Saturday, December 26, 2020

एकीकडे...

एकीकडे मला मनस्वी म्हणतोस आणि  आणि दुसरीकडे हेही म्हणतोस की माझ्या मनातले मोकळेपणानं मी , अगदी तुलाही , सांगत नाही.

एकीकडे तुझ्या असं म्हणण्याची मला गंमत वाटते आणि दुसरीकडे याची आपल्याला  , अगदी दोघांनाही , मनोमन खात्री असते की असं बोललोच तर आपण एकमेकांशीच बोलू.

एकीकडे तुझ्या असं म्हणण्याची मस्करी होते आणि दुसरीकडे तू अस म्हणाला नाहीस, अगदी दोन दिवसांत , तरी माझं मन त्याची वाट पाहायला लागते.

अगदी खरं सांगायचं तर..

मनातल्या सगळ्याच गोष्टी या सांगण्यासारखा नसतात कधी कधी...

म्हणजे सांगायच्या ही नसतात काही वेळा..

एकीकडे तुला हे पटणार नाही हे माहीती असते आणि दुसरीकडे तुझी बाजू , अगदी तळमळीने , कसं पटवून देशील याचं चित्र मनोमन रंगवले जाते.

म्हणूनच मला एकीकडे मनस्वी म्हणतोस आणि दुसरीकडे त्याचवेळी त्यावरूनच मानापमान , अगदी भावबंधन , मनात आणतोस ना...

एकीकडे....





२६ डिसेंबर २०२०.

सय

आत्ताच तुझी दोनदा आठवण आली...


चहा करताना दूध घेताना साय आली

आणि नंतर

चहा मगमधे ओतल्यावर चहावर साय आली.


काय आपलं मन असत ना !

कशी सांगड घालत ना ?

साय ही अशी एक वस्तू जी मला बिलकुल आवडत नाही.

आणि 

तू अशी एक व्यक्ती जिच्यावाचून मी मी उरत नाही.


सय आणि साय...


**

 बरं झालं.

सांगितलेस....


तुझीच एक कविता आहे ना....


" मनातलं सांगत जावं

निदान काहीवेळा

मनाजोगते उत्तर मिळत

काहीच वेळा." 


सय आणि साय .....





२५ डिसेंबर २०२०.

निळाई


अशी निळाई 

काय काय घेऊन येते

उरात भरून येते,

 उरी दाटून राहते.


डोंगर जोडून

नभ उजळून

तरीही ऊरून

जणू डोळा पाणी येते.


अशी निळाई

तिन्हीसांजेला अलगद

वेडी

युती सांगते.





२२ डिसेंबर २०२०.

युती

  

                             

काल म्हणे आकाशात

गुरु- शनी युती होती.

आमच्या मार्क- शीटात

तर ती केँव्हापासूनच होती.


काल अगदी युती

दुर्बिणी लावून पाहीली

आमच्या युतीला मात्र

झाडूने झोडली.


मराठीत सांगितलं

जुनं ते सोनं

मग आमच्या युतीतल

दूषणे देऊन का सजले.


काळ- काम- वेग

हे काय पुस्तकांत शिकतात

आमच्या युतीत

कधीच व्यवहारात आणतात.


आमच्या पेपर मधला इतिहास

पुस्तकापेक्षा वेगळा होता

कालच्या युतीचा इतिहास

आता पुस्तकांत आणतात.


काल म्हणे ऐन्लार्ज करून पाहा

शनीची कडी स्पष्ट दिसतात

आमच्या युतीला मायक्रोस्कोपात पाहात

टोचून बोलत राहतात.


आमच्या युतीला

वर्गातल्या पोरी फिदिफिदी हसल्या

कालच्या युतीला

नवऱ्याच्या साक्षीने पोस्टत राहिल्या.






२२ डिसेंबर २०२०

Wednesday, December 16, 2020

कोनाडे.


आयुष्याच्या भिंतीला

इतिहासाचे कोनाडे

शब्दा- शब्दाला

गात असतात पोवाडे.


आयुष्याच्या भिंतीला

आठवणींचे कोनाडे

क्षणा - क्षणाला

जाणवतात भूतकालीन सांगाडे.                                              



                                                                आयुष्याच्या भिंतीला

                                                                आकांक्षी कोनाडे

                                                                घडी- घडीला

                                                                बदलतात सदैव आराखडे.




१५ डिसेंबर २०२०.

Sunday, December 13, 2020

प्रदोष...

" काल शनिप्रदोश... "

" वर्षांत दोनदा, फार फार तर तीनदा येणारा... " 

" आयुष्याशी साधर्म्य सांगत.... "

" असं बोलू नये रे ! " 

" बोललं नाही म्हणून मनात यायचे थोडंच थांबत ? "

" ...." 

" व्रुत्ती- प्रव्रुत्तीतला दोष घालवायचा उत्तम मूहूर्त म्हणजे प्रदोष

..." 

" विचारावं लागते ? " 

" असा दोष उत्पन्न होऊच नाही म्हणून करावयाच्या साधनेसाठीचा अत्युत्तम मूहूर्त म्हणजे प्रदोष. " 

" विचारत राहावे स्वतःला सतत... " 

" कारण प्रदोष हा प्रसंग नाही; प्रक्रिया आहे. " 

" अस्तित्व- काल असणारी आणि नसणारी ही... "

 "वस्तूंना अस्तित्व- काल ( शेल्फ- लाईफ) असतो; तसा भावभावनांनाही असतो का ?  " 

"असावा का ? " 

"आणि नात्यांना...." 

 "मनोमन असतो; दाखवला नाही तरी..."

" याच्या सीमारेषा म्हणजे प्रदोष ? "

" कदाचित... " 

 " प्रत्येक सीमारेषा ही विभाजनरेषा असतेच अस नाही. " 

" किंबहुना त्या तशा असू नाहीत म्हणून आखून घ्याव्या लागतात त्यांना सीमारेषा...." 

" याचं भान देतो तो काल म्हणजे प्रदोष..... " 

" प्रदोष आपल्या मनाचा प्रहरी... " 

" आयुष्याचा.... " 





१३ नोव्हेंबर २०२०.

कुंपण.



काही मोहक

इतके दाहक असते.

नकाराचे कुंपण

फारच ठसठशीत असते.


पित्याच्या भूमिकेत

दडपण असते

वधूवस्त्रात कन्या

आपले स्वप्न असते.


लोंबती झुंबरे

बटेला लडिवाळ करतात

कन्यादान करणारा आणि घेणारा

मोहरून टाकतात.


ओठांच्या सीमारेषेवर

शब्द ही अडतात

आनंदाश्रूच्या आवेगावर

नातेबंध सजतात.






१३ नोव्हेंबर २०२०

झुरमुर.

कधी कधी रक्तीमा

नभाइतकाच गाली विराजतो

कधी खुदकन, कधी लाजून

कणाकणात सजतो.


कधी कसं कळत नाही

नाते चंद्राशी असते. 

तिन्हीसांजेच्या मुहुर्ती

मनांत झुरमुरे.






९ नोव्हेंबर  २०२०

Thursday, December 10, 2020

त्रिपुरारी.

" एक एक गंमत असते ना ? " 

" समजलो नाही मी. " 

" काही त्रिपुरारी मनात असतात. त्यांना पौर्णिमा लागत नाहीत ."

" खरं आहे. "

" म्हणजे ? " 

" आपण तन- मन- धनाने असं नेहमीच म्हणतो. पण तन आणि धन या गोष्टी मनापेक्षा वेगळ्या असतात. " 

" ....".

" तनाची आणि धनाची वळणं आणि वेलांटया लक्षात येतात. पाहीजे असलं तर ....पण मनाचे तसे नाही ना ! " 

" ...."

" जाणवतात कधी तरी... पण जाणवतातच असंही नाही ना " 

" म्हणूनच तर त्रिपुरारी म्हणले. "

" तसंही त्रिपुरारीच्या पूजेला अर्ध्या कोहळ्यात वात लावत पूजा करतात हे सांकेतिक वाटतं राहते. " 

" कित्येक देवळात त्रिपुरारिच्या पूजेला प्रदक्षिणाही अर्धीच.... " 

" त्रिपुरारी अशीच असते.... देवळातलीही आणि मनातलीही... " 

" त्रिपुरारी.... " 





४ डिसेंबर २०२०