Monday, June 8, 2020

Anne Frank पुन्हा - पुन्हा . . . . . . .

(१२ जून १९२९ ही तिची जन्मतारिख .  तिच्या स्म्रुती निमित्त ). 

आपण एखाद पुस्तक कधी वाचतो याचा ते पुस्तक आवडण्याशी काही संबंध असतो का  ?
पुस्तकाचा लेखक किंवा प्रमुख पात्र आणि वाचकांचे वय साधारणपणे एकच असेल तर त्या पुस्तकातील अनुभवांविषयी जास्तच जिव्हाळा वाटतो का  ? 
त्यातही पुस्तकातील राजकीय - सामाजिक परिस्थितिशी साधर्म्य असणारी परिस्थिति ते पुस्तक वाचताना काही प्रमाणात तरी प्रत्यक्षात पाहायला मिळत असेल तर अशा पुस्तकाशी लगेचच आणी जास्तच जवळीक साधली जाते का  ?

 या तिन्ही प्रश्नाचं उत्तर कदाचित नकारार्थी असेलही ; पण  "  The Diary of Young Girl "  हे Ann Frank  चे पुस्तक पहिल्यांदा वाचत असताना माझे मात्र असे झाले होते . १३ -  १५ वर्षांच्या मुलीचे अनुभव १५ - १६ व्या वर्षी वाचताना जास्त भिडतात .  त्यातच त्यावेळी आपल्या देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुकारलेली आणीबाणी ऐन भरात होती . त्या वातावरणात Ann Frank चे हे पुस्तक आणि Irwing  Wallace चे  "  R Document  "  सारख पुस्तक यातले प्रत्ययकारी वर्णने भयचकित करायची ! 

या परिस्थितीत नंतरच्या काळात जरूर बदल झाले. पण या पुस्तकाने घातलेल्या मोहिनीत मात्र कधीच काहीच बदल झालेला नाही . " एका तरूण मुलीने लिहिलेली डायरी "  असे नाव असलेले हे पुस्तक नाझी दहशतवादाचे अत्यंत बोलके चित्र उभे करते . १४ जून  १९४२ रोजी या डायरीतली पहिली नोंद आहे . १ ऑगस्ट  १९४४ रोजी डायरीतली शेवटची नोंद आहे .  Ann  च्या  १३व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या वडिलांनी तिला ही डायरी भेंट दिली होती. साऱ्या पुस्तकभर या डायरी चा उल्लेख Ann ने सतत  " Kiti "  असा केला आहे . त्यात अगदी काटेकोरपणाने रोजच्या रोज, न चुकता नोंदी केल्या आहेत अशातला काही भाग नाही. तिच वय, नंतरची परिस्थिति बघता ते साहजिकच आहे. पण त्यात Ann ने व्यक्त केलेले विचार, भावना, अनुभव अतिशय सुन्न करून टाकतात .

फ्रँकफटच्या एका उत्साही, ज्यू उद्योजकाची ( Oto Frank ) गंभीर आणि विचारी अशी ही कन्या. हिटलरचा जर्मनीमधे उदय झाल्यानंतर Ann च्या वडलानी आपली पत्नी आणि २ कन्या यांच्यासह १९३३ साली आपला मुक्काम अमस्टरडेमला हालवला. पण हिटलरच्या साम्राज्य विस्तारामुळे अमस्टरडेम मधेही ज्यूंचे भवितव्य अंधारी बनले. एकाहून एक अपमानजनक बंधने घालत त्याची सुरुवात झाली. हळूहळू त्यांची छळ - छावणीत रवानगी होऊ लागली. त्यातून वाचण्यासाठी Oto Frank  यांनी सहकुटुंब स्थलांतर केले. ६ जुलै  १९४२ रोजी आपल्याच ऑफीसच्याच  कोंदट तळघरात त्यांनी आपला बाड- बिस्तरा हालवला. त्या जागेत बाह्य जगाशी संपर्क तुटलेल्या अवस्थेत राहत असताना Ann Frank या कोवळ्या मुलीच्या मनातील विचारांची अत्यंत मोकळेपणाने आणि धीटपणे केलेली नोंद असे या पुस्तकाचे स्वरूप आहे .  

४ ऑगस्ट १९४४ रोजी त्यांच्या या गुप्त निवासाचा नाझी सैनिकांना पत्ता लागला. नंतर Frank कुटुंबीयांची वेगवेगळ्या छळ - छावण्यात रवानगी झाली. तिथेच Ann आणि तिची मोठी बहीण यांच निधन झाले. तिथून सूटका झाल्यावर Oto Frank जेंव्हा अमस्टरडेमला परत आले तेंव्हा त्याना हे हस्तलिखित मिळालें.  त्यातून हे पुस्तक जन्माला आले . 

या नष्टचर्याला सुरुवात होण्याआधी या सुस्वरूप कन्येला आपण हॉलिवुडमधे अभिनेत्री व्हावे असे कधी कधी वाटत असे. स्वतःच्या लहानपणीच्या एका छायाचित्रावर तशी टिप्पणी तिने केल्याची नोंद या पुस्तकात आहे . पण नियतिच्या संकेतांतून कॅमेराचा उजेड तर सोडाच ; पण या कोवळ्या मुलीला आधी अंधाऱ्या जागेला आणि नंतर छळ - छावणीच्या सर्वंकष अंधाराला सामोरे जावे लागले.  अर्थात ही परिस्थिति तेंव्हा अनेकांच्या वाट्याला आली.  १३ ते  १५ वर्षे हा आयुष्याचा काळ प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एका वेगळ्या अर्थाने महत्वाचा असतो. पण Ann Frank  च्या आयुष्यात तो फारच वेगळा ठरला . 

या काळाने तिला केवळ परिपक्व नव्हे तर फारच समंजस आणि प्रौढ बनवले. अभिनेत्री होण्याची तिची इच्छा जरी पूर्ण झाली नसली तरी  "  I want to go on living even after  my  death  "  ही तिची इच्छा मात्र अगदी नक्की पूरी झाली आहे.  १९४५ साली तिच निधन झाले.  पण आजही तिची आठवण  75 वर्षानंतरही अमर आहे . 

 तिच्या या पुस्तकाचे आज जगातील जवळ जवळ सर्वच भाषांत अनुवाद झाले आहेत.  हे त्या इच्छापूर्तीचेच एक रूप आहे. हे पुस्तक एकदा वाचलेला संवेदनशील वाचक त्याच्या आयुष्यात हे पुस्तक विसरूच शकत नाही हे त्याचे दूसरे रूप आहे.  " नाझी राजवटीत ६० लाख ज्यूंची हत्या झाली असेच केवळ नाही तर प्रत्येक ज्यू वर ६० लाख वेळा मरण्याची वेळ आली "  या आबेल हेर्जबेर्ग यांच्या विधानाची यथार्थता हे छोटेखानी पुस्तक त्याच्या प्रत्येक पानावर पटवत  राहते, हे त्याच आणखीन एक रूप आहे .

सुमारे 70  - 75  वर्षांपूर्वी स्वत:चे अनुभव नोंदवताना Ann Frank ने  या पुस्तकात , डायरीत  व्यक्त केलेले अनेक विचार आजही आपल्याला अंतर्मुख करतात. या पुस्तकातील उल्लेखांचे संदर्भ आज बदलले असतील ; पण त्यांची यथार्थता जरासुध्धा बदललेली नाही .

 " युद्धात प्रत्येक दिवशी कोट्यवधी रुपये खर्च करताना गरीब जनतेसाठी , व्रूद्ध कलाकारांसाठी , आरोग्य , शिक्षण यासाठी निधी अपुरा पडतो असे कोणाच्याहि मनात कसे येत नाही " या Ann Frank ने विचारलेल्या प्रश्नाचा आज संबंध उरलेला नाही असे कोण म्हणू शकेल  ? 
" जगाच्या एका कोपऱ्यात अन्न - धान्याची गोदाम ओसंडून वाहात असताना दुसऱ्या भागात भूकबळी का पडावेत  "  हा या पुस्तकात Ann Frank ने विचारलेला दुसरा प्रश्न हि असाच .
 " एखाद्या निरपराध सामान्य नागरिकाला त्याचे त्याचे जिणे जगता येउ नये, इतकी एखाद्या सत्ताधीशाची मर्ज़ी कशी महत्वाची ठरु शकते आणि त्याचा अटकावही कसा होत नाही, " असाही मुद्दा ती या पुस्तकात उभा करते . 
हे असं या पुस्तकात वाचताना Ann Frank चे  शारिरीक स्वास्थ्य ढासळत असले तरी या बालिकेचे मनोधैर्य जरासुध्धा खचलेले नाही आणि नव्हते याची प्रचिती येत राहाते.  सत्य सांगण्यास तरुण मंडळी जरासुध्धा कचरत नाहीत आणि त्याला सामोरे जायलाही ते घाबरत नाहीत या तत्वावर Ann Frank ची असणारी अढळ श्रध्दा आजही नक्कीच आवश्यक वाटते .  
 अलीकडे घडलेली त्याची उदाहरणे आहेतच की! . 

आज हिटलरहीअस्तित्वात नाही आणि Ann फ्रँकही अस्तित्वात नाही.  पण तिच्या आयुष्याला ग्रासून राहिलेला अतिरेकी वंशवाद वेगवेगळ्या रूपात पुढे येतोच आहे. एखाद्या वंशाच्या तथाकथित श्रेष्ठत्ववादी भूमिकेमुळे इतरांना जगण्याचा आधिकार नाही असे आज उघडपणे कोणी म्हणणार नाही ; पण त्याच्या छटा दिसतातच की! अशावेळी हिटलर हे नाव की व्रुत्ती....

संवादाच्या अभावामुळे वादाचा प्रभाव वाढतो आणि असा प्रभावच अनेकदा अतिरेकी दहशतीला कारणीभूत ठरतो. Ann Frank च्या डायरीमधे उभा राहणारा नाझी दहशतवाद फारच एकारलेला वाटावा अशा विविध स्वरूपात तो आज ऑक्टोपस सारखा फोफावत आहे. वांशिक दंगलीपासून आर्थिक साम्राज्यापर्यन्त आणि वित्तीय मांडलिकत्वां पासून राजकीय अरेरावी पर्यंत त्याची नानाविध रूपे जगभर सर्वत्र आणि सातत्याने सामोरी येत आहेत. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस दोस्त राष्ट्रांनी खनिजांनी सम्रूद्ध असा भूभाग तोडण्यापासून अनेक अपमानकारक अटी जर्मनी वर लादल्या. स्वाभिमानी जर्मनीच्या ह्रुद्यात त्याचे शल्य होते. त्याची चिंगारी फुलवत वांशिक श्रेष्ठत्व हा मुद्दा पणाला लावत हिटलर सर्वसत्ताधिकारी झाला. आज राजकीय मालकी पेक्षाही आर्थिक नाडया ताब्यात असणे महत्वाचे आणि सोयीचे ठरते. त्यातून युद्धे उभी राहतात. अशी युध्द उघडपणे दिसतात तरी !  
पण स्वतः जवळ असणाऱ्या नकाराधिकाराला शस्त्र म्हणून वापरत जागतिक अर्थसंस्थांच्या माध्यमातून लहान आणि अविकसित देशांची कशी ससेहोलपट केली जाते हे सर्वश्रुतआहे. मग "  Masters of Illusion  "  सारखे पुस्तक  Anne Frank  च्या डायरी चे दूसरे रूप वाटू लागते. अशा वेळी भौगोलिक सीमारेषा , राजकीय गटबंध ,  झेन्ड्यान्चे रंग हे निव्वळ मुलामे ठरतात आणि निखळ बहुरंगी , विविधांगी दहशतवाद आ वासून सामान्य नागरिकांचा घास गिळत राहातो.... वेळप्रसंगी चघळत ही !
 त्याचा मुकाबला करण्यासाठी मग Anne Frankची हिम्मत आठवत राहते . 

हे जसे एखाद्या राष्ट्राविषयी, वंशाविषयी , धर्माविषयी खरे आहे तसेच आपल्या दैनंदिन वैयक्तिक आयुष्याबाबतही खरे आहे.  Domestic Violance चा हिटलर...
अशा या धकाधकीच्या जीवनात Anne Frank  सारख्या दीपस्तंभा ची गरज वाढत राहते. 
अशा वेळी Anne Frank १२ जून  १९२९ रोजी जन्माला आली हे खरे ; पण ती १९४५ साली निधन पावली हे खोटे वाटते . कारण Anne  Frank तिच्या म्रुत्यु नंतरही आपल्या मनात जगत राहते.

सरते शेवटी,  हे पुस्तक वाचत असताना मला नेहमीच आमच्या वरसई च्या गोडसे भटजी यांच्या " माझा प्रवास "  या पुस्तकाची आठवण येते. ते पुस्तक १८५७ च्या युद्धाबाबत एका सामान्य माणसाने केलेल्या नोंदी आहेत . त्यातल्या वेदनांची जातकुळी जरूर वेगळी आहे.  पण या दोन्ही पुस्तकातले साम्य म्हणजे निरपराध सामान्य नागरिकांनी केलेल्या नि:पक्षपाती, स्वानुभवावर आधारीत अशा या नोंदी आहेत. म्हणून त्या खुप महत्वाच्या आहेत . . . 
साहित्य म्हणूनही आणी इतिहास म्हणूनही . 






7 जून 2020

No comments:

Post a Comment