्रुष्टीने  भारताच्या  परकीय चलनांच्या साठय़ात होणारी वाढ ही " म्हातारी मेल्याचे दुःख नाही; काळ सोकावतो आहे " अशा स्वरूपाची आहे. 
निदान असावी. 



" चाल " बाज चीन चा हा पहिला अर्थ....
एकीकडे कोरोनाने जागतिक अर्थकारणाचे कंबरडे मोडले आहे असे जगभरातले अनेक देश स्वतःचे गार्हाणे वेशीवर मांडत सांगत आहेत... अगदी Claiming from the Roof Top असं! अनेक जागतिक वित्तसंस्था  आणि पतमापन संस्था ( क्रेडिट रेटिंग  एजन्सी) सध्या सुरू असलेल्या आणि पुढच्या आर्थिक वर्षात अनेक देशांचे राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न (जीडीपी ) वाढणे तर सोडूनच द्या; कमी झालेले असेल असे वारंवार सांगत आहेत. 
" गावंढ्या गावात गाढवी सवाशीण " सारखे त्यातल्या त्यात  चीनचे राष्ट्रीय उत्पन्न या काळात  मर्यादीत का होईना पण सकारात्मक वाढ दाखवेल असा अंदाज या संस्थांनी वर्तवला आहे. त्याखालोखाल जर कोणाची स्थिती त्यातल्या त्यात जगभरात  बरी असेल तर ती  आपल्या देशाची आहे कींवा असेल असे याच वित्तसंस्था सांगत आहेत... ( " गिरे तो भी टांग ऊपर "ची सकारात्मक स्थिती)!
अशावेळी जगभरातले अनेक देश आर्थिक द्रुष्टीने अक्षरशः देशोधडीला लागत असताना आपल्या देशाचा परकीय चलनांच्या साठ्यांची पातळी विक्रमी टप्पा गाठणे हे चीनला अनेक कारणांनी डाचत असणं हे स्वाभाविक आहे. ही गाडी " डिरेल " करण्याची चाल म्हणून या घटना सीमारेषेवर घडत असाव्यात.

Friday, June 19, 2020

न्याय

 तुझी आर डॉक्युमेंट या पुस्तकावरची फ़ेसबुक पोस्ट वाचली.
त्यावरच्या कॉमेंट्स वाचल्या.
किति वेळा माहीती नाही...

तू त्यात लिहिलेले लक्षात आहेच...
पण न लिहिलेले जास्त लक्षात आले आहे.
का लिहिले नाहीस हे विचारणार नाही.
कारण ते आणि तसं न लिहिण्याचे कारण माहीती आहे.
अगदी पूर्णपणे...

कारण आयर्विँग वालेसचे " आर डॉक्युमेंट "  हे पुस्तक म्हणून तर अप्रतिम आहेच...
पण त्याहीपेक्षा...
त्यातला एक संवाद आपल्या सहजीवनाचा मस्त पासवर्ड आहे.
पासवर्ड हा मनोमनीच्या एकांताचा सांगाती आहे तूच म्हणतोस ना....

तुला माहीती आहे...
हे मलाही माहीती आहे...
त्या पुस्तकात एक संवाद आहे .....
" Does Justice have its day in a court ? "
" Justice has its day. Will have it." 
( " न्याय मिळेल का ? मिळतो का ?"
" नक्की मिळेल. नक्की मिळतो ." )

पोस्ट वाचल्यापासून सगळं आठवतंय सतत...
अगदी पहिल्यापासूनच...

आपलं बारावीचे वर्षं नुकतेच सुरू झाले होते....
त्याआधीची दोन वर्षं आपल्या विद्यार्थी संघटनेतर्फे दुष्काळी कामांचा सर्व्हे केला होता. तू त्या टीमचा भाग होतास.. त्या सर्व्हे चा अहवाल प्रसिद्ध करण्याचा जाहीर कार्यक्रम होता...
त्यात तू दुष्काळी कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहारां बाबतची माहीती देताना अनेक गंभीर उदाहरणे सांगत होतास...
आणि तुझ्या विवेचनाचा शेवट करताना आयर्विँग वालेसच्या " आर डॉक्युमेंट " या पुस्तकातला हा संवाद म्हणाला होतास.
सारेच अवाक झाले होते...
विवेचनानेही...
आणि अशा अनपेक्षित समारोपानेही...
अनपेक्षित दोन कारणांनी...
अशा विषयाचा शेवट असा करता येईल हे कोणाच्याच ध्यानीमनी नव्हते...
आणि
त्यावेळी या पुस्तकावर अघोषित बंदी होती म्हणूनही....

त्या कार्यक्रमानंतर तुझं अभिनंदन करताना मी पहिल्यांदा तुझा हात...
बराच वेळ...

नंतर आपण एकमेकांना या ना त्या कारणांनी भेटत होतो.
परस्परांना आवडायला लागलो होतो.
ते दोघांनाही मनोमन कळले होते..
पण कोणी कोणाला..
यांत ग्रज्यूएशन पूर्ण होऊन आपण नोकरी सांभाळत लॉ करत होतो...
भावना आणखीन स्पष्ट..
पण शब्दांत येत नव्हत्या...
मी विचारणार नाही हे माझं मला स्पष्ट होते.
स्त्री- सुलभ लज्जा वगैरे काही नाही...
पण तू विचारणे ही मला माझ्या व्यक्तिमत्वाला दाद वाटत होती... म्हणून ते हवे होते...
तुला चिडवण्यासाठी मी ...
मग मात्र तू मला सरळ...

त्यावेळी तुझे शब्द होते....
" Does Justice have its day in court ? " 
साहजिकच उत्तर होते...
" Justice has its day " .

नंतर किति वेळा यावरून आपण एकमेकाना बिलगलो...
आणि म्हणून तू या लेखात हा उल्लेख केला नाहीस ना....
विसरलो सांगू नकोस....
कारण आयर्विँग वालेसच्या याच पुस्तकातल्या याच प्रसंगात एक वाक्य आहे...
" Why do sons assume their fathers know nothing or have forgotton everything ? " 

मैत्रीण ते प्रेयसी ते पत्नी या आजपर्यंतच्या प्रवासात या पुस्तकाच्या केलेल्या प्रत्येक पारायणात तू प्रत्येकवेळी सांगितले आहेस मला...
" Just replace the words Sons and Fathers with the word  Lovers " 
कारण दरवेळी हे सांगतानाची क्रुती आणि आवेग यांत स्थल-काल परत्वे बदल झाला असेल; शब्द आणि भावना नाही...

मी न विचारण्याची आणि तू सांगावे म्हणून केलेल्या खडूसपणाची किंमत न चुकता, अगदी प्रत्येकवेळी, कोणी वसूल केली आहे रे...
त्याचंही समर्थन पुन्हा.... " न्याय मिळतो; न्याय मिळेल. ".
बरोबर ना माय लव्ह ऑफ लाईफ...

एका वेगळ्या अर्थाने मी विचारते...
Does Justice have its day in court ? " 
आणि मीच उत्तर देते... Justice has its day...
कारण...
तू सांगणार... " ,कोर्ट आणि कोरटिंग... " 

न्याय मिळतो.
न्याय मिळेल.







16 जून 2020.

Wednesday, June 10, 2020

आर डॉक्युमेंट.

नुकतेच दहावी ssc पास झालोय असं माझं वय आणि अक्कल.... केवळ शारीरिकच नव्हे तर बौद्धिक , सामाजिक, राजकीय समज सगळेच पौगंडावस्थेत अशी स्थिती.... 
समज अगदी कमी ( खरं म्हणजे नाहीच) ; पण कुतूहल कमालीचे अशी माझी वाचक म्हणून ( आणि व्यक्ती म्हणूनही ) अवस्था. 

त्यात बाहेर पराकोटीचे तापलेले आणीबाणीच्या काळाचे वातावरण.... सन 1975 - 1976 चा काळ.
देशभरात घटना- दुरुस्तीची गरमागरम चर्चा...
कळत तर काही नव्हते... पण आपले गटनेते सांगतात त्यावर भाबडा विश्वास ठेवत त्याची पोपटपंची करण्याचं ते वय.... शारीरिकही आणि मानसिक ही!!!

अशा अवस्थेत 1975 साली पहिल्यांदा वाचलेले पुस्तक म्हणजे आयर्विँग वालेस ( Irwing Wallace ) चे " आर डॉक्युमेंट " 
आयर्विँग वालेस काही थोर लेखक आहे की नाही ह्याची काहीच माहीती त्यावेळी नव्हती.. खरं तर हे नावच माहीती नव्हते.
पण त्यावेळी या पुस्तकावर आपल्या देशात या पुस्तकावर बंदी होती म्हणे!!!
माझ्यासारख्याला सहजपणे ते पुस्तक त्यावेळी मिळाले म्हणजे बंदी कशी असा प्रश्नही पडला नाही ....
बंदी आहे तरी आपण वाचतोय  याचेच तेंव्हा " थ्रील "....

तेंव्हापासून आजपर्यंत कितीवेळा हे पुस्तक वाचले याला गणतीच नाही...

आयर्विँग वालेस.
व्यावसायिक यशाची समीकरणे पक्की घोटलेला लेखक...
वाचकाची पौगंडावस्था त्याच्या वयावर अवलंबून नसून व्रुत्तीवर अवलंबून असते आणि तिचा अस्तित्व-काल ( shelf life हो) दीर्घ असतो या व्यावसायिक सूत्रांचा राखणदार असा लेखक म्हणजे आयर्विँग वालेस.
साधारणपणे दीर्घकथा म्हणावं इतके लहान नाही आणि कादंबरी म्हणावं तर लिओ टॉलस्टॉय सारखे आकार- आशय- कालखंड - अभिव्यक्ती या निकषांवर इतका मोठा  नाही अशा धाटणीची रचना करणारा लेखक....

 अगदीच एकांकिका नाही; आणि  पार पाच अंकी साग्रसंगीत ( आणी तेही अनेकदा Once More घेईल ) असंही नाही तर दोन- अडीच अंकी नाटकाचा सुटसुटीत पसारा आणि मोजक्या नेपथ्यात आणि नटसंचात  नाटक उभारणारा हुकुमी लेखक म्हणजे आयर्विँग वालेस.

पण एकदा त्याचे पुस्तक हातात घेतले की तुमच्या नकळत तुम्ही ते सलग वाचता... यांत पुस्तकाचा छोटेखानी आकार महत्वाचा ठरतो की चटकदार मांडणी हे त्या त्या वेळी तुमचं तुम्ही ठरवायचं.
आणि हे वारंवार होते हे मात्र निश्चितच . 
( हे तुमच्या कशाचं लक्षण....) 

" आर डॉक्युमेंट " या पुस्तकाचा विषय आहे तो अमेरिकी राज्यघटनेत करायची सुधारणा...
खरी की काल्पनिक हे पुन्हा वाचकाने ठरवायचं.
या कादंबरीतल्या या  घटना- दुरुस्तीनुसार मध्यवर्ती सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाढीव आधिकार देण्यात येणार असतात. अगदी राज्य सरकारांना डावलून. वेळप्रसंगी त्यांचा विरोध असला तरी. आता राज्य सरकारांची ही स्थिती ; तर  सर्वसामान्य नागरिकाला कोण विचारतो ? 
या  सद्रुष्य की तथाकथित साधर्म्यामुळे या पुस्तकावर  तेंव्हा आपल्या देशात बंदी असल्याची फुकाची चर्चा ! 

हे पुस्तक पहिल्यांदा वाचल्यापासून आजतागायत या पुस्तकातला माझा अत्यंत आवडता प्रसंग म्हणजे पेशाने पत्रकार आणि आपद्धर्म म्हणून " घोस्ट रायटर " असणारा इस्माईल यंग अमेरिकी सरकार मधे अटर्नि जनरल असणारया ख्रिस कॉलिन्सला विचारतो की
"  या प्रस्तावित घटना- दूरूस्तीला काहीजणांचा विरोध आहे आणि दिवसेंदिवस तो विरोध हळूहळू का होईना पण वाढतो आहे . हे तुम्हांला माहीती आहे. एक व्यक्ती म्हणून तुम्हांला ही घटना- दुरुस्ती खरंच चांगली वाटते ? " 
त्यावर पुस्तकातल्या त्या प्रसंगात त्या  अटर्नी जनरलने दिलेले उत्तर मी माझ्या उभ्या आयुष्यात विसरणार नाही...
तो सांगतो..
" कोणताही कायदा किंवा कायदे- दुरुस्ती ही चांगलीच असते. पण सरकार चांगले असले आणि त्याने ती तरतूद चांगुलपणाने उपयोगात आणली तर  तो कायदा चांगला वाटतो. असं झालं  नाही तर तोच कायदा वाईट वाटतो. " 
याचे कंगोरे सतत जाणवत राहतात.... तात्कालीक उदाहरणे  स्थिती सापेक्ष असतील  ; पण ही जाणीव  नाही ना ! 
आणि काळाच्या ओघात  असे अनुभव....
आपण वाचक म्हणून मग आपण त्या वाक्याशी इतिहास आणि वर्तमान जोडत राहातो....
याच्या आणि इतरही इंग्लिश कादंबऱ्यात उल्लेख आल्याप्रमाणे तुमच्या मनातली व्यक्ती तुमच्या पांघरूणात आली नाही तरी  आयर्विँग वालेस लेखक म्हणून तुमच्या डोक्यात वर्तमानकालीन संदर्भ निवांतपणे सोडतो... 
त्या पुस्तकात ते नसताना...
असं करण्याइतपत आयर्विँग वालेस नक्की सक्षम आहे.... म्हणून तर त्याचे तेच तेच पुस्तक परत परत वाचलं जाते.... ते त्याचे " आर डॉक्युमेंट " ,असू दे नाहीतर  " ,दि सेकंड लेडी " ! 

या पुस्तकातल्या याच प्रसंगात इश्माइल यंग ख्रिस कॉलिन्स ( अटर्नी जनरल)ला विचारतो की असे आधिकार मध्यवर्ती सरकार कडे घ्यावेत असं का वाटते ? त्यावर वाढती गुन्हेगारी असं उत्तर मिळते. या उत्तरावर हा पत्रकार अटर्नी जनरलला पुढे विचारतो की 
" असे गुन्हे हौस कींवा पेशा म्हणून झाले आहेत असं सरकार ला वाटते का  ? असा पेशा व्हावा इतकी जर परिस्थिती आली असेल तर ती एका रात्रीत आली का ? जर वाढती गुन्हेगारी हा बेरोजगारी आणि दारिद्र्य ( Poverty ) यांचा परिणाम असला तर  या घटना- दुरुस्तीने त्यावर उत्तर  मिळेल का ? " 
अटर्नी जनरल ख्रिस कॉलिन्स उत्तर द्यायच्या आधीच पत्रकार इश्माइल यंग पुढे म्हणतो.... " उपाययोजना दारिद्र्यावर हवी; गुन्हेगारी त्यातून कमी होइल. " 

हा प्रसंग आणि त्या निमित्ताने हे पुस्तक कायमचे मनात घर करून राहिले आहे. त्याची कारणे अनेक आहेत. एक तर ज्यावेळी हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचले तेंव्हा ( 1975- 76 )  आपल्या देशाच्या राजकीय- सामाजिक वातावरणात " गरिबी हटाव " ,ची घोषणा जोरात होती. त्याशिवाय त्या दोन- अडीच वर्षात राज्यभर सुरू असलेल्या दुष्काळी कामांच्या पाहणीच्या एका प्रकल्पांतर्गत मी खूपच फिरलो. त्यातून "रोजगारी कींवा बेरोजगारी ही चल ( Variable , Portable आणि Transferable अशा तिन्हीं अर्थाने ) आहे ; तुलनेने गरिबी स्थिर आहे "  हे शिकत होतो. 
त्यावेळी ही शब्दरचना सुचली नव्हतीच.
पण मनोमन हे कुठेतरी रूजत होते. खांद्यावरच्या छोट्या पिशवीत हे पुस्तक होतंच. दोन पाड्यामधलं अंतर पायी पार करताना दमलो म्हणून थांबले की पाण्याच्या घोटाऐवजी याची दोन पाने वाचली जात होती. 
आणि असं वाचन आणि भटकंती सांगत होती...
" गरिबी संपत्तीची आणि ऐपतीची असते ; दानतीची नाही. " 
त्या भाबड्या वयात तरी असं वाटायचं.
पण ते खोटं नाही हे नंतरच्या आयुष्यातलं  आजतागायत सुरू असलेले फिरणं शिकवत राहिले.

त्यामुळे या इश्माइल यंगचा हा प्रश्न कधीच डोक्यातून जात नाही... आणि म्हणून हे पुस्तक ही!

या पुस्तकाच्या पूर्वार्धात असं बरंच काही हा पत्रकार इश्माइल यंग अटर्नी जनरल ख्रिस कॉलिन्स ला विचारत राहतो. ख्रिसची पत्नीही सूचकतेने सुचवत राहते. त्यातून अटर्नी जनरल आधी विचार आणि मग क्रूती करायला लागतो. आणि त्यातून ही प्रस्तावित घटना- दुरुस्ती संमत होत नाही असं 1970 साली पहिली आव्रूत्ती प्रसिद्ध झालेले हे पुस्तक कादंबरी म्हणून वाचकांना सांगते.

नंतरच्या काळात अरुण साधू यांच्या " मुंबई दिनांक " आणि  " ,सिंहासन "'ही पुस्तके वाचताना मला हे पुस्तक सारखे आठवायचं. त्यामुळे मधल्या अनेक वर्षात ही तिन्हीं पुस्तके मी एकाचवेळी आलटून- पालटून  वाचली आहेत.
त्यामुळे असेल कदाचित पण " सिंहासन " ,सिनेमातील पत्रकार ( निळू फूले झिंदाबाद) पाहाताना मला हा इश्माइल यंग जाम आठवत राहायचा ! 
नंतरच्या काळातला संदर्भ म्हणजे अजय झणकर यांचे " ,सरकारनामा " हे पुस्तक आणि त्यावर आधारीत आलेला सिनेमा.
असा हा आठवला की पुन्हा हे पुस्तक वाचायचे... अशी पारायणे!!!

या पुस्तकाचा अजून एक संदर्भ म्हणजे किरण ठेंगडी यांचा " वजीर " हा सिनेमा... विक्रम गोखले यांचा पॉज आणि रोखलेली नजर याच्या इतकेच या बुद्धिबळ पटावरच वैचारिक- शारीरिक- कायदेशीर आणि बेकायदेशीर ही रणांगण म्हणजे हा सिनेमा आणि हे पुस्तक.

असाच या पुस्तकाची पुन्हा पुन्हा आठवण आणि पर्यायाने वाचन यासाठी उद्युक्त करणारा संदर्भ म्हणजे 1988 साली आलेला शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांचा " न्यू दिल्ली टाइम्स " या इंग्लिश नावाचा हिंदी सिनेमा ! 
या सिनेमात  शशी कपूर एका प्रसंगात त्याच्या पत्नीची भूमिका बजावणार्या शर्मिला टागोर ला सांगतो.... 
" बेकायदेशीर आणि कायद्याची सीमारेषेवरचे यातलं  अंतर नेहमीच धूसर असते .  पण आपण करत आहोत ते यातलं काय हे क्रुतीचा परिणाम ठरवतो  ; क्रुतीचा काळ नाही. आणि क्रूती करत असलेली व्यक्ती तर नाहीच नाही. " 
अशा अनेक उत्कंठावर्धक प्रसंगांची  मालीका म्हणजे आयर्विँग वालेसचे " आर डॉक्युमेंट " हे पुस्तक.

1976 च्या सुमारास एक चर्चा अशीही होती की गुलजार साहेब या पुस्तकावर हिंदी सिनेमा काढणार आहेत... संजीवकुमार , शशी कपूर , प्राण  , शर्मिला टागोर अशी मंडळी त्यात असणार वगैरे... पण " ,आँधी " सिनेमाच्या वेळी आलेला अनुभव लक्षात घेऊन हा सिनेमा आला नाही अशीही चर्चा !!!

अगदी पहिल्यांदा आयर्विँग वालेसचे " ,आर डॉक्युमेंट " ,हे पुस्तक वयाच्या 15 - 16 व्या वर्षी वाचताना पटकन लक्षात आलेली ( अगदी पहिल्या 10 पानांतच ) गोष्ट म्हणजे दुसरया लेखकांचा नावनिशीवार उल्लेख करत त्यांची विधाने पुस्तकांतल्या संवादात केलेला उपयोग. हा प्रकार  आयर्विँग वालेसच्या इतरही पुस्तकांत आहे. तसा काही प्रमाणात तो इतरही पाश्चिमात्य कादंबरीकारांबाबत ( उदाहरणार्थ जेफ्री आर्चर) आहे. भले अशी अवतरणे निवडक साहित्यिक ( उदाहरणार्थ ...जॉर्ज बर्नोर्ड शॉ , मार्क ट्वेन , बेंजामीन फ्रँकलीन) मंडळीची असतील. पण आहेत.
दरवेळी हे पुस्तक वाचताना मला फार वाटतं की आपल्या समाजकारण- राजकारणात  आपण दुसऱ्याच्या विधानाची दखल फक्त टिका करण्या साठी कींवा खिल्ली उडवण्यासाठीच करतो का?  त्यातून झिरपत जाणारी असंवेदनशीलता ही दीर्घकालात अनेक आगामी अडचणींची आमंत्रण- पत्रिका ठरते का ?
इतका मोठा आवाका या पुस्तकाचा कदाचित नसेलही... पण संवेदनशील वाचकाला उद्युक्त करत राहते इतके नक्कीच!

या पुस्तकाची जी आव्रूत्ती माझ्याकडे आहे त्यात अगदी सुरवातीला एक प्रसंग दिला आहे....
1787 साली फिलाडेल्फिया नी अमेरिकी राज्यघटनेवर स्वाक्षरी केल्यावर एका महिला डेलेगेट ने बेंजामीन फ्रँकलीन ना विचारले...
" Well , Doctor , what have we  got , a republic or a monarchy?  " 
त्यावर बेंजामीन फ्रँकलीन ने हसून उत्तर दिले,.
" A republic, if you can keep it " 
आणि उत्तर देताना बेंजामीन फ्रँकलीन पुढे म्हणाले...
" Those who would give up essential liberty to purchase a little temporary safety deserve neither liberty nor safety " .
मी हे पुस्तक वाचताना मला दरवेळी या ऊत्तरातल्या एका शब्दावर नेहमीच अडखळत पडायला होते.... " A republic, if you can keep it. " 
या उत्तरात शब्दप्रयोग  YOU असा आहे; WE असा नाही.
आता हे YOU म्हणजे....

हे उत्तर कोरोना नंतरच्या काळात.....

असं हे  आयर्विँग वालेस चे " आर डॉक्युमेंट " 
( त्याच्या " दी सेकंड लेडी " पुस्तका बद्दल नंतर कधीतरी.....) 







10 जून 2020.

Monday, June 8, 2020

Anne Frank पुन्हा - पुन्हा . . . . . . .

(१२ जून १९२९ ही तिची जन्मतारिख .  तिच्या स्म्रुती निमित्त ). 

आपण एखाद पुस्तक कधी वाचतो याचा ते पुस्तक आवडण्याशी काही संबंध असतो का  ?
पुस्तकाचा लेखक किंवा प्रमुख पात्र आणि वाचकांचे वय साधारणपणे एकच असेल तर त्या पुस्तकातील अनुभवांविषयी जास्तच जिव्हाळा वाटतो का  ? 
त्यातही पुस्तकातील राजकीय - सामाजिक परिस्थितिशी साधर्म्य असणारी परिस्थिति ते पुस्तक वाचताना काही प्रमाणात तरी प्रत्यक्षात पाहायला मिळत असेल तर अशा पुस्तकाशी लगेचच आणी जास्तच जवळीक साधली जाते का  ?

 या तिन्ही प्रश्नाचं उत्तर कदाचित नकारार्थी असेलही ; पण  "  The Diary of Young Girl "  हे Ann Frank  चे पुस्तक पहिल्यांदा वाचत असताना माझे मात्र असे झाले होते . १३ -  १५ वर्षांच्या मुलीचे अनुभव १५ - १६ व्या वर्षी वाचताना जास्त भिडतात .  त्यातच त्यावेळी आपल्या देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुकारलेली आणीबाणी ऐन भरात होती . त्या वातावरणात Ann Frank चे हे पुस्तक आणि Irwing  Wallace चे  "  R Document  "  सारख पुस्तक यातले प्रत्ययकारी वर्णने भयचकित करायची ! 

या परिस्थितीत नंतरच्या काळात जरूर बदल झाले. पण या पुस्तकाने घातलेल्या मोहिनीत मात्र कधीच काहीच बदल झालेला नाही . " एका तरूण मुलीने लिहिलेली डायरी "  असे नाव असलेले हे पुस्तक नाझी दहशतवादाचे अत्यंत बोलके चित्र उभे करते . १४ जून  १९४२ रोजी या डायरीतली पहिली नोंद आहे . १ ऑगस्ट  १९४४ रोजी डायरीतली शेवटची नोंद आहे .  Ann  च्या  १३व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या वडिलांनी तिला ही डायरी भेंट दिली होती. साऱ्या पुस्तकभर या डायरी चा उल्लेख Ann ने सतत  " Kiti "  असा केला आहे . त्यात अगदी काटेकोरपणाने रोजच्या रोज, न चुकता नोंदी केल्या आहेत अशातला काही भाग नाही. तिच वय, नंतरची परिस्थिति बघता ते साहजिकच आहे. पण त्यात Ann ने व्यक्त केलेले विचार, भावना, अनुभव अतिशय सुन्न करून टाकतात .

फ्रँकफटच्या एका उत्साही, ज्यू उद्योजकाची ( Oto Frank ) गंभीर आणि विचारी अशी ही कन्या. हिटलरचा जर्मनीमधे उदय झाल्यानंतर Ann च्या वडलानी आपली पत्नी आणि २ कन्या यांच्यासह १९३३ साली आपला मुक्काम अमस्टरडेमला हालवला. पण हिटलरच्या साम्राज्य विस्तारामुळे अमस्टरडेम मधेही ज्यूंचे भवितव्य अंधारी बनले. एकाहून एक अपमानजनक बंधने घालत त्याची सुरुवात झाली. हळूहळू त्यांची छळ - छावणीत रवानगी होऊ लागली. त्यातून वाचण्यासाठी Oto Frank  यांनी सहकुटुंब स्थलांतर केले. ६ जुलै  १९४२ रोजी आपल्याच ऑफीसच्याच  कोंदट तळघरात त्यांनी आपला बाड- बिस्तरा हालवला. त्या जागेत बाह्य जगाशी संपर्क तुटलेल्या अवस्थेत राहत असताना Ann Frank या कोवळ्या मुलीच्या मनातील विचारांची अत्यंत मोकळेपणाने आणि धीटपणे केलेली नोंद असे या पुस्तकाचे स्वरूप आहे .  

४ ऑगस्ट १९४४ रोजी त्यांच्या या गुप्त निवासाचा नाझी सैनिकांना पत्ता लागला. नंतर Frank कुटुंबीयांची वेगवेगळ्या छळ - छावण्यात रवानगी झाली. तिथेच Ann आणि तिची मोठी बहीण यांच निधन झाले. तिथून सूटका झाल्यावर Oto Frank जेंव्हा अमस्टरडेमला परत आले तेंव्हा त्याना हे हस्तलिखित मिळालें.  त्यातून हे पुस्तक जन्माला आले . 

या नष्टचर्याला सुरुवात होण्याआधी या सुस्वरूप कन्येला आपण हॉलिवुडमधे अभिनेत्री व्हावे असे कधी कधी वाटत असे. स्वतःच्या लहानपणीच्या एका छायाचित्रावर तशी टिप्पणी तिने केल्याची नोंद या पुस्तकात आहे . पण नियतिच्या संकेतांतून कॅमेराचा उजेड तर सोडाच ; पण या कोवळ्या मुलीला आधी अंधाऱ्या जागेला आणि नंतर छळ - छावणीच्या सर्वंकष अंधाराला सामोरे जावे लागले.  अर्थात ही परिस्थिति तेंव्हा अनेकांच्या वाट्याला आली.  १३ ते  १५ वर्षे हा आयुष्याचा काळ प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एका वेगळ्या अर्थाने महत्वाचा असतो. पण Ann Frank  च्या आयुष्यात तो फारच वेगळा ठरला . 

या काळाने तिला केवळ परिपक्व नव्हे तर फारच समंजस आणि प्रौढ बनवले. अभिनेत्री होण्याची तिची इच्छा जरी पूर्ण झाली नसली तरी  "  I want to go on living even after  my  death  "  ही तिची इच्छा मात्र अगदी नक्की पूरी झाली आहे.  १९४५ साली तिच निधन झाले.  पण आजही तिची आठवण  75 वर्षानंतरही अमर आहे . 

 तिच्या या पुस्तकाचे आज जगातील जवळ जवळ सर्वच भाषांत अनुवाद झाले आहेत.  हे त्या इच्छापूर्तीचेच एक रूप आहे. हे पुस्तक एकदा वाचलेला संवेदनशील वाचक त्याच्या आयुष्यात हे पुस्तक विसरूच शकत नाही हे त्याचे दूसरे रूप आहे.  " नाझी राजवटीत ६० लाख ज्यूंची हत्या झाली असेच केवळ नाही तर प्रत्येक ज्यू वर ६० लाख वेळा मरण्याची वेळ आली "  या आबेल हेर्जबेर्ग यांच्या विधानाची यथार्थता हे छोटेखानी पुस्तक त्याच्या प्रत्येक पानावर पटवत  राहते, हे त्याच आणखीन एक रूप आहे .

सुमारे 70  - 75  वर्षांपूर्वी स्वत:चे अनुभव नोंदवताना Ann Frank ने  या पुस्तकात , डायरीत  व्यक्त केलेले अनेक विचार आजही आपल्याला अंतर्मुख करतात. या पुस्तकातील उल्लेखांचे संदर्भ आज बदलले असतील ; पण त्यांची यथार्थता जरासुध्धा बदललेली नाही .

 " युद्धात प्रत्येक दिवशी कोट्यवधी रुपये खर्च करताना गरीब जनतेसाठी , व्रूद्ध कलाकारांसाठी , आरोग्य , शिक्षण यासाठी निधी अपुरा पडतो असे कोणाच्याहि मनात कसे येत नाही " या Ann Frank ने विचारलेल्या प्रश्नाचा आज संबंध उरलेला नाही असे कोण म्हणू शकेल  ? 
" जगाच्या एका कोपऱ्यात अन्न - धान्याची गोदाम ओसंडून वाहात असताना दुसऱ्या भागात भूकबळी का पडावेत  "  हा या पुस्तकात Ann Frank ने विचारलेला दुसरा प्रश्न हि असाच .
 " एखाद्या निरपराध सामान्य नागरिकाला त्याचे त्याचे जिणे जगता येउ नये, इतकी एखाद्या सत्ताधीशाची मर्ज़ी कशी महत्वाची ठरु शकते आणि त्याचा अटकावही कसा होत नाही, " असाही मुद्दा ती या पुस्तकात उभा करते . 
हे असं या पुस्तकात वाचताना Ann Frank चे  शारिरीक स्वास्थ्य ढासळत असले तरी या बालिकेचे मनोधैर्य जरासुध्धा खचलेले नाही आणि नव्हते याची प्रचिती येत राहाते.  सत्य सांगण्यास तरुण मंडळी जरासुध्धा कचरत नाहीत आणि त्याला सामोरे जायलाही ते घाबरत नाहीत या तत्वावर Ann Frank ची असणारी अढळ श्रध्दा आजही नक्कीच आवश्यक वाटते .  
 अलीकडे घडलेली त्याची उदाहरणे आहेतच की! . 

आज हिटलरहीअस्तित्वात नाही आणि Ann फ्रँकही अस्तित्वात नाही.  पण तिच्या आयुष्याला ग्रासून राहिलेला अतिरेकी वंशवाद वेगवेगळ्या रूपात पुढे येतोच आहे. एखाद्या वंशाच्या तथाकथित श्रेष्ठत्ववादी भूमिकेमुळे इतरांना जगण्याचा आधिकार नाही असे आज उघडपणे कोणी म्हणणार नाही ; पण त्याच्या छटा दिसतातच की! अशावेळी हिटलर हे नाव की व्रुत्ती....

संवादाच्या अभावामुळे वादाचा प्रभाव वाढतो आणि असा प्रभावच अनेकदा अतिरेकी दहशतीला कारणीभूत ठरतो. Ann Frank च्या डायरीमधे उभा राहणारा नाझी दहशतवाद फारच एकारलेला वाटावा अशा विविध स्वरूपात तो आज ऑक्टोपस सारखा फोफावत आहे. वांशिक दंगलीपासून आर्थिक साम्राज्यापर्यन्त आणि वित्तीय मांडलिकत्वां पासून राजकीय अरेरावी पर्यंत त्याची नानाविध रूपे जगभर सर्वत्र आणि सातत्याने सामोरी येत आहेत. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस दोस्त राष्ट्रांनी खनिजांनी सम्रूद्ध असा भूभाग तोडण्यापासून अनेक अपमानकारक अटी जर्मनी वर लादल्या. स्वाभिमानी जर्मनीच्या ह्रुद्यात त्याचे शल्य होते. त्याची चिंगारी फुलवत वांशिक श्रेष्ठत्व हा मुद्दा पणाला लावत हिटलर सर्वसत्ताधिकारी झाला. आज राजकीय मालकी पेक्षाही आर्थिक नाडया ताब्यात असणे महत्वाचे आणि सोयीचे ठरते. त्यातून युद्धे उभी राहतात. अशी युध्द उघडपणे दिसतात तरी !  
पण स्वतः जवळ असणाऱ्या नकाराधिकाराला शस्त्र म्हणून वापरत जागतिक अर्थसंस्थांच्या माध्यमातून लहान आणि अविकसित देशांची कशी ससेहोलपट केली जाते हे सर्वश्रुतआहे. मग "  Masters of Illusion  "  सारखे पुस्तक  Anne Frank  च्या डायरी चे दूसरे रूप वाटू लागते. अशा वेळी भौगोलिक सीमारेषा , राजकीय गटबंध ,  झेन्ड्यान्चे रंग हे निव्वळ मुलामे ठरतात आणि निखळ बहुरंगी , विविधांगी दहशतवाद आ वासून सामान्य नागरिकांचा घास गिळत राहातो.... वेळप्रसंगी चघळत ही !
 त्याचा मुकाबला करण्यासाठी मग Anne Frankची हिम्मत आठवत राहते . 

हे जसे एखाद्या राष्ट्राविषयी, वंशाविषयी , धर्माविषयी खरे आहे तसेच आपल्या दैनंदिन वैयक्तिक आयुष्याबाबतही खरे आहे.  Domestic Violance चा हिटलर...
अशा या धकाधकीच्या जीवनात Anne Frank  सारख्या दीपस्तंभा ची गरज वाढत राहते. 
अशा वेळी Anne Frank १२ जून  १९२९ रोजी जन्माला आली हे खरे ; पण ती १९४५ साली निधन पावली हे खोटे वाटते . कारण Anne  Frank तिच्या म्रुत्यु नंतरही आपल्या मनात जगत राहते.

सरते शेवटी,  हे पुस्तक वाचत असताना मला नेहमीच आमच्या वरसई च्या गोडसे भटजी यांच्या " माझा प्रवास "  या पुस्तकाची आठवण येते. ते पुस्तक १८५७ च्या युद्धाबाबत एका सामान्य माणसाने केलेल्या नोंदी आहेत . त्यातल्या वेदनांची जातकुळी जरूर वेगळी आहे.  पण या दोन्ही पुस्तकातले साम्य म्हणजे निरपराध सामान्य नागरिकांनी केलेल्या नि:पक्षपाती, स्वानुभवावर आधारीत अशा या नोंदी आहेत. म्हणून त्या खुप महत्वाच्या आहेत . . . 
साहित्य म्हणूनही आणी इतिहास म्हणूनही . 






7 जून 2020