Sunday, June 21, 2020

" चाल " बाज चीन.


गेले काही दिवस आपला देश आणि चीन यांच्या सीमारेषेवर सुरू असलेल्या घटना चर्चेत आहेत. ही अशी चर्चा होणे हे स्वाभाविकच आहे. 

पण केवळ इतकीच त्याची स्वाभाविक सहजता असावी कींवा असेल?
आपले तीन आणि वीस ; आणि त्यांचे त्रेचाळीस एवढ्या पुरेसे ते मर्यादीत असेल कींवा आहे ? 
1967 नंतर पहिल्यांदाच या सीमारेषेवर सैनिकांची जीवीतहानी झाली हे त्याचे एकमेव वैशिष्ट्य असेल कींवा आहे ?
1967 ते 2020 या 53 वर्षांच्या काळात भारतीय व चीनी लष्कर एकमेकांच्या समोरासमोर आल्यावर फक्त शारीरिक रेटारेटी असं त्यांचं स्वरूप मर्यादीत असताना आता अचानक- एकदम लाकडी सोटे आणि तेही अणुकुचीदार वायरी गुंडाळलेले  कुठून आले? 
स्थानिक चीनी लष्करी आधीकाऱ्याने  स्वतःचे डोके वापरून स्वतःच्या आधिकारात उपयोगात आणण्या इतपत स्वातंत्र्य  अशा संवेदनशील सीमारेषेवरच्या स्थानिक  लष्करी आधिका ऱ्याला , आणि तेही चीनी आधिकाऱ्याला असते कींवा असेल ?

साहजिकच या सगळ्या प्रश्नांची  उत्तरे नकारार्थी आहेत.
असं असेल आणि आहे तर प्रश्न हा आहे की  आत्ताच असं काय झाले की त्रेपन्न वर्षात जे झाले नाही ते आज व्हावे ?
"कोरोना ( कोवीद 19 )  आणि त्यानंतर..."  हे त्याचे ढोबळ कारण असले तरी ज्याला आपण Last Straw on Camel' s back म्हणतो  असं गेल्या काही दिवसांत काय झाले ? 
कारण कोरोना हे कितिही काळ-काम- वेगाचे गणित असले तरी ते एका अर्थाने  चार- पांच महिने जुने झालेले गणित आहे.

असा विचार करत असताना जाणवलेल्या या काही गोष्टी....

याबाबत मला जाणवणारी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी अलीकडेच आपल्या देशाच्या परकीय चलनांच्या साठ्याने ( फॉरेक्स रिझर्व्ह) गाठलेली  500 बिलियन डॉलर्स ची पातळी. 
स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातली हीं सर्वात जास्त अशी विक्रमी पातळी आहे. 
( या पातळीची कारणमीमांसा आणि संभाव्य परिणाम याची सविस्तर चर्चा माझ्या यु ट्यूब चेनेल वर कालच म्हणजे 19 जून 2020 रोजी लोड केलेल्या विडिओ मधे मी केली आहे. त्याची लींक...YouTube Link (click to see) .

तसं पाहायचं तर आपल्या देशाच्या अशा अभूतपूर्व विक्रमी पातळीवर पोचलेल्या परकीय चलनांच्या साठ्याच्या कित्येक हजार पट मोठा असा परकीय चलनांचा साठा चीनकडे आहे. आणि तसा तो गेले कित्येक वर्षं आहे. आणि कोरोनानंतरच्या अर्थकारणातही त्यात फारसा फरक पडलेला नाही. निदान फार मोठा फरक तरी नक्कीच पडलेला नाहीच नाही.
असं असूनही चीनने असें लष्करी द्रुष्टीने आक्रमक का व्हावे हे समजून घेणे आवश्यक आहे. चीनच्या द्रुष्टीने  भारताच्या  परकीय चलनांच्या साठय़ात होणारी वाढ ही " म्हातारी मेल्याचे दुःख नाही; काळ सोकावतो आहे " अशा स्वरूपाची आहे. 
निदान असावी. 



" चाल " बाज चीन चा हा पहिला अर्थ....
एकीकडे कोरोनाने जागतिक अर्थकारणाचे कंबरडे मोडले आहे असे जगभरातले अनेक देश स्वतःचे गार्हाणे वेशीवर मांडत सांगत आहेत... अगदी Claiming from the Roof Top असं! अनेक जागतिक वित्तसंस्था  आणि पतमापन संस्था ( क्रेडिट रेटिंग  एजन्सी) सध्या सुरू असलेल्या आणि पुढच्या आर्थिक वर्षात अनेक देशांचे राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न (जीडीपी ) वाढणे तर सोडूनच द्या; कमी झालेले असेल असे वारंवार सांगत आहेत. 
" गावंढ्या गावात गाढवी सवाशीण " सारखे त्यातल्या त्यात  चीनचे राष्ट्रीय उत्पन्न या काळात  मर्यादीत का होईना पण सकारात्मक वाढ दाखवेल असा अंदाज या संस्थांनी वर्तवला आहे. त्याखालोखाल जर कोणाची स्थिती त्यातल्या त्यात जगभरात  बरी असेल तर ती  आपल्या देशाची आहे कींवा असेल असे याच वित्तसंस्था सांगत आहेत... ( " गिरे तो भी टांग ऊपर "ची सकारात्मक स्थिती)!
अशावेळी जगभरातले अनेक देश आर्थिक द्रुष्टीने अक्षरशः देशोधडीला लागत असताना आपल्या देशाचा परकीय चलनांच्या साठ्यांची पातळी विक्रमी टप्पा गाठणे हे चीनला अनेक कारणांनी डाचत असणं हे स्वाभाविक आहे. ही गाडी " डिरेल " करण्याची चाल म्हणून या घटना सीमारेषेवर घडत असाव्यात.

" चाल " बाज चीनचा दुसरा अर्थ म्हणजे...
आपल्या देशाचा परकीय चलनांचा साठा विक्रमी पातळीवर पोचण्याच महत्व आणि माहात्म्य आपल्याच स्वतःच्या देशात कळले नाही इतके चीनला कळले आहे असाही त्याचा अर्थ असावा का  ?
 " ये तो सिर्फ झाँकि हैं... " असं तर यांतून चीनला वाटतं नसेल ना ? आज जगभरात कोणीच दुसऱ्या देशांत गुंतवणूक करण्याच्या ना फारशा आर्थिक परिस्थितीत आहे; ना तशा सक्रिय मनःस्थितीत आहे. ( काही घसघशीत आणि किरकोळ असे दोन्ही अपवाद वगळता ) !
त्यातही असे अपवाद भारतातल्या एकाहून जास्त क्षेत्रांत एकाच सुमारास होत असतील तर त्याची दखल घ्यावी लागते. 
विशेषतः परकीय चलनांच्या साठय़ात वाढ होण्यात आयात आणि निर्यात ही घटत असण्याचा वाटा असताना तर जास्तच! . कारण परिस्थितीत जसजशी सुधारणा होत जाईल तसे आजचे तुरळक प्रसंग उद्या प्रघात होइल का याचाही विचार चीन करत असेलही.
असं असूनही जर आज आपल्या देशाकडे आज परकीय चलनांचा ओघ वळत असेल तर येणाऱ्या काळात ( म्हणजे अगदी उद्याच असेल असं नाही; पण मर्यादीत अर्थाने नसेलच असंही नाही) प्रकल्पांचा ओघही वळू शकतो अशी शंका चीनला असू शकते का ? 
आणि त्यात सध्या चीनमधे असलेल्या विदेशी कंपन्यांच्या प्रकल्पांचीही भरती असणे मुळातच रोखण्याचा भाग म्हणून हा वाढता दबाव भारतीय सीमारेषेवर चीन सुरू ठेवत असेल का?  कारण युद्धाची शक्यता असणाऱ्या कींवा युद्ध सुरू असणाऱ्या देशात निदान याबाबतची परिस्थिती  सुधारेल अशी चिन्हं दिसू लागेपर्यंत कोणी गुंतवणूक करत नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि ह्या दरम्यानच्या काळात चीनला आपल्या आर्थिक धोरणाची भू-राजकीय ( जिओ-पोलिटिकल) , सामाजिक-राजकीय (सॉशिओ- पोलिटिकल) आणि अर्थातच अर्थ- राजकीय ( इको-पोलिटिकल) मांडणी करायला उसंत मिळेल असा तर भारत- चीन सीमारेषेवरच्या या वाढत्या लष्करी तणावाचा अर्थ आहे का ? 

" ,चाल " बाज चीनचा तिसरा अर्थ....
सध्याची कागाळी वाढण्याची वेळही आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे. ना कोरोना काल आला आहे; ,ना भारताचा परकीय चलनांचा साठा एका रात्रीत विक्रमी पातळीवर पोचला आहे. या दोन गोष्टींच्या जोडीला अलीकडेच घडलेली घटना म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान  यांच्यात घडलेला वार्तालाप! या चर्चेत केवळ कोरोना व संबंधित लॉकडाऊन याबाबत परिस्थिती निवळल्यावर एकमेकांना एकमेकांच्या देशाला भेटी देण्याचं आमंत्रण-निमंत्रण दिले गेलेले नाही; आणि फक्त तुमचा ढोकळा-सामोसा मला आवडतो असं ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी आपल्या पंतप्रधानांना आणि ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची कोरोना च्या काळात यथायोग्य काळजी घेतल्याबद्दल भारतीय पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना सांगितलेले नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया आपापल्या देशातील संरक्षण तळ ( डिफेन्स बेस) एकमेकांना वापरू देतील असा निर्णय या दोन पंतप्रधानांनी या चर्चेत घेतला आहे. 
इथे एक मुद्दा आवर्जून लक्षात घेतला पाहीजे.
तो असा की फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढायला लागल्यावर चीनमधली आपली उत्पादन-केंद्र हलवावी का किंवा निदान नुकसान-भरपाई मागावी का याची जाहीर चर्चा करणारा पहिला देश होता तो ऑस्ट्रेलिया.
नंतरच्या काळात चीन आणि ऑस्ट्रेलिया मधे काही बोलणी झाली असं सांगितलं जात होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया काही काळ याबाबत काहीच बोलत नव्हती.
आणि आता एकदम असा निर्णय....
या निर्णयाचे महत्व आणि गांभीर्य चीनला पूरेपूर समजलं आहे हे या सध्याच्या वाढलेल्या सीमारेषिय ताणतणावाचे गमक आहे.

" चाल " बाज चीनचा चौथा अर्थ...
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या वरील निर्णयाचे अनुकरण जर इतर काही देशांनी केले तर आणि तसे होण्याआधी पावले उचलावीत असा तर डाव चीनच्या हालचालीमागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अलीकडच्या काळात भारत-चीन सीमारेषेवर घडत असलेल्या घटना आणि त्याच काळात भारत-पाकिस्तान , भारत-नेपाळ सीमारेषेवर सुरू झालेल्या घटना या निव्वळ योगायोग नसतात हे काही वेगळेपणाने सांगायला नको. 
अशावेळी भारत-ऑस्ट्रेलिया चर्चा ही भारतही आपल्या बाजूने जगातले देश उभे करत आहे अशा आशयाची पोचपावती सीमारेषेवरच्या घटनां मधून चीन देत आहे का? 

" चाल "बाज चीन चा पाचवा अर्थ....
भारत-चीन सीमारेषेवर तणाव वाढणे आणि G -7 या गटात वाढ करत तो G-11 कींवा G -12 करण्याचा विचार अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड Trump यांनी बोलून दाखवणे या दोन्ही घटना एकाच आठवड्यात मागेपुढे होणं हा निव्वळ योगायोग असत नाही.
विशेषतः अशा वाढीव सभासदात आपला देश भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघांचाही समावेश असावा अशी मागणी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष करत असताना हे दोन देश असेही एकत्रित येत स्वतःचे आर्थिक-;राजकीय आणि लष्करी महत्व वाढवणे चीन सहजासहजी मान्य करणार नाही हे उघड आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांत भारताला स्थान मिळण्यास चीनने केलेला कडाडून विरोध इथे विसरता येत नाही.

" चाल " बाज चीनचा सहावा अर्थ....
आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत संरक्षण क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकी ( FDI) चे प्रमाण सध्याच्या 49 टक्क्यांवरून 74 टक्के करण्याची घोषणा झाली आहे.
या लेखात आधी दिलेल्या आणि इतरही अनेक कारणांमुळे ही घोषणा प्रत्यक्षात उतरण्याची खात्री तर चीनला वाटतं नाही ना! 
तसं असेल तर .....

" चाल " बाज चीनचा सातवा अर्थ....
चीन आणि भारत या दोन्ही देशांची अंतर्गत बाजारपेठ खूप मोठी आहे. त्याच्या जोरावर त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर 2008 च्या मंदीला तारून  नेले. पण चीन या देशाचे सर्वच अर्थाने आकारमान इतरांपेक्षा फार फार मोठे आहे. त्यामुळे भारताने दिलेल्या " आत्मनिर्भर भारत अभियान " ,ची हाक जर काही प्रमाणात तरी खरी झाली तरी ते चीनला परवडणारे नाही. कारण अशी या ना त्या अर्थाने " ,Be local , Be Vocal , Be Global " अशी पावलं भारता सहीत अनेक देशांनी दिली आहे. त्यातल्या एकाला धडा शिकवला तर इतर देश आपोआपच वळणावर येतील अशीही चीनची धारणा असू शकते. आणी चीनचा भारतावर राग फक्त या कारणासाठी थोडाच आहे ?
त्यामुळे चीनी मालावर बहिष्कार घालणे परवडणारे आणि पेलवणारे आहे का असं सरसकट विधान करण्यापेक्षा जमेल तेवढे अंमलात आणायला तरी सुरवात करू.... If you can not avoid it ; let us atleast not discuss it ....निदान तितका Earfall तरी कमी! कारण चीनचे वैशिष्ट्यच हे आहे की ते त्यांच्या वस्तू ना डोळ्यांआड होऊ देत; ना कानाआड ! 

युद्धाची चाल " .....चाल तुझी डौलदार " ,अशी कधीच नसते....
ती तशी करून घ्यावी लागते....
 पुढच्याचे मनसुबे वेळीच , अगदी वेळेच्या आधीच धुळीला मिळवून!

" ये नया भारत हैं. घर में घुसेगा भी और  मारेगा भी " हा यावेळी सिनेमातला संवाद राहतो की पुन्हा एकदा अनुभव ठरतो हे येणारा काळ ठरवेल...
नाही!!
त्यासाठी आत्ताच बोलणं " ,चाल " ,ठरणार नाही....
कारण हे बुद्धिबळही आहे आणि आंतरराष्ट्रीय युद्धही..... 
लष्करी वर्चस्वाला न्याय देणारे; पण आर्थिक वरचढ कोण हेही कोणीतरी पणाला लावलेले !!!!!







20 जून  2020 .

(या विषयावर सविस्तर ऑनलाईन सेशन करायला मला नक्कीच आवडेल हे निश्चितच !!!! )

2 comments:

  1. Chandrashekharji Uttam Vivechan Kele Aahe, He Kangore Vicharat Ghenyasarakech Aahet.

    Dhanyavaad.


    Vinod R. Mulye
    Dombivli (E).
    02.07.2020

    ReplyDelete
  2. Tensions between China and India would make foreign investments in high risk category. Keep borders hot with war like situations so that investors will keep India away or second priority. That solves many goals for China.

    ReplyDelete