Wednesday, June 10, 2020

आर डॉक्युमेंट.

नुकतेच दहावी ssc पास झालोय असं माझं वय आणि अक्कल.... केवळ शारीरिकच नव्हे तर बौद्धिक , सामाजिक, राजकीय समज सगळेच पौगंडावस्थेत अशी स्थिती.... 
समज अगदी कमी ( खरं म्हणजे नाहीच) ; पण कुतूहल कमालीचे अशी माझी वाचक म्हणून ( आणि व्यक्ती म्हणूनही ) अवस्था. 

त्यात बाहेर पराकोटीचे तापलेले आणीबाणीच्या काळाचे वातावरण.... सन 1975 - 1976 चा काळ.
देशभरात घटना- दुरुस्तीची गरमागरम चर्चा...
कळत तर काही नव्हते... पण आपले गटनेते सांगतात त्यावर भाबडा विश्वास ठेवत त्याची पोपटपंची करण्याचं ते वय.... शारीरिकही आणि मानसिक ही!!!

अशा अवस्थेत 1975 साली पहिल्यांदा वाचलेले पुस्तक म्हणजे आयर्विँग वालेस ( Irwing Wallace ) चे " आर डॉक्युमेंट " 
आयर्विँग वालेस काही थोर लेखक आहे की नाही ह्याची काहीच माहीती त्यावेळी नव्हती.. खरं तर हे नावच माहीती नव्हते.
पण त्यावेळी या पुस्तकावर आपल्या देशात या पुस्तकावर बंदी होती म्हणे!!!
माझ्यासारख्याला सहजपणे ते पुस्तक त्यावेळी मिळाले म्हणजे बंदी कशी असा प्रश्नही पडला नाही ....
बंदी आहे तरी आपण वाचतोय  याचेच तेंव्हा " थ्रील "....

तेंव्हापासून आजपर्यंत कितीवेळा हे पुस्तक वाचले याला गणतीच नाही...

आयर्विँग वालेस.
व्यावसायिक यशाची समीकरणे पक्की घोटलेला लेखक...
वाचकाची पौगंडावस्था त्याच्या वयावर अवलंबून नसून व्रुत्तीवर अवलंबून असते आणि तिचा अस्तित्व-काल ( shelf life हो) दीर्घ असतो या व्यावसायिक सूत्रांचा राखणदार असा लेखक म्हणजे आयर्विँग वालेस.
साधारणपणे दीर्घकथा म्हणावं इतके लहान नाही आणि कादंबरी म्हणावं तर लिओ टॉलस्टॉय सारखे आकार- आशय- कालखंड - अभिव्यक्ती या निकषांवर इतका मोठा  नाही अशा धाटणीची रचना करणारा लेखक....

 अगदीच एकांकिका नाही; आणि  पार पाच अंकी साग्रसंगीत ( आणी तेही अनेकदा Once More घेईल ) असंही नाही तर दोन- अडीच अंकी नाटकाचा सुटसुटीत पसारा आणि मोजक्या नेपथ्यात आणि नटसंचात  नाटक उभारणारा हुकुमी लेखक म्हणजे आयर्विँग वालेस.

पण एकदा त्याचे पुस्तक हातात घेतले की तुमच्या नकळत तुम्ही ते सलग वाचता... यांत पुस्तकाचा छोटेखानी आकार महत्वाचा ठरतो की चटकदार मांडणी हे त्या त्या वेळी तुमचं तुम्ही ठरवायचं.
आणि हे वारंवार होते हे मात्र निश्चितच . 
( हे तुमच्या कशाचं लक्षण....) 

" आर डॉक्युमेंट " या पुस्तकाचा विषय आहे तो अमेरिकी राज्यघटनेत करायची सुधारणा...
खरी की काल्पनिक हे पुन्हा वाचकाने ठरवायचं.
या कादंबरीतल्या या  घटना- दुरुस्तीनुसार मध्यवर्ती सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाढीव आधिकार देण्यात येणार असतात. अगदी राज्य सरकारांना डावलून. वेळप्रसंगी त्यांचा विरोध असला तरी. आता राज्य सरकारांची ही स्थिती ; तर  सर्वसामान्य नागरिकाला कोण विचारतो ? 
या  सद्रुष्य की तथाकथित साधर्म्यामुळे या पुस्तकावर  तेंव्हा आपल्या देशात बंदी असल्याची फुकाची चर्चा ! 

हे पुस्तक पहिल्यांदा वाचल्यापासून आजतागायत या पुस्तकातला माझा अत्यंत आवडता प्रसंग म्हणजे पेशाने पत्रकार आणि आपद्धर्म म्हणून " घोस्ट रायटर " असणारा इस्माईल यंग अमेरिकी सरकार मधे अटर्नि जनरल असणारया ख्रिस कॉलिन्सला विचारतो की
"  या प्रस्तावित घटना- दूरूस्तीला काहीजणांचा विरोध आहे आणि दिवसेंदिवस तो विरोध हळूहळू का होईना पण वाढतो आहे . हे तुम्हांला माहीती आहे. एक व्यक्ती म्हणून तुम्हांला ही घटना- दुरुस्ती खरंच चांगली वाटते ? " 
त्यावर पुस्तकातल्या त्या प्रसंगात त्या  अटर्नी जनरलने दिलेले उत्तर मी माझ्या उभ्या आयुष्यात विसरणार नाही...
तो सांगतो..
" कोणताही कायदा किंवा कायदे- दुरुस्ती ही चांगलीच असते. पण सरकार चांगले असले आणि त्याने ती तरतूद चांगुलपणाने उपयोगात आणली तर  तो कायदा चांगला वाटतो. असं झालं  नाही तर तोच कायदा वाईट वाटतो. " 
याचे कंगोरे सतत जाणवत राहतात.... तात्कालीक उदाहरणे  स्थिती सापेक्ष असतील  ; पण ही जाणीव  नाही ना ! 
आणि काळाच्या ओघात  असे अनुभव....
आपण वाचक म्हणून मग आपण त्या वाक्याशी इतिहास आणि वर्तमान जोडत राहातो....
याच्या आणि इतरही इंग्लिश कादंबऱ्यात उल्लेख आल्याप्रमाणे तुमच्या मनातली व्यक्ती तुमच्या पांघरूणात आली नाही तरी  आयर्विँग वालेस लेखक म्हणून तुमच्या डोक्यात वर्तमानकालीन संदर्भ निवांतपणे सोडतो... 
त्या पुस्तकात ते नसताना...
असं करण्याइतपत आयर्विँग वालेस नक्की सक्षम आहे.... म्हणून तर त्याचे तेच तेच पुस्तक परत परत वाचलं जाते.... ते त्याचे " आर डॉक्युमेंट " ,असू दे नाहीतर  " ,दि सेकंड लेडी " ! 

या पुस्तकातल्या याच प्रसंगात इश्माइल यंग ख्रिस कॉलिन्स ( अटर्नी जनरल)ला विचारतो की असे आधिकार मध्यवर्ती सरकार कडे घ्यावेत असं का वाटते ? त्यावर वाढती गुन्हेगारी असं उत्तर मिळते. या उत्तरावर हा पत्रकार अटर्नी जनरलला पुढे विचारतो की 
" असे गुन्हे हौस कींवा पेशा म्हणून झाले आहेत असं सरकार ला वाटते का  ? असा पेशा व्हावा इतकी जर परिस्थिती आली असेल तर ती एका रात्रीत आली का ? जर वाढती गुन्हेगारी हा बेरोजगारी आणि दारिद्र्य ( Poverty ) यांचा परिणाम असला तर  या घटना- दुरुस्तीने त्यावर उत्तर  मिळेल का ? " 
अटर्नी जनरल ख्रिस कॉलिन्स उत्तर द्यायच्या आधीच पत्रकार इश्माइल यंग पुढे म्हणतो.... " उपाययोजना दारिद्र्यावर हवी; गुन्हेगारी त्यातून कमी होइल. " 

हा प्रसंग आणि त्या निमित्ताने हे पुस्तक कायमचे मनात घर करून राहिले आहे. त्याची कारणे अनेक आहेत. एक तर ज्यावेळी हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचले तेंव्हा ( 1975- 76 )  आपल्या देशाच्या राजकीय- सामाजिक वातावरणात " गरिबी हटाव " ,ची घोषणा जोरात होती. त्याशिवाय त्या दोन- अडीच वर्षात राज्यभर सुरू असलेल्या दुष्काळी कामांच्या पाहणीच्या एका प्रकल्पांतर्गत मी खूपच फिरलो. त्यातून "रोजगारी कींवा बेरोजगारी ही चल ( Variable , Portable आणि Transferable अशा तिन्हीं अर्थाने ) आहे ; तुलनेने गरिबी स्थिर आहे "  हे शिकत होतो. 
त्यावेळी ही शब्दरचना सुचली नव्हतीच.
पण मनोमन हे कुठेतरी रूजत होते. खांद्यावरच्या छोट्या पिशवीत हे पुस्तक होतंच. दोन पाड्यामधलं अंतर पायी पार करताना दमलो म्हणून थांबले की पाण्याच्या घोटाऐवजी याची दोन पाने वाचली जात होती. 
आणि असं वाचन आणि भटकंती सांगत होती...
" गरिबी संपत्तीची आणि ऐपतीची असते ; दानतीची नाही. " 
त्या भाबड्या वयात तरी असं वाटायचं.
पण ते खोटं नाही हे नंतरच्या आयुष्यातलं  आजतागायत सुरू असलेले फिरणं शिकवत राहिले.

त्यामुळे या इश्माइल यंगचा हा प्रश्न कधीच डोक्यातून जात नाही... आणि म्हणून हे पुस्तक ही!

या पुस्तकाच्या पूर्वार्धात असं बरंच काही हा पत्रकार इश्माइल यंग अटर्नी जनरल ख्रिस कॉलिन्स ला विचारत राहतो. ख्रिसची पत्नीही सूचकतेने सुचवत राहते. त्यातून अटर्नी जनरल आधी विचार आणि मग क्रूती करायला लागतो. आणि त्यातून ही प्रस्तावित घटना- दुरुस्ती संमत होत नाही असं 1970 साली पहिली आव्रूत्ती प्रसिद्ध झालेले हे पुस्तक कादंबरी म्हणून वाचकांना सांगते.

नंतरच्या काळात अरुण साधू यांच्या " मुंबई दिनांक " आणि  " ,सिंहासन "'ही पुस्तके वाचताना मला हे पुस्तक सारखे आठवायचं. त्यामुळे मधल्या अनेक वर्षात ही तिन्हीं पुस्तके मी एकाचवेळी आलटून- पालटून  वाचली आहेत.
त्यामुळे असेल कदाचित पण " सिंहासन " ,सिनेमातील पत्रकार ( निळू फूले झिंदाबाद) पाहाताना मला हा इश्माइल यंग जाम आठवत राहायचा ! 
नंतरच्या काळातला संदर्भ म्हणजे अजय झणकर यांचे " ,सरकारनामा " हे पुस्तक आणि त्यावर आधारीत आलेला सिनेमा.
असा हा आठवला की पुन्हा हे पुस्तक वाचायचे... अशी पारायणे!!!

या पुस्तकाचा अजून एक संदर्भ म्हणजे किरण ठेंगडी यांचा " वजीर " हा सिनेमा... विक्रम गोखले यांचा पॉज आणि रोखलेली नजर याच्या इतकेच या बुद्धिबळ पटावरच वैचारिक- शारीरिक- कायदेशीर आणि बेकायदेशीर ही रणांगण म्हणजे हा सिनेमा आणि हे पुस्तक.

असाच या पुस्तकाची पुन्हा पुन्हा आठवण आणि पर्यायाने वाचन यासाठी उद्युक्त करणारा संदर्भ म्हणजे 1988 साली आलेला शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांचा " न्यू दिल्ली टाइम्स " या इंग्लिश नावाचा हिंदी सिनेमा ! 
या सिनेमात  शशी कपूर एका प्रसंगात त्याच्या पत्नीची भूमिका बजावणार्या शर्मिला टागोर ला सांगतो.... 
" बेकायदेशीर आणि कायद्याची सीमारेषेवरचे यातलं  अंतर नेहमीच धूसर असते .  पण आपण करत आहोत ते यातलं काय हे क्रुतीचा परिणाम ठरवतो  ; क्रुतीचा काळ नाही. आणि क्रूती करत असलेली व्यक्ती तर नाहीच नाही. " 
अशा अनेक उत्कंठावर्धक प्रसंगांची  मालीका म्हणजे आयर्विँग वालेसचे " आर डॉक्युमेंट " हे पुस्तक.

1976 च्या सुमारास एक चर्चा अशीही होती की गुलजार साहेब या पुस्तकावर हिंदी सिनेमा काढणार आहेत... संजीवकुमार , शशी कपूर , प्राण  , शर्मिला टागोर अशी मंडळी त्यात असणार वगैरे... पण " ,आँधी " सिनेमाच्या वेळी आलेला अनुभव लक्षात घेऊन हा सिनेमा आला नाही अशीही चर्चा !!!

अगदी पहिल्यांदा आयर्विँग वालेसचे " ,आर डॉक्युमेंट " ,हे पुस्तक वयाच्या 15 - 16 व्या वर्षी वाचताना पटकन लक्षात आलेली ( अगदी पहिल्या 10 पानांतच ) गोष्ट म्हणजे दुसरया लेखकांचा नावनिशीवार उल्लेख करत त्यांची विधाने पुस्तकांतल्या संवादात केलेला उपयोग. हा प्रकार  आयर्विँग वालेसच्या इतरही पुस्तकांत आहे. तसा काही प्रमाणात तो इतरही पाश्चिमात्य कादंबरीकारांबाबत ( उदाहरणार्थ जेफ्री आर्चर) आहे. भले अशी अवतरणे निवडक साहित्यिक ( उदाहरणार्थ ...जॉर्ज बर्नोर्ड शॉ , मार्क ट्वेन , बेंजामीन फ्रँकलीन) मंडळीची असतील. पण आहेत.
दरवेळी हे पुस्तक वाचताना मला फार वाटतं की आपल्या समाजकारण- राजकारणात  आपण दुसऱ्याच्या विधानाची दखल फक्त टिका करण्या साठी कींवा खिल्ली उडवण्यासाठीच करतो का?  त्यातून झिरपत जाणारी असंवेदनशीलता ही दीर्घकालात अनेक आगामी अडचणींची आमंत्रण- पत्रिका ठरते का ?
इतका मोठा आवाका या पुस्तकाचा कदाचित नसेलही... पण संवेदनशील वाचकाला उद्युक्त करत राहते इतके नक्कीच!

या पुस्तकाची जी आव्रूत्ती माझ्याकडे आहे त्यात अगदी सुरवातीला एक प्रसंग दिला आहे....
1787 साली फिलाडेल्फिया नी अमेरिकी राज्यघटनेवर स्वाक्षरी केल्यावर एका महिला डेलेगेट ने बेंजामीन फ्रँकलीन ना विचारले...
" Well , Doctor , what have we  got , a republic or a monarchy?  " 
त्यावर बेंजामीन फ्रँकलीन ने हसून उत्तर दिले,.
" A republic, if you can keep it " 
आणि उत्तर देताना बेंजामीन फ्रँकलीन पुढे म्हणाले...
" Those who would give up essential liberty to purchase a little temporary safety deserve neither liberty nor safety " .
मी हे पुस्तक वाचताना मला दरवेळी या ऊत्तरातल्या एका शब्दावर नेहमीच अडखळत पडायला होते.... " A republic, if you can keep it. " 
या उत्तरात शब्दप्रयोग  YOU असा आहे; WE असा नाही.
आता हे YOU म्हणजे....

हे उत्तर कोरोना नंतरच्या काळात.....

असं हे  आयर्विँग वालेस चे " आर डॉक्युमेंट " 
( त्याच्या " दी सेकंड लेडी " पुस्तका बद्दल नंतर कधीतरी.....) 







10 जून 2020.

No comments:

Post a Comment